सेवाभावाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:56 AM2018-01-29T00:56:02+5:302018-01-29T00:57:25+5:30
विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे.
विदर्भ ही संत गाडगेबाबांची भूमी आहे. गाडगेबाबांनी रुजविलेल्या सेवाभावाने या भूमीत चांगलेच मूळ धरले आहे. देशाच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी त्याची प्रचिती दिली. गोरगरिबांसाठीच्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य आणि सिकलसेल रुग्णांसाठी आयुष्य वेचलेले दिवंगत संपत रामटेके या विदर्भाच्या सुपुत्रांना पद्मश्री पुरस्कार देऊन, भारत सरकारने त्यांच्या सेवाकार्याची पोचपावती दिली आहे. एकाच भागातील तिघांना एकाच वर्षी सेवाकार्यासाठी पद्म पुरस्कार मिळण्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असावे. सेवाकार्यासाठी यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेले आमटे पितापुत्र असोत, की यावर्षीचे विजेते बंग दाम्पत्य वा संपत रामटेके असो, त्यांनी काही पुरस्कारांच्या अभिलाषेने सेवाकार्यास वाहून घेतले नव्हते. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर, सेवाकार्य हेच त्यांच्या जीवनाचे इतिकर्तव्य असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी त्यासाठी स्वत:ला झोकून दिले. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग या दोघांनीही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवित पूर्ण केले होते. ठरवले असते तर ते खोºयाने पैसा ओढू शकले असते; पण त्यांनी आयुष्य वेचले ते गोरगरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी, गरीब कुटुंबे उद्ध्वस्त करणारी दारू हद्दपार करण्यासाठी! हे काम करीत असताना त्यांनी त्यांच्या मूळ क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील एकदोन नव्हे, तर तब्बल २८ संशोधनपर प्रकाशने बंग दाम्पत्याच्या नावावर आहेत! वर्धेच्या सेवाग्राम आश्रमात बालपण घालविताना मिळालेले गांधीवादी विचारसरणीचे बाळकडू डॉ. अभय बंग यांना सेवाकार्याच्या मार्गावर घेऊन गेले, तर मुलाच्या आजाराने संपत रामटेकेंना सिकलसेलच्या रुग्णांसाठी लढा देण्याची दीक्षा दिली. सिकलसेलग्रस्तांसाठी तब्बल चाळीस वर्षे संघर्ष करून, तो प्रश्न पार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी रामटेके यांनी दिलेला लढा, हे एखादी ध्येयवेडी व्यक्ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. गाडगेबाबांनी पेटविलेली सेवाभावाची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचे काम, आमटे पितापुत्र, बंग दाम्पत्य, संपत रामटेके, शंकरबाबा पापळकर यासारख्या लोकांनी केले आहे. सुदैवाने सेवाभावाची ही जाणीव पुढील पिढीतही जागृत असल्याची उदाहरणे विदर्भात दृष्टोत्पतीस पडत आहेत. त्यामुळे बंग दाम्पत्य वा संपत रामटेकेंना मिळालेले पद्म पुरस्कार हे विदर्भाच्या वाट्याचे सेवाकार्यासाठीचे अखेरचे पुरस्कार नसतील, हे निश्चित!