असा पंतप्रधान ज्यांस आठवणे आज अधिक गरजेचे

By admin | Published: October 13, 2016 01:25 AM2016-10-13T01:25:59+5:302016-10-13T01:25:59+5:30

एव्हाना बहुतेकांच्या विस्मरणात गेलेले व दुर्लक्षित झालेले माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्यावर गेल्या वर्षभरात अनेक लेख आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

The Prime Minister Jyavas recall more needs today | असा पंतप्रधान ज्यांस आठवणे आज अधिक गरजेचे

असा पंतप्रधान ज्यांस आठवणे आज अधिक गरजेचे

Next

एव्हाना बहुतेकांच्या विस्मरणात गेलेले व दुर्लक्षित झालेले माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्यावर गेल्या वर्षभरात अनेक लेख आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपला कार्यकाळ पूर्ण केलेल्या राव यांच्या कारकिर्दीत देशाच्या आर्थिक धोरणात मोठा बदल करण्यात आला व त्यांनीच परराष्ट्र धोरणात पूर्वेकडील देशांना प्राधान्य देण्याचा प्रभावी बदल केला होता. तथापि त्यांच्या कार्यकाळात इतके सारे घडूनही भारतीय राजकारणाच्या अभ्यासकांनी व टीकाकारांनी त्यांची हवी तेवढी दखल घेतली नाही व त्यांना न्याय दिला नाही. या मागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ते बाबरी मशिदीचे रक्षण करु शकले नाहीत व त्याच्याच परिणामी मग नंतर देशभर जातीय दंगली मोठ्या प्रमाणात उसळल्या. या एकाच प्रकरणाने त्यांनी केलेल्या अनेक चांगल्या कामांवर पाणी फिरले.
दुसरे आणि कदाचित सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोनिया गांधी यांच्याकडून झालेली त्यांची उपेक्षा. १९९८ साली सोनियांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि तेव्हांपासूनच पक्ष आणि पक्ष सदस्यांच्या स्मृती पटलावरुन राव यांचे नाव पुसले जाईल असे पद्धतशीर प्रयत्न सुरु केले. काँग्रेस पक्षावर केवळ एकाच परिवाराचा पगडा आणि प्रभाव असावा याचे हेतुने सोनिया ते करीत होत्या, हे उघड आहे. एका बाजूला पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या ज्ञात-अज्ञात आणि प्रसंगी कपोलकल्पित योगदानांचा गवगवा केला जात असताना खुद्द काँग्रेसमधीलच अन्य नेत्यांना कमी लेखले जात होते. यापायी काँग्रेसमधील अनेक कर्तबगार महिला आणि पुरुष नेत्यांवर अन्याय झाला पण तो सर्वाधिक झाला पी.व्ही.नरसिंह राव यांच्यावर.
विलंबाने का होईना राव यांच्याकडे जगाचे लक्ष जात असले तरीही ते स्वागतार्र्ह आहे. पण आता वेळ आली आहे ती पंतप्रधानपदाच्या परंपरेच्या समग्र उजळणीची. ही परंपरा लक्षात घेता, राव यांच्यापेक्षाही अधिक उल्लेखनीय असे काही लोक होऊन गेले. परंतु केवळ एका परिवाराचा प्रभाव वाढत जावा म्हणूनच यांच्याकडेदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. या यादीतील एक महत्वाचे नाव म्हणजे लालबहादूर शास्त्री.
पंतप्रधानपदाचा कारभार हाती घेऊन काहीच दिवस झाले असता कैरोहून परत येताना त्यांनी कराचीला मुक्काम केला होता. कराची तेव्हा पाकिस्तानची राजधानी होती. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी शास्त्रींची विमानतळावर भेट घेतली होती. इतक्या कमी उंचीचा आणि नाजुक शरीरयष्टीचा माणूस एवढ्या मोठ्या राष्ट्राचे नेतृत्व कसा करीत असेल, असाच विचार तेव्हां अयूब यांच्या मनात आला होता. केवळ तितकेच नव्हे तर भारताचा हा नवा नेता युद्धाच्या वेळी स्वत:च्या राष्ट्राचे रक्षण करण्यास पात्र नाही, अशीच स्वत: लष्कर प्रमुख असलेल्या अयूब यांची धारणा झाली होती, असे सांगतात. त्याच सुमारास पाकिस्तानने काश्मीरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु अयूब यांचा तो गैरसमज होता. तेव्हांचे भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत शास्त्रींनी अगोदरच भारतीय सशस्त्र सैन्याच्या आधुनिकरणाचा आराखडा तयार करून ठेवला होता. १९६५ सालच्या आॅगस्ट महिन्यात पाकिस्तानने काश्मीरात घुसखोर पाठवले आणि पुढच्याच महिन्यात मोठा गोळीबारही केला. भारतीय सैन्याने त्याचा सडेतोड सामना तर केला पण लष्करावर तेव्हां प्रचंड दडपण होते. शास्त्रींनी लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी एक निर्णय घेऊन लष्कराला पंजाबात आघाडी घेण्यास सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की पाकिस्तानी सैन्य बचावात्मक पवित्र्यात मागे हटले. शास्त्रींच्या नेतृत्वात सशस्त्र सैन्याने १९६५च्या युद्धात अत्यंत चांगली कामगिरी करुन तीन वर्षे आधी चीनकडून झालेल्या पराभवाची नामुष्की धुऊन टाकली.
अन्नधान्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यात देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल हे नेहरुंच्या नंतर शास्त्रींनींही चांगलेच ओळखले होते. त्यांनी दिलेली ‘ जय जवान जय किसान’ ही घोषणा त्याचीच द्योतक होती. शास्त्रींनीं त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सी.सुब्रह्मण्यम यांच्या साथीने हरित क्र ांतीचा पाया रचला, पण त्याचे श्रेय नंतर आलेल्या इंदिरा गांधींनी स्वत:कडे ओढले. हरित क्रांतीचे फळ म्हणून दशकभरात जेव्हा गहू आणि तांदूळ उत्पादनाचे प्रमाण वाढले, तेव्हांच दुर्दैवाने शास्त्रींचे निधन झाले. सद्यस्थितीत जेव्हा कृषी क्षेत्र पुनरुज्जीवित होण्याची वाट बघत आहे व शेजारी राष्ट्रासोबत तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत, तेव्हा शास्त्रींची आठवण होण्याचे आणखी काही कारणे आहेत. लालबहादूर शास्त्री नेमस्त वृत्तीचे होते. आपल्याला लोकांनी उक्तीने मन्हे तर कृतीने ओळखावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे बोलणे अत्यंत सौम्य आणि मृदू होते. १९६५च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी रामलीला मैदानावरुन जे भाषण केले, तोच तेवढा याला अपवाद होता. कारण तेव्हां संयुक्त राष्ट्र संघाच्या मध्यस्थीने नुकताच युद्धविराम घोषित करण्यात आला होता.
बीबीसाने त्या तणावाचे वर्णन ‘हिंदू भारत व मुस्लीम पाकिस्तान’ यांच्यातील लढाई असे केले होते. शास्त्रींनी त्यांच्या रामलीला मैदानावरील भाषणातून या दुर्दैवी आरोपाचे खंडन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जन्माने मुस्लीम असलेले एक नामांकित राष्ट्रवादी नेता होते. सभेचे सूत्रसंचालक संसद सदस्य, प्रसिद्ध वकील पण जन्माने अँग्लो-इंडियन होते. पंतप्रधान शास्त्रींनीं भाषणाच्या सुरु वातीलाच उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले. आपल्या सहकाऱ्यांचा आपल्याला अत्यंत अभिमान आहे असे सांगत शास्त्री पुढे म्हणाले, ‘सभेचे अध्यक्ष मुश्ताक हे मुस्लीम आहेत. सूत्रसंचालक फ्रँक अँथनी ख्रिश्चन आहेत. इथे शीख आहेत आणि पारशीदेखील आहेत. आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, पारशी आणि इतरही धार्मिक गट आहेत. आपल्या इथे मंदिरे आहेत व मशिदी आहेत. गुरु द्वारे आण िचर्च आहेत. पण आपण या सर्व गोष्टींना राजकारणात कधीच थारा देत नाही व हाच तर भारत आणि पाकिस्तान यातील मोठा फरक आहे. एका बाजूला पाकिस्तान स्वत:ला इस्लामी राष्ट्र असल्याचा दावा करतो आणि धर्माला राजकीय मुद्दा करतो तर दुसऱ्या बाजूला आपण भारतीय आपापल्या आवडीच्या वा निवडीच्या धर्माचे अनुसरण करीत असले तरी जेव्हां राजकारणाचा प्रश्न निर्माण होते, तेव्हां आपण सारे केवळ भारतीयच असतो’.
पी.व्ही.नरसिंह राव यांच्याकडे आत्ताच इतके लक्ष जाण्याचे कारण म्हणजे, भारतीय अर्थव्यवस्थेने मुक्ततेचा अंगिकार करणारे जे धोरण स्वीकारले त्याचा र्रप्य महोत्सव. मी शास्त्रींच्या भाषणातला जो काही अंश इथे दिला आहे, तो आजच्या काळाला सुसंगत तर आहेच पण कालातीत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानसोबत तणाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा त्यांच्या भाषणातले हे शब्द आठवतात. हे शब्द शांतीच्या काळात सुद्धा महत्वाचे आहेत. भारताला जर दीर्घकाळाची प्रगती करायची आणि टिकवायची असेल तर नक्कीच आपल्याला राष्ट्राच्या राजकीय जीवनातून धर्म हा घटक बाजूला ठेवावा लागेल.
-रामचन्द्र गुहा
(इतिहासकार आणि राजकीय समीक्षक)

Web Title: The Prime Minister Jyavas recall more needs today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.