त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

By विजय दर्डा | Published: July 15, 2024 05:07 AM2024-07-15T05:07:01+5:302024-07-15T05:08:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी गळाभेट घेतल्यामुळे संपूर्ण पाश्चात्त्य जगातून ‘हाय-तौबा’ ऐकू येऊ लागले आहे..

Prime Minister Narendra Modi's Russia Tour Editorial Special Article | त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

त्यांनी गळाभेट घेतली तर यांना पोटशूळ का?

डॉ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह

पंतप्रधान नरेंद्र मोदीरशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भेटले काय, संपूर्ण पश्चिमेकडून  लगेच ‘हाय-तौबा’ ऐकू येऊ लागले. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी तर सांगूनच टाकले की, ‘मुलांच्या इस्पितळावर प्राणघातक हल्ला झाला असताना जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीने जगातील एका खुनी अपराध्याची गळाभेट घेतली हे अत्यंत निराशाजनक आहे.’  नरेंद्र मोदी काहीही झाले तरी पुतीन यांच्याशी गळाभेट करणार नाहीत अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पश्चिमेतील  इतर देशांनाही याचा धक्का बसला आहे. परिणामी पश्चिमी देशांतील थोर मोठे विचारवंत समाजमाध्यमांवर याविषयी लिहू लागले आहेत. परंतु मोदी यांची कार्यशैली ज्यांना परिचित आहे त्यांना हे ठाऊक आहे की, मोदी कधीही, कुणालाही आपल्या कूटनीतीने आश्चर्यचकित करू शकतात. यावेळीही त्यांनी हेच केले आहे. रशिया त्यामुळे खुश असून, अमेरिकेपासून युरोप खंडात जणूकाही जखमेवर कुणीतरी मीठ चोळल्यासारखी आगआग झाली आहे. इकडे चीनला चिंता वाटणे स्वाभाविक आहे; परंतु मोकळेपणाने तो देश काही बोलूही शकत नाही. तूर्तास त्याला रशियाची सर्वाधिक गरज आहे.

रशियाला दडपण्याच्या हेतूने युरोपीय देश ‘नाटो’च्या बॅनरखाली अमेरिकेत एकत्र आले असताना मोदी यांचा रशिया दौरा झाला. अलीकडच्या काही वर्षांत अमेरिकेशी भारताचे संबंध सुधारले असल्याने पश्चिमी देशांना वाटत होते की, भारताने  भले आतापर्यंत रशियावर उघडपणे टीका केली नाही, परंतु तो रशियाला साथही देणार नाही. मोदी किमानपक्षी पुतीन यांची गळाभेट टाळून एक संदेश देऊ शकले असते; परंतु झाले नेमके उलटे. पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या घरी भोजनासाठी बोलावले आणि त्याचबरोबर रशियाचा सर्वोच्च नागरिक सन्मानही त्यांना दिला. दुसरीकडे मोदी यांनी मोठ्या आवेशपूर्ण रीतीने पुतीन यांच्याशी गळाभेट केली. हे दृश्य समोर येताच पश्चिमेकडील देशांना भूकंपासारखा धक्का बसला. टीकेचा सूर धारदार होऊ लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की, या दोघांच्या गळाभेटीने हे देश इतके विचलित झाले की युद्धाच्या मैदानावर प्रश्न सोडवता येत नसतात असे मोदी यांनी पुतीन यांना बैठकीत स्पष्ट शब्दांत ऐकवले आहे हे ते विसरले. युद्धात बालके मरतात तेव्हा हृदय विदीर्ण होते असेही मोदी यांनी म्हटले होते. मोदी यांनी पुतीन यांच्या समोर यापूर्वी हे सांगितले तेव्हा पश्चिमी देशांनी त्यांचे स्वागत केले होते. मग आता नेमके काय झाले?

याबाबतीत मला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे म्हणणे अगदी बरोबर वाटते. युरोपचा दृष्टिकोन एकतर्फी आहे. आपले प्रश्न जगाचे प्रश्न आहेत असे ते मानतात; परंतु जगाच्या समस्या त्यांच्या मानत नाहीत, असे जयशंकर सांगत असतात. पुतीन आणि मोदी यांच्या भेटीने अस्वस्थ होऊन ते टीकेवर उतरले आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, भारत आणि रशियाची मैत्री काही नवी नाही. पश्चिमी देशांनी भारताच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा समजूतदारपणा दाखवला तर त्यांच्या हे लक्षात येईल की भारताचे पाऊल पश्चिमी देशांच्या विरोधात नाही; परंतु स्वतःच्या गरजांनुसार उचललेले आहे. आज अमेरिका, फ्रान्स किंवा दुसरे देश आपल्याला शस्त्रसामग्री  देण्यासाठी भले तयार होत असतील, परंतु जेव्हा अमेरिका उघडपणे पाकिस्तानची साथ देत होता तेव्हा रशियानेच केवळ आपल्याला लष्करी मदत केली. तो देश कायमच आपला विश्वसनीय साथी राहिला आहे हे आपण कसे विसरू शकतो? आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, रशिया वेगाने चीनच्या बाजूने नाइलाजाने झुकत आहे. पश्चिमी देशांनी त्याच्यावर आर्थिक प्रतिबंध लावले आहेत.  अशा स्थितीत रशियाशी असलेली मैत्री भारत पुन्हा एकदा पक्की करेल हे स्वाभाविक होय. चीनने भारताच्या सीमेवर खोडी काढली तर रशिया उघडपणे भारताच्या बाजूने येणार नाही, असे पश्चिमी देशांतील तज्ज्ञ सांगत आहेत. तशी परिस्थिती उद्भवली तर ती आणखी चिघळू नये म्हणून अमेरिकाच पुढाकार घेईल. चीनलाही हे ठाऊक आहे की रशियाच्या मदतीशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही.

भारतात संरक्षण उपकरणांच्या उत्पादनाबाबत रशियाने  दिलेली मान्यता अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे, असे काही अमेरिकी विशेषज्ञ म्हणतात. मला अशा गोष्टी मूर्खपणाच्या वाटतात. आपण शस्त्रसामग्री निर्माण करून जगभर विकायची,  सर्वांना लढायांमध्ये गुंतवायचे आणि आम्ही आमच्या संरक्षणासाठी लष्करी सामग्रीचे उत्पादन केले तर तो जगासाठी धोका होतो? मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, राजनीतिक संदर्भात भारत कोणाचे ऐकणार नाही, भारत केवळ विश्वशांतीसाठी काम करेल हेच ‘नाटो’च्या  बैठकीपूर्वी मोदी यांनी पुतीन यांच्याशी गळाभेट घेऊन जगाला सांगितले आहे. पुतीन यांच्या भेटीनंतर मोदी हे ऑस्ट्रियाला जाण्यातही एक मोठा संदेश आहे. ४१ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाला गेले आहेत.

वृद्धांच्या लढाईत वयाचा मुद्दा

मी हा स्तंभ लिहीत असताना ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याची घटना घडली आहे. ट्रम्प यांना त्याचा फायदाच होईल. परंतु, हे मोठे विचित्र म्हणायचे की विद्यमान उमेदवारांपैकी कोणीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  होवो, या देशाच्या इतिहासातील ते सर्वांत वयोवृद्ध  राष्ट्राध्यक्ष  असतील. या आधी रोनाल्ड रिगन ७७ वर्षांचे असताना सेवानिवृत्त झाले होते. यावेळी जो बायडेन ८१ वर्षांचे असून, ट्रम्प ७८ वर्षांचे आहेत. अमेरिकेत वयोवृद्धांनी काम करणे असामान्य गोष्ट नाही. येथे ७५ हून अधिक वयाचे २० लाख लोक नियमित काम करत आहेत. पुढच्या दशकात हा आकडा ३० लाखांपेक्षा जास्त होऊ शकतो. म्हणून बायडेन आणि ट्रम्प यांनी इतके वय झाले असताना राष्ट्राध्यक्ष कशाला व्हायचे, असे कोणी म्हणण्याचे कारण नाही. तूर्तास राष्ट्राध्यक्षांच्या वयाच्या मुद्द्यावर व्हाइट हाऊस आणि सीआयएचे गुप्तचर अधिकारी सर्वाधिक चिंतेत आहेत. इतक्या अधिक वयाच्या राष्ट्राध्यक्षांसमोर महत्त्वाची गुप्त माहिती कशी काय ठेवायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. पण, दुसरा पर्याय तरी काय?

Web Title: Prime Minister Narendra Modi's Russia Tour Editorial Special Article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.