पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Published: January 7, 2015 10:43 PM2015-01-07T22:43:14+5:302015-01-07T22:43:14+5:30

प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली.

In the prime minister's court in the prime minister's chair | पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पंतप्रधानांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहणाऱ्या पंतप्रधानांनी पुणे आणि कोल्हापूरमध्ये लोकभावनेला साद घालत विकासाच्या मुद्द्यांची चर्चा केली.
पंतप्रधान मोदी हे मुरब्बी राजकारणी आहेत. कुठे काय बोलायचे, याचे नेमके भान त्यांना आहे. कोणत्या ठिकाणी कुणाला पुढे करायचे, याचेही तंत्र चांगलेच अवगत आहे. ‘मै प्रधानमंत्री नहीं, प्रधानसेवक हूँ’ असे म्हणून थेट जनतेच्या हृदयाला हात घालण्याची खुबी करवीरवासीयांनीही अनुभवली. आमदार-खासदारांप्रमाणे ‘मै कामदार हूँ’ असे म्हणत त्यांनी वेगळी ओळख ठसविण्याचा चतुराईने प्रयत्न केला. त्यांनी आश्वासन कुठलेच दिले नाही; परंतु विविध प्रलंबित मागण्यांबाबत अतिशय मुत्सद्दीपणाने मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखविले. टोल प्रश्न, शहर आराखडा, खंडपीठ, कोकण रेल्वे आणि विमानतळाचे राष्ट्रीयीकरण हे प्रश्न पंतप्रधानांसमोर आले. परंतु, तेल लावलेला मल्ल जसा कुणाच्या हाती सहसा लागत नाही, त्याप्रमाणे राजकारणाच्या मातीत मुरलेल्या मोदींनी आपल्या अंगावर काही घेतले नाही. समस्यांचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ‘टोल’वला. राष्ट्रीय प्रश्नांवर पंतप्रधान आश्वासन देऊ शकले असते; परंतु त्यांनी ते हुशारीने टाळले आणि प्रलंबित प्रश्न इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे रखडत न ठेवता राज्यात देवेंद्र तडीस लावतील, असा दिलासा दिला. आश्वासनांची खैरात न करता त्यांनी हळूच अंग काढून घेतले. परंतु, त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांना चालना मिळण्याच्या करवीरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केले नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर रास्त भाव मिळणे गरजेचे आहेच; परंतु साखरेच्या ढासळत्या किमतीमुळे कारखाने कर्जात बुडू नयेत, याबाबतही सरकारला विचार करावा लागेल.
पुण्यात पंतप्रधानांनी सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीय परिषदेत आश्वासक भूमिका जाहीर केली. सरकारी हस्तक्षेप कमी करून जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी बँकांना सक्षम करण्याची ग्वाही त्यांंनी दिली. बँकांना भविष्यात स्वायत्तता दिली जाईल व सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद जागवत वित्तीय व्यवस्थापनासंदर्भात मौलिक दिशादर्शन व सोनेरी स्वप्नांची चाहूल देण्याचे काम पंतप्रधानांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची ही भेट चौफेर विकासाची नांदी ठरेल?
स्वरोत्सवाची सांगता
सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाची सुरेल सांगता सवाई गंधर्वांच्या ध्वनिमुद्रिकेने झाली. वॉटरप्रूफ मांडवाखाली झालेल्या या उत्तरार्धात संगीतरसिक सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाले. एकाहून एक सरस, सुरस व सुरेल मैफली या स्वरोत्सवात रंगल्या. नवोदितांनी केलेले ‘सवाई’ सादरीकरण व बुजुर्ग कलावंतांचा अभिजात ‘भीमसेनी’ आविष्कार यांचा अप्रतिम मिलाफ संगीतरसिकांना अनुभवायला मिळाला. हा संगीतानंद वेबकास्टिंगच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना आता घरबसल्या अनुभवता येईल, ही यंदाची विशेष उपलब्धी म्हणावी लागेल. स्वर्गीय तालस्वरांचा आनंद तनामनात साठवत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या हृद्गतासह रसिकांनी या स्मरणीय स्वरयज्ञाला निरोप दिला.

विज्ञानयोगी हरपला
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाचे प्रमुख शिल्पकार, राष्ट्रीय विज्ञान धोरणाला आकार देणारे बिनीचे शिलेदार आणि ‘मॉन्सून मॉडेल’चे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या निधनाने एक विज्ञानयोगी हरपला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेल्या गोवारीकरांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकिर्दीची पायाभरणी कोल्हापुरात झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा विज्ञानयोगी विविध संशोधन प्रकल्पांत कार्यमग्न राहिला. डॉ. गोवारीकर हे तमाम संशोधकांसाठी दीपस्तंभ होते. या ‘अवकाशव्यापी’ अग्रणी शास्त्रज्ञाची अनुपस्थिती तराळ-अंतराळाला अस्वस्थ करणारी आहे. एकीकडे देशात नवे संशोधक, शास्त्रज्ञ घडावेत आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना डॉ. गोवारीकरांसारख्या ज्येष्ठ-श्रेष्ठ शास्त्रज्ञाचे आपल्यातून जाणे, ही न भरून येणारी अवकाश-पोकळी आहे.
- विजय बाविस्कर

 

Web Title: In the prime minister's court in the prime minister's chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.