प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचं चिनी गुप्तहेराशी साटंलोटं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:46 IST2024-12-21T08:46:29+5:302024-12-21T08:46:38+5:30
केवळ ब्रिटनच्या नागरिकांच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांसाठी ही बातमी मग बरेच दिवस चघळली जाते.

प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचं चिनी गुप्तहेराशी साटंलोटं?
ब्रिटनचं राजघराणं गेल्या काही दिवसांपासून शांत होतं. शांत होतं म्हणजे या राजघराण्याच्या संबंधित कुठलीही बातमी एवढ्यात ऐकायला मिळाली नव्हती. पण ‘शांत’ राहील ते राजघराणं कसलं! दर काही दिवसांत राजघराण्याच्या संबंधित काही तरी ‘बातमी’ बाहेर फुटते आणि अख्ख्या जगभर त्याची चर्चा होते. कारण राजघराण्यात एवढंस्सं कुठे खुट्ट जरी झालं, तर जगाचे कान त्याकडे टवकारलेलेच असतात आणि लगेचंच ती बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरते. केवळ ब्रिटनच्या नागरिकांच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांसाठी ही बातमी मग बरेच दिवस चघळली जाते.
कारण काहीही असलं तरी या राजघराण्याला खूप माेठं वलय आहे, त्याला शतकानुशतकांचा इतिहास आहे. त्यामुळे लोकांचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असतं. यावेळची ‘बातमी’ आहे ती म्हणजे ब्रिटनचे प्रिन्स आणि चिनी ‘उद्योजक’ गुप्तहेर यांचे निकटचे संबंध असल्यासंदर्भातली. अर्थातच, हे प्रिन्स म्हणजे किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स ॲण्ड्र्यू. चिनी गुप्तहेर यांग टेंगबो याच्यासोबत असलेल्या त्यांच्या अति जवळच्या संबंधांबद्दल आता खुद्द ब्रिटनमधूनही नाराजी आणि काळजी व्यक्त केली जात आहे. यांग टेंगबो याच्यावर चीनसाठी जासुसी करण्याचा आरोप बऱ्याच काळापासून आहे. ब्रिटनची संवेदनशील माहिती चोरून तो ती चीनला पुरवतो असं म्हटलं जातं. असं असतानाही प्रिन्स ॲण्ड्र्यू यांग याच्याशी संबंध का ठेवतात? त्यांचं ‘नातं’ नेमकं काय आहे? यांगला भेटण्याची गरज त्यांना का पडते? त्यांच्यात काही आर्थिक लेण-देण आहे का? ब्रिटनची संवेदनशील माहिती यांगला, पर्यायानं चीनला पुरवण्यात प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचा तर हात नाही ना?.. असे असंख्य प्रश्न यामळे निर्माण झाले आहेत..
चिनी गुप्तहेर यांग टेंगबो आतापर्यंत ‘एच-६’ या कोडनेमनं ओळखला जात होता. त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं आणि तो नेमकं काय करतो, तो कोण आहे, याबद्दलही कोणालाही कोणतीही कल्पना नव्हती. कारण आधी न्यायालयाचाही तसा आदेश होता, पण अलीकडेच न्यायालयानं हा आदेश दूर केला आणि त्याचं नाव सार्वजनिक करण्याची मुभा दिली. त्यामुळेच जासूस ‘एच-६’ म्हणजे कोण, त्याचं प्रत्यक्ष नाव काय, ही माहिती सगळ्यांना कळली.
या चिनी गुप्तहेराशी राजघराण्याच्याच राजपुत्राशी संबंध आहे, म्हटल्यावर जगभरात ही बातमी न गाजते तरच नवल. त्याचे पडसाद राजघराण्यावरही उमटले. त्यामुळेच या आरोपानंतर ब्रिटिश राजघराण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘ख्रिसमस फेस्टिव्हल’पासून प्रिन्स ॲण्ड्र्यू यांना दूर ठेवण्याचा निर्णय राजघराण्यानं घेतला आहे. प्रिन्स ॲण्ड्र्यू यांना या महोत्सवापासून आता दूर राहावं लागेल. त्यांना त्यात सहभागी होता येणार नाही. तसा निरोप आणि ‘आदेश’ही त्यांना देण्यात आला आहे.
प्रिन्स ॲण्ड्र्यू हे ब्रिटनच्या माजी महाराणी एलिझाबेथ यांचे तृतीय चिरंजीव आणि किंग चार्ल्स यांचे मधले बंधू. प्रिन्स ॲण्ड्र्यू यांना ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ असंही म्हटलं जातं.
प्रिन्स ॲण्ड्र्यू यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयानं या आरोपांसंबंधात स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, प्रिन्स ॲण्ड्र्यू यांनी यांग यांची अधिकृतपणे भेट घेतली होती. त्यात काहीही चोरीछुपे नव्हतं. प्रिन्स ॲण्ड्र्यू यांनी यांगशी कोणत्याही संवेदनशील विषयावर चर्चा केली नाही. त्यांच्यावर जे आरोप होताहेत त्यात काडीचंही तथ्य नाही.
याबाबत यांगचंही म्हणणं आहे, मी ब्रिटनमध्ये कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही. ब्रिटन आणि चीनमधील वाढत्या राजकीय तणावात मला बळीचा बकरा बनवलं जात आहे. मी कुठला, कुणाचा गुप्तहेर नाही आणि कोणासाठी कामही करीत नाही.
एका कन्ल्टन्सी फर्मचा संचालक असलेला ५० वर्षीय यांग ‘क्रिस यांग’ या नावानंही ओळखला जातो. ‘हॅम्प्टन ग्रुप इंटरनॅशनल’ ही कन्सलन्टन्सी कंपनी तो चालवतो. या कंपनीचा तो बऱ्याच काळापासून संचालक आहे. ही कंपनी ब्रिटिश कंपन्यांना त्यांच्या चीनमधील कामकाजासाठी सल्ला देण्याचं काम करते. ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांनी यांग हा ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे न्यायालयानंही यांगचं अपील फेटाळलं होतं. प्रिन्स ॲण्ड्र्यू यांना आरोपांच्या या जंजाळातून पारदर्शकपणे बाहेर यावं लागेल.
राजघराण्यावर पुन्हा एकदा शिंतोडे
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन आणि थेरेसा मे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांबरोबरही याआधी यांग दिसला आहे. यांग याचं वर्तनही कायम संशयास्पद राहिलं आहे. प्रिन्स ॲण्ड्रयू यांनी चिनी व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॅलेस चायना’ नावाचं एक व्यासपीठ तयार केलं होतं. यांग हा या व्यासपीठाशी संबंधित एक महत्त्वाचा घटक आहे. या संबंधांमुळे ब्रिटिश राजघराण्यावर पुन्हा एकदा शिंतोडे उडाले आहेत हे मात्र खरं.