आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा
By संदीप प्रधान | Published: January 21, 2020 06:30 AM2020-01-21T06:30:53+5:302020-01-21T06:31:46+5:30
ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नाही, अशी त्या साम्राज्याची एकेकाळी ख्याती होती. कालौघात अनेक राजेरजवाडे भूतकाळात जमा झाले व त्यांची साम्राज्ये लयाला गेली.
- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक)
ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य मावळत नाही, अशी त्या साम्राज्याची एकेकाळी ख्याती होती. कालौघात अनेक राजेरजवाडे भूतकाळात जमा झाले व त्यांची साम्राज्ये लयाला गेली. मात्र अधिकारांना कात्री लागलेली असली तरी ब्रिटनमधील राजघराण्याचे महत्त्व अजूनही चांगलेच टिकून आहे. त्या घराण्यातील राजपुत्र हॅरी व अभिनेत्री असलेली पत्नी मेगन यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या (एक्झिट) करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता यापुढे ‘हिज अँड हर रॉयल हायनेस ड्यूक अँड डचेस आॅफ ससेक्स’ या उपाधीचा त्यांनी त्याग केला आहे. त्यांना त्यांच्या कर्तव्यपालनाकरिता सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही.
हा निर्णय घेताना हॅरी यांनी केलेले निवेदन व हॅरी यांची आजी, ९३ वर्षीय महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी केलेले वक्तव्य पाहिले तर हा निर्णय घेण्यापूर्वी बकिंगहॅम पॅलेसमध्ये बराच खल झाल्याचे दिसते. कदाचित नातू व नातसुनेने घेतलेला हा निर्णय एलिझाबेथ यांनी छातीवर दगड ठेवून स्वीकारला आहे. अर्थात, तसेही हॅरी हे ब्रिटनच्या राजघराण्याचे महाराज घोषित होणे अशक्य आहे. महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) या वृद्धत्वाकडे झुकलेल्या असल्या तरी दैनंदिन कर्तव्ये पार पाडत आहेत. त्यांचे पुत्र व राजगादीचे वारस प्रिन्स चार्ल्स हे उतारवयाकडे झुकलेले असले तरी एलिझाबेथ यांच्या पश्चात त्यांच्याकडे सूत्रे येणे क्रमप्राप्त आहे. मात्र त्यांनीही कॅमेला पार्कर या घटस्फोटित महिलेशी विवाह केलेला असल्याने त्यांना ही संधी न देता त्यांचे पुत्र विल्यम यांच्याकडे ब्रिटनच्या राजगादीची सूत्रे जाऊ शकतात. विल्यम यांना दोन पुत्र असल्याने भविष्यात तेच या राजघराण्याचे वारस घोषित होतील, अशी चिन्हे आहेत. हे सर्व स्पष्ट दिसत असल्यानेच कदाचित हॅरी व मेगन यांनी राजघराण्याच्या गुदमरून टाकणाऱ्या बंधनांना झुगारून एक मोकळे व खुल्या वातावरणातील जीवन जगण्याचा निर्णय घेतला असावा. अर्थात, हे खुले जीवन जगताना स्वैर जगण्याची मुभा उभयतांना नाही. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे वर्तन न करण्याचे बंधन त्यांच्यावर असेल.
ब्रिटनच्या या राजघराण्यात बंडखोरी करून एका अमेरिकन विधवेशी विवाह करण्याचे धाडस आठवा एडवर्ड यांनी केले. त्यामुळे त्यांना राजगादीवर तुळशीपत्र ठेवावे लागले. ही १९३६ सालातील घटना आहे. आपल्याकडील मागासलेपणा अधोरेखित करण्याकरिता बरेचदा ब्रिटन, अमेरिकेतील दाखले दिले जातात. परंतु भारतातील समाजसुधारकांनी विधवा विवाहासाठी कितीतरी अगोदर आग्रही भूमिका घेतली होती व ब्रिटनचे राजघराणे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विधवा स्त्रीला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. पाचव्या जॉर्जचे पुत्र असलेल्या आठव्या एडवर्ड यांना या कारणास्तव सत्ता सोडायला लागल्यावर सहावे जॉर्ज यांच्या दोन कन्यांपैकी थोरली एलिझाबेथ (द्वितीय) या महाराणी झाल्या. ब्रिटनच्या या राजघराण्यात दुसरे बंड प्रिन्सेस डायना हिने केले. डायना या स्वप्नाळू होत्या व त्यांनाही राजघराण्याचा काटेरी मुकुट असह्य झाला होता. त्यामुळे त्यांचे स्वैर जगणे हे सासूबाई असलेल्या एलिझाबेथ यांना रुचत नव्हते. त्यातच चार्ल्स यांचे कॅमेला यांच्याशी असलेले संबंध हेही डायना यांना अस्वस्थ करीत होते. या राजघराण्यावर माध्यमांचे व मुख्यत्वे मसालेदार बातम्यांकरिता ओळखल्या जाणाºया टॅब्लॉइडचे बारीक लक्ष असते. हॅरी यांनी आपल्या आईच्या डायना यांच्या अपघाती मृत्यूचा उल्लेख करून मीडियाच्या सतत असलेल्या नजरेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
राजघराण्यात जन्माला येणा-या व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचाही अधिकार नाही, ही खरोखरच शोकांतिका आहे. स्वत:चा कोंडमारा झाला तरी चालेल; पण सार्वजनिक मतांचा आदर ठेवण्याचा दबाव राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीवर असतो. यातूनच ‘रॉयल ब्लड’ टिकवून ठेवण्याचे अवडंबर माजवले गेले आहे. ब्रिटिश राजघराण्यातील व्हिक्टोरिया राणीचे व विद्यमान एलिझाबेथ राणीचे पती हेही जर्मन वंशाच्या राजघराण्यातील होते. आपल्याकडील मुघल राजांनी आपल्या कन्यांचे विवाह इराणी व तुर्की राजघराण्यातच केले. आपण पेशव्यांच्या रक्ताचे नाही, या जाणीवेतून सवाई माधवराव यांचा झालेला मृत्यू असे अनेक दाखले राजघराण्यातील प्रेम, शरीरसंबंध व त्यातून होणारी घुसमट व्यक्त करतात. हॅरी व मेगन यांनी सोन्याचा पिंजरा सोडला असला, तरी भूतकाळ त्यांचा पाठलाग करेलच. त्याही स्थितीत ते पुढील आयुष्यात मोकळा श्वास घेतील, अशी अपेक्षा करूया.