कारागृहांचे सुधारगृह करणारे कृतिशील महात्मा गांधी, मानवी हक्क उल्लंघनाविरोधात सातत्याने निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:09 AM2017-10-01T03:09:10+5:302017-10-01T03:09:52+5:30

१८९४ चा कारागृह कायदा आणि १९५८ चा  probation of offender  कायदा, याशिवाय अजूनही आपण खूप पुढे जाण्याचा प्रयत्न आजही करीत नसताना, महात्मा गांधींनी सुधारणांचा उद्देश असलेला कारागृह कायदा असावा, असे सुचविले होते.

Prisoner Reformer Mahatma Gandhi, consistent statements against human rights violations | कारागृहांचे सुधारगृह करणारे कृतिशील महात्मा गांधी, मानवी हक्क उल्लंघनाविरोधात सातत्याने निवेदने

कारागृहांचे सुधारगृह करणारे कृतिशील महात्मा गांधी, मानवी हक्क उल्लंघनाविरोधात सातत्याने निवेदने

Next

-  अॅड. असीद सरोदे

१८९४ चा कारागृह कायदा आणि १९५८ चा  probation of offender  कायदा, याशिवाय अजूनही आपण खूप पुढे जाण्याचा प्रयत्न आजही करीत नसताना, महात्मा गांधींनी सुधारणांचा उद्देश असलेला कारागृह कायदा असावा, असे सुचविले होते. कारागृहांच्या भिंतींमध्ये होणा-या मानवी हक्क उल्लंघनाविरोधात सातत्याने निवेदने आणि अर्ज देण्याचे काम गांधींनी आफ्रिकेतील व भारतातील कारागृहात केले. २ आॅक्टोबर रोजीच्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांचे विचार कारागृहात रुजविण्यासंबंधीच्या अनुभवावर आधारित लेख.

ज्या व्यक्तींनी गुन्हा केला आहे किंवा ज्यांच्या हातून अनावधानाने, परिस्थितीवश गुन्हा झाला आहे, अशांच्या व्यक्तिगत सुधारणांवर मन:पूर्वक काम करण्यात यावे, कैद्यांना नवीन आत्मविश्वासासह पुन्हा समाजात परत जाऊन जीवन जगता आले पाहिजे, अशा प्रकारच्या कारागृह सुधारणा सुचविणारा एकमेव विचारवंत म्हणून महात्मा गांधी यांचे नाव घ्यावे लागते. स्वतंत्र चळवळीत सगळ्यात अधिक काळ तुरुंगात घालविलेल्या या नेत्याने, कारागृहांना ‘सुधारगृह’ करावे, हा विचार अनेकदा ठामपणे मांडला. महाराष्ट्र कारागृह विभागाने ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ हे ब्रीद आपल्या कार्यपद्धतीचा आधार मानले आहे, परंतु सुधारणा आणि पुनर्वसन या विषयी होणारे काम अत्यंत नगण्य स्वरूपाचे आहे.
या पार्श्वभूमीवर मी जेव्हा पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात मोफत कायदेविषयक देण्याचे काम सुरू केले, तेव्हा सतत जाणवले की, अनेक कैद्यांच्या मनात बदल्याची भावना आहे, कुणाचा तरी राग मनात घेऊन जगणाºयांचे ते एक चार भिंतीमधील लोकांचे गाव कसे सुधारायचे? सुदैवाने मला काही चांगले कारागृह अधिकारी भेटले आणि त्यांनी प्रोत्साहन दिल्याने मी एक नवीन प्रयोग करायचे ठरविले. कैद्याच्या मनात स्वत:ला सुधारण्याची आकांक्षा निर्माण करण्यासाठी काहीतरी जबरदस्त प्रेरणा आवश्यक होती. ती प्रेरणा महात्मा गांधींच्या विचारात ठासून भरल्याचे मला जाणवले आणि मग सुरू झाले, कारागृहातील कैद्यांसोबत माझे सत्याचे प्रयोग. २००३ साली भारतात सर्वप्रथम पुण्यातील येरवडा कारागृहात हा परिवर्तनाचा प्रयोग सुरू झाला. एक अत्यंत साधा माणूस असलेला, सर्वसामान्य चुका ज्याच्या हातून घडल्या, ज्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि इतर अनेक चुका केल्या. त्या माणसाने त्या चुका सुधारत स्वत:ला स्वराज्य चळवळीतील एक अग्रणी नेता म्हणून लोकमान्यता मिळवीत, ‘महात्मा’ बनण्याचा करिष्मा केला, हे सगळे कारागृहातील कैद्यांना आकर्षक वाटणे नैसर्गिक होते. आपणही असे चांगले होऊ शकतो, हा विश्वास कैद्यांमध्ये निर्माण झाला, परंतु तो कायम राहणे आणि त्यांनी महात्मा गांधींची काही पुस्तके वाचून त्यांच्या विचारांवर आधारित परीक्षा देणे आवश्यक होते. म्हणून मग आम्ही समाजातील अनेक लोकांना कारागृहात कैदी बांधवांशी चर्चा करण्यासाठी नेणे सुरू केले. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, राम शेवाळकर, अमृता सुभाष, नारायणभाई देसाई अशा अनेकांनी वेळोवेळी कैद्यांशी गांधी विचारांसंदर्भात संवाद साधला. आम्ही परीक्षेच्या आधी येरवडा कारागृहातील ‘गांधी यार्ड’मध्ये अभ्यास वर्ग चालविले. कैदी बांधव सामूहिक वाचन करायचे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. जेव्हा विविध पत्रकारांनी या परीक्षेला बसलेल्या कैद्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी सांगितले की, जर आम्हाला कुणी आधीच गांधीजींचे विचार सांगितले असते, तर आमच्या हातून कदाचित गुन्हे घडले नसते. जेव्हा आम्ही सर्वेक्षण केले, तेव्हा याच कैद्यांनी सांगितले की, आम्हाला जर संधी मिळाली, तर आम्ही आमच्या हातून ज्यांच्या संदर्भात गुन्हा घडलेला आहे, त्यांची आणि त्यांच्या परिवारातील लोकांची माफी मागू. तेव्हा गांधी विचारातील ताकद मला दिसू लागली. मानसिक पुनर्वसनाचा एक अत्यंत परिणामकारक प्रयोग म्हणून आम्ही घेतलेल्या या उपक्रमाची चर्चा झाली आणि मग माझी बहीण अ‍ॅड. स्मिता सिंगलकर आणि रवींद्र भुसारी यांनी नागपूरच्या कारागृहात हा प्रयोग सुरू केला. त्यानंतर, अनेक कारागृहांत ही गांधी विचार परीक्षा सुरू झाली. पुनर्वसन करायचे म्हणजे केवळ शरीराचे करायचे, असे प्रचलित असताना, मानसिक पुनर्वसन अधिक महत्त्वाचे आहे, हे ठासून सांगणारा हा गांधींच्या सत्याचा प्रयोग खरे तर महाराष्ट्र शासनाने आणि कारागृह विभागाने सर्वत्र सुरू करायला हवा होता. परंतु गैरलागू मुद्द्यांवर राजकारण करण्यात मश्गूल असलेल्या राजकीय लोकांना तरी कुठे, कधी महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व वाटले आहे? त्यामुळेच ज्यांचा गांधी विचारांशी कधीही संबंध नव्हता, असे लोक महात्मा गांधींचे वैचारिक अपहरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही तथाकथित गांधीवादी लोकांनी हे कारागृहातील काम प्रचारकी आहे, असा आरोप केला, परंतु मला हा प्रयोग गांधींना कृतिशील म्हणून मांडणारा वाटला.
संजय दत्तने ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा सिनेमा केल्याने तो गाजला होता आणि नेमके त्यानंतर त्याला कारागृहात यावे लागले. मी आणि माझा सहकारी संजय जाधव दोघे कारागृहात संजय दत्तला भेटलो. त्याला पटविले की, त्याने सिनेमातील गांधीगिरी चांगलीच चर्चेत आणली आणि आता त्याने प्रत्यक्ष गांधी विचार परीक्षा द्यावी. त्याने होकार दिला. दाऊद गँगमधील अनेक कैद्यांपासून ते अतिरेकी असलेल्यांपर्यंत अनेकांनी गांधी विचार परीक्षा दिली, परंतु संजय दत्तला जामीन मिळाला, त्यामुळे तो परीक्षा देऊ शकला नाही. आधी काँग्रेस सरकारने, शिवसेनेने आणि आता भाजपानेसुद्धा संजय दत्तला मदत केली आणि त्याला चांगली वागणूक असल्याच्या कारणाने शिक्षेत सूट देण्यात आली. मला वाटते की, ‘चांगली वागणूक’ म्हणजे काय, हे ठरविण्याचे अनियंत्रित अधिकार सरकारला देणे चुकीचे आणि अनेक गरीब कैद्यांवर अन्याय करणारे आहे. विषमता संपविण्यासाठी चांगली वागणुकीचे मूल्यांकन करणारी एक समिती असावी. गांधी विचार परीक्षा हा एक मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग म्हणून स्वीकारावा. स्वातंत्र्याला एक अत्यंत महाग वस्तू बनवून टाकलेल्या व्यवस्थेत पारदर्शकता आणली, तरच कारागृहे सुधारगृहे बनतील.

वर्तन परिवर्तन करण्याची जी ताकद गांधी विचारांमध्ये आहे, ती इतर विचारांमध्ये कदाचित नसेल. ज्यांच्या हातून हिंसा झाली, त्यांनी कारागृहात अहिंसेचे महत्त्व जाणून घ्यावे आणि सत्य वागायचे ठरविले की, अहिंसा आपोआप शिकता येते, असे सार सांगावे, हा गांधी विचारांचा विजय त्यांच्या विचारांची कालातीत प्रासंगिकता दाखविणारा भाग आहे.

काही तथाकथित
गांधीवादी लोकांनी कारागृहातील कैद्यांच्या विचार परिवर्तनाचे काम हे निव्वळ प्रचारकी थाटाचे आहे, असा आरोप केला, परंतु मला हा प्रयोग गांधींना कृतिशील म्हणून मांडणारा वाटला. ‘गुन्ह्यांचा तिरस्कार करा. गुन्हेगारांचा नाही,’ असे गांधी सांगत. त्यातील अर्थ प्रत्यक्षात आणणारे अनेक चांगले अधिकारी आजही कारागृहात कार्यरत आहेत. त्यांना संधी मिळायला हवी.

Web Title: Prisoner Reformer Mahatma Gandhi, consistent statements against human rights violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.