प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:45 AM2022-09-23T09:45:15+5:302022-09-23T09:45:53+5:30

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत

Priyanka Chopra says, the crisis in the world is serious! | प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

Next

“आज जगात ‘विश्वबंधुता’ या मूल्याची जितकी गरज  आहे तेवढी याआधी कधीही नव्हती.” असे विधान प्रियांका चोप्राने २० सप्टेंबर रोजी संयुक्त विश्वसंघाच्या संसदेत केले. प्रियांका चोप्रा गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ ‘युनिसेफ’ची सदिच्छादूत म्हणून काम करते. या काळात तिने अनेक सामाजिक संस्थांना भेटी दिल्या आहेत आणि अनेक ठिकाणी ‘युनिसेफ’ची प्रतिनिधी म्हणून भाषणदेखील केलेले आहे. मात्र, तिच्या २० सप्टेंबर रोजी केलेल्या या भाषणाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. कारण, या भाषणात तिने काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले आहेत. या भाषणात प्रियांका चोप्रा म्हणाली,  “कोरोनानंतरच्या काळात जगात, माणसांच्या आयुष्यात फार जास्त उलथापालथ झाली आहे. काेरोनाने कित्येक लोकांचे बळी घेतले. त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबीयांना पुढे टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगाराच्या संधीदेखील या काळात त्यांच्याकडून हिरावल्या गेल्या. सगळ्या जगाची आर्थिक गणिते कोविडने उलटीपालटी करून टाकली; पण जगावरचे संकट काही फक्त तेवढेच नाहीये!’’
प्रियांकाने या संकटाची तपशीलवार मांडणीही या व्यासपीठावरून केली.

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत. बदलता पाऊस, खूप जास्त उन्हाळा किंवा थंडी या सगळ्यातून माणसांच्या आयुष्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेती, पशुपालन अशा उद्योगांवर तर परिणाम होतोच आहे; पण अनेक उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक बाबींवर जागतिक हवामानबदलाचा परिणाम होतो आहे आणि त्यामुळे जगभर लोकांचे रोजगार जात आहेत. रोजगाराच्या शोधात लोकांना स्वतःचे मूळ ठिकाण सोडून स्थलांतर करणे भाग पडतेय. एकीकडे भूकबळी आणि दुसरीकडे उत्पन्नातील रुंदावणारी दरी यामुळे लोकांच्या मनात अशांतता खदखदते आहे.  या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जगाचा मूळ आधारच डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 ‘‘आज असलेले जग निर्माण करण्यासाठी अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं कष्ट घेतले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर हे सगळेच ढासळताना दिसते आहे. अर्थात ही सगळी संकटे काही आपोआप आलेली नाहीत. आपल्या सगळ्यांचीच यातील अनेक प्रश्नांकडे केलेली डोळेझाक त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. हवामानबदल हे काही अचानक आलेले संकट नाही. तसेच गरीब आणि श्रीमंत यांच्या उत्पन्नातील दरी हे काही निसर्गनिर्मित संकट नाही. त्यामुळे आपण असं म्हणून शकत नाही की ही संकटे अचानक आली आहेत. ही संकटे निश्चितपणे सोडवता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सगळ्या जगाने एकत्र येऊन ठरलेला प्लॅन अमलात आणला पाहिजे. आपल्याकडे तो प्लॅन आहे! 

संयुक्त राष्ट्रसंघाचा सस्टेनेबल गोल्स ( शाश्वत मुल्य) हा तो प्लॅन आहे. जर सगळ्या जगाने या प्लॅनप्रमाणे वागायचं ठरवलं, तर आपण ही आलेली संकटे निश्चितपणे परतवून लावू शकतो” असा आशावादही प्रियांका चोप्राने व्यक्त केला. यापैकी प्रत्येक प्रश्नावर अनेक वेळा वेगवेगळे बोलले गेले आहे. मात्र प्रियांका चोप्राने या सगळ्या संकटांमधील अन्योन्य संबंध उलगडून दाखवल्यामुळे तिच्या या भाषणाची जगभर चर्चा होते आहे. त्याचबरोबर तिच्या या भाषणाच्या संबंधातील एक महत्त्वाचा भाग असा की बहुतेक लोकांची अपेक्षा असते की एखादी महिला, त्यातही एके काळी जगतसुंदरी असलेली महिला, त्यातही व्यावसायिक अभिनेत्री असेल तर ती जेव्हा बोलेल तेव्हा प्रामुख्याने महिलांचे प्रश्न मांडेल किंवा कुठलाही प्रश्न मांडताना महिलांना त्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. मात्र, प्रियांका चोप्राने तसे केलेले नाही. तिने मांडलेला विषय हा संपूर्ण मानवजातीला संबोधित करणारा आहे. त्याअर्थी तिने अजून एक समजूत खोडून काढली आहे. ख्यातनाम स्त्री जागतिक व्यासपीठावरुन बोलते आहे म्हणजे ती केवळ स्त्रियांचे  प्रश्न मांडणार याही कल्पनेला तिने सुरुंग लावला आहे.

१७ शाश्वत विकास उद्दिष्टे
गरिबी नाहीशी करणे, भूक मिटवणे, चांगले आरोग्य, उत्तम शिक्षण, स्त्री- पुरुष समानता, स्वच्छ पाणी व मलनिःस्सारण स्वस्त व स्वच्छ ऊर्जास्रोत, चांगले काम व आर्थिक वाढ, उद्योजकता, संशोधन व पायाभूत विकास, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे व समाज, जबाबदार उत्पादन व वापर, हवामानबदलावर कृती, पाण्याखालील सृष्टी, जमिनीवरील सृष्टी, शांतता, न्याय व भक्कम यंत्रणा, व्यवस्था आणि ध्येय गाठण्यासाठी भागीदारी.

Web Title: Priyanka Chopra says, the crisis in the world is serious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.