५० वर्षात प्रगती राहोच पण अधोगतीच दिसते
By admin | Published: December 22, 2016 12:14 AM2016-12-22T00:14:13+5:302016-12-22T00:14:13+5:30
आधुनिक भारतामध्ये जी काही मोजकीच पण प्रभावी व्यक्तिमत्वे होऊन गेली, त्यातीलच एक म्हणजे जयप्रकाश नारायण. ते विचारांनी
आधुनिक भारतामध्ये जी काही मोजकीच पण प्रभावी व्यक्तिमत्वे होऊन गेली, त्यातीलच एक म्हणजे जयप्रकाश नारायण. ते विचारांनी पक्के समाजवादी होते आणि इंग्रजांच्या विरोधातील ‘भारत छोडो आंदोलना’चे नायक होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी तीन महत्वाच्या भूमिका निभावल्या. पहिली म्हणजे एक कामगार नेता. दुसरी भूमिका समाजवादी पक्षाचा आणि सर्वोदयाचा कार्यकर्ता. या भूमिकेत त्यांनी काश्मीर, नागालँड आणि चंबळच्या खोऱ्यात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांची शेवटची आणि तिसरी भूमिका म्हणजे इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात उभारण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी चळवळीचे नेते.
समाजवादी कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती असताना त्यांना एकदा दिल्ली विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारोहास प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. मी याच विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. हा समारोह २३ डिसेंबर १९६६ रोजी म्हणजे आजपासून पन्नास वर्षांपूर्वी पार पडला होता. जेपींनी त्यांच्या भाषणाला सुरुवातच मुळी देशातील उच्च शिक्षणाच्या असमाधानकारक स्थितीच्या उल्लेखाने केली. ते म्हणाले की, आजच्या परीक्षा पद्धतीत अभ्यासाकडे जे दुर्लक्ष होते, त्याकडे क्वचितच कुणी लक्ष देते. विद्यार्थी महाविद्यालयात अनियमित उपस्थित राहतात पण तरीही टिपणे आणि गाईड्सच्या आधारे उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण होतात. प्राध्यापक मंडळीदेखील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने विद्यार्जनासाठी प्रेरित करीत नाहीत किंवा त्यांनी तसे करावे यासाठी आपणहून पुढाकारही घेत नाहीत.
जेपींनी या भाषणात महाविद्यालयांच्या आवारातील राजकारणावरदेखील मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, राजकीय पक्षांना विद्यापीठात आपल्या शाखा उघडण्याचा जरुर हक्क आहे. पण त्यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी असला पाहिजे आणि त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने भेदभावरहित असायला हवे. म्हणजे त्या एकप्रकारे संलग्न विद्यार्थी संघटनाच असाव्यात.
नंतर आपल्या भाषणाचा रोख विद्यापीठांकडून वळवून त्यांनी समाजाकडे नेला. ते म्हणाले, सार्वजनिक जीवनातील वर्तनाच्या मापदंडांमध्ये आश्चर्यकारक घसरण झाली आहे. समाजाच्या सर्व अंगांमध्ये बेशिस्त आढळून येते आहे. या अध:पनास जेपींनी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले. कारण तोच पक्ष स्वातंत्र्यापासून सत्तेत होता आणि या पक्षाच्या स्वत:च्याच वर्तवणुकीत कमालीची घसरण झाली होती व त्याचेच प्रतिबिंब समाजात उतरले होते
राजकारणावरुन आपला रोख धर्माकडे वळविताना जयप्रकाश नारायण म्हणाले होते की, मी स्वत: धर्माने हिंदू असलो तरी हिंदू धर्माच्या आचरणातील काही बाबींमुळे मी चिंतीत आहे व हिंदू धर्मातील काही महत्वाच्या घटकांबाबत मला खूपच काळजी वाटते आहे. ते पुढे असे म्हणाले होते की, धर्मपरायणता ही आता केवळ अनैतिक कृत्यांना दैवी परवानगी मिळवून घेण्याचे माध्यम म्हणून उरली आहे. यामध्ये काळा बाजार, करचुकवेगिरी, नफेखोरी इत्यादिंचा समावेश होतो. त्यांच्या मते बहुतांश हिंदू जनता, धर्मातील मोजक्या पौराणिक कथा, वेडगळ अंधश्रद्धा, अनेक वर्ज्य बाबी आणि अनिष्ट चालीरीती यांच्या पलीकडे जात नाही. हिंदू धर्मातील कर्मकांडांमुळे या धर्मात आता मानवी मूल्यांना पाठबळ देणारी तत्त्वे अभावानेच शिल्लक राहिली आहेत. १९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या प्रारंभ काळात या धर्मात सुधार घडवून आणणाऱ्या महान चळवळी झाल्या व त्यांनी मानवीमूल्यांच्या उभारणीसाठी खूप प्रयत्न केले. परंतु हिंदू धर्माभोवती निर्माण झालेल्या कर्मकांडांच्या कवचामुळे आता या धर्मातील गाभ्यात असलेली तत्त्वे अभावानेच शिल्लक राहिली आहेत.
जेपींना त्यांच्या भारतभराच्या भ्रमणात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे आपली पाळेमुळे घट्ट करुन बसलेली संकुचित जाती व्यवस्था. उक्तीपुरता वैदिक धर्माचा गौरव पण कृतीमध्ये मात्र जातीयवाद. याबाबत त्यांनी स्पष्टपणे असे म्हटले होते की, हिंदू धर्मातील सहिष्णुतेच्या तत्वाविषयी आपण अगदी सहजी बोलत असतो पण जेव्हां असंख्य पुरुष-स्त्रिया आणि मुलांची केवळ ते परधर्मीय आहेत म्हणून हत्त्या केली जाते, तेव्हा आपण साधी संवेदनादेखील दाखवीत नसतो.
जयप्रकाश यांचे हे निरीक्षण त्या काळाला जसे लागू होते तसेच किंबहुना त्याहून अधिक आजच्या काळाला ते तंतोतंत लागू पडते. एक हिंदू म्हणून त्यांना स्वत:ला त्या धर्मातील जीवनाधिष्ठित मूल्ये पुनरुज्जीवित व्हावीत असे वाटत होते. पण हिंदू समाजात मूलतत्ववादी लोक पुनरुज्जीवनाचे जे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे आपण भले राष्ट्र म्हणून एकत्र राहिलो तरी हिंदू समाज मागे फेकला जाऊन कालांतराने नष्ट होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. हिंदू धर्म हा चांगल्या आणि वाईट गोष्टींचे अजब मिश्रण आहे, तो जेवढा उदात्त, तेवढाच अनुदार आहे, तो अधिक बंधमुक्त तेवढाच धर्मांध आहे, असे जे मत जेपींनी व्यक्त केले होते त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्वाभाविकच आपण कोणता मार्ग स्वीकारतोे, आचरण कसे करतो आणि प्रसार कसा करतो यावरच हिंदू धर्माचे भविष्य आधारलेले आहे.
जेपींच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून झाली होती. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरसुद्धा जवाहरलाल नेहरु यांच्यासोबत त्यांचे संबंध मित्रत्वाचेच होते. नेहरुंच्या कन्या इंदिरा गांधी १९६६ साली पंतप्रधान होत्या, तरीही जेपींनी कुठलीही भीती न बाळगता उपस्थितांच्या हे लक्षात आणून दिले होते की स्वतंत्र भारताच्या नैतिक घसरणीत काँग्रेसचा मोठा सहभाग आहे. जेपी सत्ताधारी काँग्रेसवर अगदी निर्भयपणे टीका करीत असत. प्रसंगी त्यांची भूमिका मात्र त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात जाणारी असे. गोहत्या बंदीच्या मागणीसाठी साधू-संतांनी संसदेवर नेलेल्या मोर्चाला जेपींनी संबोधित केले होते. या मोर्चानंतरच दिल्ली शहरात १९४७ नंतरची सर्वात मोठी हिंसा घडून आली होती.
जेपी आज हयात असते तर त्यांनी गोरक्षकाना नक्कीच शांत केले असते. वर्तमान काळात हिंदुत्वावर बोलणारे अनेक गुरु निर्माण झाले आहेत. उच्च वर्गातील अनेक भारतीय प्रतिष्ठित त्यांच्याकडे व्यक्तिगत सल्ले घेण्यासाठी जात असतात. पण मला नाही वाटत जेपींवर अशा गुरुंचा काही प्रभाव पडला असता. सतत श्रीमंतांच्या आणि प्रभावी लोकांच्या गराड्यात वावरणाऱ्या या गुरूंनी समाजातील जातीय आणि लैंगिक समानतेसाठी काही विशेष केल्याचे आढळत नाही. या दोन्ही समस्या समाजात आजच्या २०१६साली जितक्या घट्ट आहेत तितक्याच त्या जेपींनी १९६६ साली दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर भाषण केले तेव्हांदेखील होत्या.
-रामचन्द्र गुहा
(ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)