विकृतीचा निषेध
By admin | Published: August 23, 2016 07:21 AM2016-08-23T07:21:27+5:302016-08-23T07:21:27+5:30
तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंतांबद्दल या पुस्तकात जे काही लिहिले आहे, त्यावरून ही साहित्यकृती नसून विकृती आहे
तुकाराम महाराज आणि राष्ट्रसंतांबद्दल या पुस्तकात जे काही लिहिले आहे, त्यावरून ही साहित्यकृती नसून विकृती आहे व ही बदमाशी जाणीवपूर्वक केली आहे, असे गुरुदेवभक्तांना वाटत असेल तर ते चुकीचे म्हणता येणार नाही
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ग्रामगीतेबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन विकृत लेखन करणाऱ्या निवृत्ती महाराज वक्ते या पंढरपूर निवासी लेखकाविरुद्ध विदर्भातील गुरुदेवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘संत तुकाराम महाराज, सदेह वैकुंठ गमन’ असे या पुस्तकाचे नाव आहे. संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज आणि ग्रामगीतेबद्दल या पुस्तकात जे काही लिहिले आहे, त्यावरून ही साहित्यकृती नसून विकृतीच आहे आणि ही बदमाशी जाणीवपूर्वक केलेली आहे, असे गुरुदेवभक्तांना वाटत असेल तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. संत विचारांबद्दल मतभेद असू शकतात. त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे व तसा अधिकार या महापुरुषांनी समाजाला कधीचाच देऊनही टाकला आहे. परंतु या वक्ते महाराजाने ग्रामगीतेला ‘संडास साफ करणारी गीता’ संबोधणे कुठल्या वैचारिक धर्मपरंपरेत बसते? या विकृत पुस्तकावर तातडीने बंदी आणावी आणि लेखकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, ही गुरुदेवभक्तांची मागणी म्हणूनच न्यायोचित ठरते.
समाजातील रुढी, परंपरा, अनिष्ट चालीरितींविरुद्ध बंड करणाऱ्या संतांना धर्मांधांनी नेहमीच छळले आहे. या जाचातून संत ज्ञानेश्वरांचीही सुटका झाली नाही. संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले नसून, त्यांचा खूनच करण्यात आला, हे सत्य इतिहास संशोधकांनी वारंवार सांगितले आहे. राष्ट्रसंत आणि त्यांच्या ग्रामगीतेने गावखेड्यातील दलित, बहुजनांना माणूसपण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या परिवर्तनाच्या गोष्टी रुढीपरंपरावाद्यांना नेहमीच खटकत असतात. त्यामुळे अधूनमधून असे विकृत लेखन प्रसिद्ध करायचे आणि समाजमन नासवायचे, असा निर्लज्जपणा जाणीवपूर्वक केला जातो. दलित, बहुजनांचे युगानुयुगांचे यत्न संपावेत हीच संत तुकाराम आणि राष्ट्रसंतांची तळमळ होती. भारतीय समाजव्यवस्था ही या वंचितांच्या कल्याणाची नव्हतीच. गुलामगिरी, दारिद्र्य आणि जातीव्यवस्था हा त्या व्यवस्थेला मिळालेला शाप होता. संपूर्ण व्यवस्था परिवर्तन केल्याशिवाय हा समाज सुखी होणार नाही हे वास्तव या संतांना ठाऊक होते. त्यामुळे मानवी जीवनाला गुलाम बनविणारा धर्म तुकाराम, ज्ञानेश्वरांनी जसा नाकारला तसाच तो संत कबीराने अव्हेरला. ग्रामव्यवस्थेतील ही विषमता नष्ट करून ती व्यवस्था बहुजनहिताय- बहुजनसुखाय करण्यासाठी राष्ट्रसंतांनी ‘ग्रामगीता’ या आधुनिक भगवद्गीतेची निर्मिती केली. बहुजनांच्या सर्वांगीण कल्याणाचा व्यापक आणि सखोल विचार त्यांनी ग्रामगीतेतून मांडला. दलितांच्या स्पर्शाचाही विटाळ होणाऱ्या धर्माभिमानी अधमांना ग्रामगीतेत झोडपून काढले आहे. मग त्यांना ती आपली कशी वाटणार?
ग्रामगीतेतील समाज परिवर्तनाचा क्रांतिकारी विचार तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचला तर आपली धर्मसत्ता धोक्यात येईल, ही भीती ज्यांना वाटते, तीच मंडळी अधूनमधून कुठल्या तरी महाराजांना हाताशी धरून विकृत लिखाणाचे असे कट-कारस्थान रचित असतात. तुकाराम महाराज किंवा गाडगेबाबांना वैकुंठाला पाठविण्याची, बहुजनांच्या संतांची निंदानालस्ती करण्याची ही विकृती शतकानुशतकापासून सुरु आहे आणि ती यापुढेही राहणार आहे. मात्र त्याचा प्रतिवाद करताना आपण केवळ प्रतिक्रियावादीच असावे का, असा प्रश्न या निमित्ताने गुरुदेवभक्तांनी आणि बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मनाला विचारण्याची गरज आहे. एरवी या संतांचे प्रबोधनात्मक विचार आपण वैयक्तिक जीवनात आचरणात आणण्याबाबत कद्रु असतो. कुटुंब, परंपरागत संस्कारांच्या दडपणाला शरण जात त्यांच्या क्रांतिकारक विचारांना रोज मूठमाती देत असतो. पण अशा एखाद्या विकृत लेखनाविरुद्ध मात्र लगेच पेटून उठतो. कारण असे पेटून उठणे, आपल्याला सोयीचे आणि परवडणारे असते. चळवळीच्या गतिशीलतेसाठी अनेकांना ते निकडीचेही वाटते. यापुढे त्या गतिशीलतेला विधायक कार्याची जोड दिली तर असे विकृत लिखाण करण्याची कुणी हिंमत करणार नाही. या ताज्या घटनेच्या निमित्ताने गुरुदेवभक्तांनी आत्मचिंतन करणे म्हणूनच गरजेचे आहे.
- गजानन जानभोर