निवडणुकीत राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांची आश्वासने आणि स्वप्ने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:26 AM2019-03-29T02:26:01+5:302019-03-29T02:58:34+5:30
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष व त्यांचे नेते जनतेवर आश्वासनांची खैरात करू लागतात. (यातली एक खैरात ऐन मतदानाच्या आदल्या रात्रीची व वेगळी असते. तिची ही चर्चा नाही.
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष व त्यांचे नेते जनतेवर आश्वासनांची खैरात करू लागतात. (यातली एक खैरात ऐन मतदानाच्या आदल्या रात्रीची व वेगळी असते. तिची ही चर्चा नाही. ती करण्यात अर्थ नाही. कारण ती साऱ्यांना ठाऊक आहे.) आताच्या निवडणुकांनीही जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. काँग्रेस व भाजपा हे दोन राष्ट्रीय पक्ष त्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्या आश्वासनांचे स्वरूप (निदान दिखाऊ) वेगळे आहे आणि ते विचारी मतदारांना अंतर्मुख करणारे आहे.
भाजपाच्या आश्वासनात राष्ट्रवादाची भावना, सर्जिकल स्ट्राइकचा सैनिकी पराक्रम, धर्म, मंदिर, गंगेची राहिलेली शुद्धी, पाकिस्तानला कधीतरी द्यावयाचा धडा आणि त्यासोबत बुलेट ट्रेन आणि मेट्रो यांची वेगवान स्वप्ने यांचा भरणा आहे, तर काँग्रेसची आश्वासने रोजगारीची वाढ, २० टक्के गरिबांना प्रत्येकी वार्षिक ७२ हजार रुपयांचे अनुदान, शेती व ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य यासोबत रोटी, कपडा, मकान आणि सन्मान यांचा विश्वास देणारी आहेत. थोडक्यात मोदींची आश्वासने स्वप्नवत राखणारी तर काँग्रेसची आश्वासने मानवी स्वरूपाची व मतदारांना जवळची वाटावी अशी आहेत.
मोदींच्या सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारांची कामे आपल्या नावावर खपवली व तसे करताना प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे एक पावसाळी आश्वासन दिले. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे, गंगेच्या शुद्धीचे व नागपूरच्या नाग या सांडपाण्याच्या नाल्यातून जहाजे नेण्याचे होते. ही सगळी आश्वासने स्वप्नासारखीच अखेरपर्यंत राहिली. मेट्रोचा भूलभुलैया व बुलेट ट्रेनची वेगवान आश्वासने फारच थोडी खरी व अर्धवट राहिली. काँग्रेसच्या आश्वासनांमध्ये फार भव्य वा दिव्य असे काही नाही. त्यात मंदिर वा ईश्वर नाहीत, असलेच तर त्यात मानवी प्रश्नांचे व गरजांचे प्रतिबिंब आहे. मोदींच्या आश्वासनात औद्योगिकीकरण होते. मात्र त्यांच्या कारकिर्दीत काही उद्योगपतीच तेवढे वाढले. औद्योगिक उत्पादन मात्र कमी झाले. नवे उद्योग आले नाहीत, विदेशी गुंतवणुकीचे नुसते आकडे आले, गुंतवणूक मात्र आली नाही, विषमता वाढली आणि बेरोजगारी साडेसहा कोटींवर गेली.
या राजवटीत वाढल्या त्या घोषणा, ५६ इंची आश्वासने आणि राणा भीमदेवी गर्जना. काँग्रेसने २०१४ च्या पराभवाच्या छायेतून बाहेर यायलाच फार काळ घेतला. पण त्या बाहेर येताच त्यांनी आपली पूर्वीची लढाऊ ओळख कायम ठेवली असल्याचेही साऱ्यांच्या लक्षात आणून दिले. अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने आश्वासने दिली, सामान्य माणसांना विश्वास वाटावा अशाच घोषणा केल्या आणि जनतेवर राज्य करण्याहून जनतेसोबत राहून विकासकार्य करण्याची आपली तयारी व इच्छा आपल्या हालचालीतून त्याने दाखविली. काँग्रेस हा १०० वर्षांचा लढाऊ इतिहास असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्याला लढण्याची सवय आहे. आश्वासने देण्याचा काळ त्याच्या वाट्याला फार उशिरा आला. मात्र आपल्या लष्कराची व अर्थदलाची मर्यादा लक्षात असल्याने त्याने आपल्या घोषणा-गर्जनांना आकाशाच्या वर उठू दिले नाही.
आताची राहुल गांधींची भाषणेही, त्यांना लोकांची मने समजून घ्यायची आहेत अशा स्वरूपाची असतात. उलट मोदींचे भाषण ‘मी तुम्हाला काही सांगायला व शिकवायलाच आलो आहे’ अशा स्वरूपाचे असते. कार्यकर्ते, सामान्य माणसात मिसळणारी नेतेमंडळी आणि राज्यकर्ते व सत्ता गाजवायला जणू जे जन्माला आले आहेत अशा दोन वर्गांतला हा फरक आहे. राजकीय पक्ष त्यांची सगळीच आश्वासने पूर्ण करतात असा इतिहास नाही. मात्र जी आश्वासने विश्वासार्ह वाटतात ती देणे आणि ‘आकाशातले तारे तोडून हाती देण्याची’ आश्वासने देणे यात फरक आहे आणि तो जनतेला कळणारा आहे. स्थानिक पक्ष, त्यांच्या प्रादेशिक गुंत्यातून अजून बाहेर पडत नाहीत आणि त्यांचे गुंते कधी संपतही नाहीत. सबब, राष्ट्रीय पक्षांच्या विजयाला साथ देणे वा न देणे इथपर्यंतच त्यांचा विचार येथे करता येतो.