प्रापंचिक प्रोत्साहन -पाथेय

By admin | Published: January 19, 2015 01:32 AM2015-01-19T01:32:45+5:302015-01-19T01:32:45+5:30

प्रपंचात क्षेत्र कोणतंही असो.. कला, क्रीडा, व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना प्रोत्साहन पाथेय ज्यांना भरभरून लाभतं ते भाग्यवंत!

Prop. Promotion | प्रापंचिक प्रोत्साहन -पाथेय

प्रापंचिक प्रोत्साहन -पाथेय

Next

कुमुद गोसावी - 

प्रपंचात क्षेत्र कोणतंही असो.. कला, क्रीडा, व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना प्रोत्साहन पाथेय ज्यांना भरभरून लाभतं ते भाग्यवंत! त्यांच्या यशाची गुरुकिल्ली! प्रोत्साहनात आंतरिक शक्ती जागवण्याचं सामर्थ्य असतं. अवाहनही असतं.
महाभारतातील एका प्रसंगी माता कुंती आपल्या पुत्रांना पांडवांना म्हणते, ‘धर्मराज! तुम्ही युद्धासाठी तयार नाही, असं ऐकते! हे तुम्ही काय करताय? मला भेकड पुत्रांची माता व्हायचं नाही! वीरमाता म्हणून घेणंच मला आवडेल. माझ्या पाचही पराक्रमी पुत्रांना मला आवर्जून सांगायचं आहे की, युद्ध करणं तुमचं कर्तव्य आहे नि ते तुम्ही करायलाच हवे!
यदर्थम् क्षत्रिया सुते तस्य कालोय मागत:!
एका वीरमातेनं आपल्या पाचही पुत्रांना असं प्रोत्साहित-पाथेयसोबत देऊन पुढं युद्धभूमीवर पाठवावं! तिथंच जन्मलेल्या श्रीमद् भगवद्गीतेतील महामंत्राला या प्रोत्साहनाचं कोंदण लाभावं! हे सारंच विलक्षण. हेच अध्यात्म!
खोली सागराची! उंची आकाशाची!
दृष्टी तेजाची! प्रोत्साहनाची!!
अशी चैतन्याची स्फुल्लिंग चेतवणारी प्रोत्साहनाची मशाल पेटवली गेल्यास भारतीय इतिहासात घडलेली अशीच महत्त्वाची घटना. एक आठ वर्षांचा बालक गुरूंच्या प्राप्तीसाठी मध्य प्रदेशात नर्मदेकाठी एका गुहेजवळ येतो. गुहेतून गोविंद स्वरूपात हे सिद्धपुरुष समाधीस्थितीतून बाहेर आल्यावर बाळ शंकराला भेटतात. त्याचं शिष्यत्व स्वीकारतात.
त्याला विधिवत संन्यास दीक्षा देतात.
एक दिवस गोविंदयती समाधीस्थितीत असताना अफाट पाऊस कोसळतो. कधीही गुहेत पाणी शिरू शकेल या भीतीनं सर्वच शिष्य घाबरतात! त्यांनी एकमुखानं बाळ शंकराचं ज्ञानतेज जाणून त्याला प्रोत्साहन देत म्हटलं,
‘बाबारे, तूच आता या समस्येवर एखादा मार्ग काढू शकशील! असा विश्वास आहे! शंकराचा शंकराचार्य झालेल्या या शिष्यानं मातीचा एक घडा घेतला नि त्या गुहेच्या दारात ठेवला! नर्मदेचा पूर ओसरेना; पण गुहेच्या दारात आलेलं पाणी शंकराचार्यानं ठेवलेल्या घड्यात जाऊन तिथंच सामावू लागलं! गुरूंना जेव्हा नर्मदापुराची ही घटना समजली तेव्हा ते म्हणाले,
वेदव्यासांनी सांगून ठेवलंय की, जो कोणी नदीच्या पुराचं पाणी एका घड्यात सामावू शकेल तोच ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहू शकेल! तेव्हा शंकराचार्य तू आता काशीला जा नि ब्रह्मसूत्रावर भाष्य लिही! गुरूंनी दिलेलं प्रोत्साहन पाथेय या आधारानं पुढं या आद्य शंकराचार्यांकडून ‘ब्रह्मसूत्र भाष्यरचना झाली! अशा प्रोत्साहन पाथेयाची आज विज्ञान युगातही संजीवनी कोणाला नको आहे.

Web Title: Prop. Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.