गोव्यात ‘प्रॉपर्टी’? - तुम्ही इकडे नाही आलात, तरच बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 08:01 AM2024-07-31T08:01:51+5:302024-07-31T08:02:27+5:30

दोनशे वर्षे जुनी पोर्तुगीजकालीन घरे ‘सेकंड होम’ म्हणून विकत घेण्याचा सपाटा लावलेले धनिक आणि बेजबाबदार पर्यटकांना गोयंकार वैतागले आहेत!

property in goa it is better if you do not come here | गोव्यात ‘प्रॉपर्टी’? - तुम्ही इकडे नाही आलात, तरच बरे!

गोव्यात ‘प्रॉपर्टी’? - तुम्ही इकडे नाही आलात, तरच बरे!

सदगुरू पाटील, संपादक, लोकमत, गोवा

गोवा हे फक्त सोळा लाख लोकसंख्येचे राज्य. मनाला मोह पाडणारे रूपेरी वाळूचे समुद्रकिनारे, फेसाळत्या लाटा, किनाऱ्यावर मस्त डुलणारे माड, मासेमारीत व्यस्त असलेल्या होड्या, सुशेगाद (आरामदायी) जीवनशैली, पांढरीशुभ्र चर्चेस आणि सुबक बांधणीने नटलेली मंदिरे हे सगळे म्हणजे गोवा. 
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेरा-चौदा वर्षांनी गोवा मुक्त झाला. पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षे राजवट या प्रदेशात होती. साहजिकच येथील वास्तुशास्त्रावर त्या संस्कृतीचा प्रभाव  आहे. 

सासष्टी, मुरगाव, बार्देश व तिसवाडी या चार तालुक्यांमध्ये पोर्तुगीजकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली अनेक घरे दिसून येतात. ही घरे विकत घेण्यासाठी आता जगभरातील धनिकांमध्ये स्पर्धा लागली आहे. मूळ गोमंतकीय व्यक्तीला गोयंकार म्हटले जाते. या गोयंकारांना गोव्यावर होणारे धनिकांचे अतिक्रमण आता छळू लागले आहे. सेकंड होम कल्चर गोव्यात प्रचंड वेगाने वाढत चालल्याने आपली अस्मिता व संस्कृती धोक्यात येते ही गोयंकारांची वेदना आहे. याच वेदनेतून आता पर्यटकांचा उपद्रवही लोकांना नकोसा वाटू लागला आहे.

गेल्या आठवड्यात गोवा सरकारच्या यंत्रणेने काही विंधनविहिरींना (बोअर वेल्स) टाळे ठोकले. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील डोंगरावर वीस-पंचवीस गर्भश्रीमंत परप्रांतीयांनी बंगले बांधले आहेत. यात दक्षिण भारतातील सिनेकलाकारांचा समावेश आहे. त्यासाठी खोदलेल्या विंधनविहिरींमुळे गावातील लोकांना पाण्याची समस्या जाणवू लागली. पंचायत क्षेत्रातील ग्रामसभेत विषय गाजला. सरकारी यंत्रणेने त्यावर कारवाई केली. दिल्ली, मुंबई, पुणे, हरयाणा, बंगळुरूमधील मोठे बिल्डर्स गोव्यात जमिनी खरेदी करत आहेत, मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड चालू आहे.  भराव टाकून शेतजमिनी बुजविल्या जात आहेत. अनेक आरटीआय कार्यकर्त्यांनी अलीकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. बांबोळी व परिसरात परप्रांतीय धनिकांच्या उपद्रवाविरुद्ध आमदार वीरेश बोरकर व इतरांनी आवाज उठवला आहे. गोवा विधानसभेतही यापूर्वी हा विषय उपस्थित झालेला आहे.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  एक महत्त्वाची कायदा दुरुस्ती अलीकडेच केली. परप्रांतीयांना गोव्यात शेत जमिनी खरेदी करणे शक्य होऊ नये म्हणून ही कायदा दुरुस्ती केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

देशातील बडे राजकीय नेते, उद्योजक, बॉलिवूड व टॉलिवूड स्टार, नावाजलेले क्रिकेटपटू, काही स्मगलर्स यांचे बंगले, सदनिका गोव्यात आहेत. सुट्ट्या घालविण्यासाठी ते गोव्यात येतात व आपल्या सेकंड होममध्ये राहतात. समुद्राचे विहंगम दृश्य पाहता यावे म्हणून अनेक धनिकांनी गोव्यातील डोंगरांवर किंवा किनाऱ्यांवर बांधकामे केली आहेत. याच विषयावरून स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे. असेच चालू राहिले, तर आपल्याला भविष्यात गोव्यात घर किंवा जमीन खरेदी करणे परवडणारच नाही अशी भीती गोमंतकीयांना वाटते. आताच मिरामार, दोनापावल, कळंगुट, कांदोळी, बागा अशा जगप्रसिद्ध किनारपट्टीत मूळ गोमंतकीयाला भूखंड खरेदी करणे परवडतच नाही. दोनशे वर्षे जुनी आकर्षक पोर्तुगीजकालीन घरे विकत घेण्याची टुम सध्या निघाली आहे. युरोपियन संस्कृतीचे आकर्षण असलेले देशभरातील धनिक ही घरे  खरेदी करून त्यांचे नूतनीकरण करत आहेत. परप्रांतांमधून येणारे बडे लोक जर गोव्यात स्थायिक होऊ लागले तर आपले अस्तित्व धोक्यात येईल ही चिंता गोयंकारांना सतावते. 

वर्षभरात सुमारे कोटीभर पर्यटक गोव्यात येतात. राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असली, तरी पर्यटकांच्या उपद्रवाला आता स्थानिक त्रासले आहेत. बाटल्यांचे ढीग आणि कचऱ्याचे डोंगर नकोसे झाले आहेत. गोव्यातील कळंगूट या ग्रामपंचायतीने नुकताच पर्यटकांवर कर लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वादाचा ठरला पण गोवा आता पर्यटकांचा उपद्रव खपवून घेण्याच्या स्थितीत नाही असा संदेशच या प्रकरणाने  दिला आहे.  
sadguru.patil@lokmat.com
 

Web Title: property in goa it is better if you do not come here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा