पुलामुळे समृद्धी आणि सामर्थ्यही
By admin | Published: May 28, 2017 12:15 AM2017-05-28T00:15:34+5:302017-05-28T00:15:34+5:30
आसाममध्ये भारतातील सर्वांत लांब म्हणजे साडे नऊ किमी लांबीच्या एका भव्य पुलाचे उद्घाटन २५ तारखेला झाले. लष्करीदृष्ट्या पूर्वांचलमधील अरुणाचल प्रदेशात चीनने
- यशवंत जोगदेव
आसाममध्ये भारतातील सर्वांत लांब म्हणजे साडे नऊ किमी लांबीच्या एका भव्य पुलाचे उद्घाटन २५ तारखेला झाले. लष्करीदृष्ट्या पूर्वांचलमधील अरुणाचल प्रदेशात चीनने वेढा घातलेल्या सरहद्दीपासून संरक्षणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या भागाला जोडणारा हा पूल युद्धकाळात साधनसामग्री, लष्करी साहित्य, दारूगोळा, इंधन, भारी वजनाच्या तोफा, रणगाडे आणि मिसाइल्सचीसुद्धा वाहतूक करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आपल्या भारतात रामायण आणि महाभारत काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे देशात पूलबांधणीचे तंत्र विकसित होत गेले. भारतात नद्यांच्या प्रवाहामुळे वाहतुकीला मोठाच अडथळा येत असे. तशाच उत्तर भारतात हिमालयाच्या २५ हजार फूट उंचीपासून प्रवाहात वाहत येणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज अशा नद्यांच्या प्रवाहाला प्रचंड वेग आणि जमीन, खडक कापत जाण्याची शक्ती असते. परंतु भारतात ब्रिटिशांच्या काळात रस्ते आणि लोहमार्गाचे काम सुरू झाल्यावर पूल बांधले जाऊ लागले. भारतीय अभियंत्यांना आणि कं त्राटदारांनासुद्धा जसजशा समस्या येत गेल्या तसतशा बांधकाम करत असताना आपल्या तंत्रज्ञानाच्या वापरात सुधारणा करण्याचा अनुभवही येत गेला. विशेषत: १०० वर्षांपूर्वी खाडी किंवा नदीच्या पात्रात काळ्या दगडाच्या कमानी उभारून काही ठिकाणी लोखंडी पत्रे आणि तुळया वापरून प्रत्येक ठिकाणचे भौगोलिक वैशिष्ट्य, प्रवाहाचा वेग, पुलाची रुंदी आणि पुलावरून होणाऱ्या वाहतुकीचा भार याचा विचार करून पूल बांधले जाऊ लागले.
आज भारतात रस्त्यावरील लाखो पूल असून, लोहमार्गावरसुद्धा ८० हजारांपेक्षा जास्त पूल आहेत. यातील अर्ध्या पुलांचे आयुष्यमान १०० वर्षांपेक्षाही जास्त आहे. आपल्या मुंबईत रस्ते बांधण्यास मर्यादा असल्यामुळे वेगवान वाहतुकीसाठी वांद्र्यापासून वरळीपर्यंत समुद्रातून जाणारा पूल उभारण्यात आला. त्याचबरोबर आता मुंबईपासून भर गर्दीच्या रस्त्याने ठाणे खाडीवरून नवी मुंबई, पनवेल, पेण अशा प्रकारे जवळजवळ ८० किमीचा वळसा घालून जाण्याऐवजी मुंबईच्या शिवडीपासून भर समुद्रात एलिफंटा बेटापासून ठाणे खाडीत थेट न्हावाशेवा बंदरापर्यंत समुद्रातून १४ किमी लांबीचा पूल उभारण्याचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हाती घेतला आहे. या आठपदरी पुलावरून केवळ रस्ताच नव्हे, तर रेल्वे व मेट्रो मार्गही उभारण्याची योजना आहे. त्यामुळे प्रवाहाचा वेळ १ तासाने वाचेल आणि १०० किती अंतरही कमी होईल. याचबरोबर देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर नद्या आणि खाड्यांवर तसेच भारताच्या सरहद्दीवरील संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना सैन्य दल आणि लष्करी सामग्रीची वाहतूक करण्यासाठी भारताच्या सीमेवर सेनादलाच्या वतीने बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन यांच्या वतीने चीन आणि पाकिस्तानने व्यापलेल्या प्रदेशावर पोहोचण्यासाठी दुर्गम भागात पूल उभारणी करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरच्या भागात जगातील सर्वांत उंच म्हणजे कुतुबमिनारच्या ५ पट उंच पूल चिनाब नदीवर रेल्वेकडून उभारला जात आहे. केवळ तांत्रिक कारणाखेरीज हा भाग भूकंपावर असल्यामुळे तसेच संरक्षणाच्या दृष्टीने पाकिस्तानच्या हद्दीपासून अवघ्या ५०-६० किमी अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी पूल उभारावा का यावर बरेच विचारमंथन झाले. या पुलाचे चालू असलेले कामही २ वर्षे थांबवले गेले. पण आता हळूहळू या पुलाच्या बांधकामानेसुद्धा वेग घेतला असल्याचे समजते.
पूल उभारणीचा हा इतिहास लक्षात घेतल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा अभिमान वाटत असला तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष, पूल उभारणीमधील भ्रष्टाचार आणि एकूणच शासकीय दिरंगाई आणि दुर्लक्ष यामुळे पूल कोसळून अपघात आणि दुर्घटनांचे प्रमाणही वाढत चालले आहे हे चिंताजनकच आहे.
आपल्या महाडजवळील सावित्री नदीवरील पूल कोसळून अपघात घडतो ही लाजिरवाणी बाब आहे. त्यातून नवे पूल उभारणीचा वेग कायम ठेवत असतानाच जुन्या पुलाची डागडुजी त्याचे सर्वेक्षण त्याची दुरुस्ती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचे मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यादृष्टीने गोव्यात काही दिवसांपूर्वीच कोसळलेला पूल हे उदाहरण या विभागातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरेल.
भारतात रस्ते, लोहमार्ग, मेट्रो आणि संरक्षण या सर्व क्षेत्रांत पूल उभारणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. या क्षेत्रातील आपल्या अभियंत्यांची जिद्द आणि तंत्रज्ञानातील प्रगती तोडीस तोड आहे. परंतु नव्या पुलाच्या उभारणीबरोबरच जुन्या पुलांच्या अवस्थेकडे सातत्याने लक्ष देणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.
हा पुल उभारण्यात अनंत अडचणी होत्या. केवळ उंचावरून येणारा प्रवाहच नव्हे, तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे आणि पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या महानद्यांना प्रचंड पूर आल्यामुळे काठावरील जमिनीची धूप तसेच ब्रह्मपुत्र नदीचे पात्रसुद्धा प्रवाहाने बदलल्यामुळे या नद्यांवर पूल उभारणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. तसेच दुर्गम भागात रस्त्यावरील पूल बांधताना जमीन खचणे, भूकंपग्रस्त क्षेत्र, भुसभुसीत मातीपासून पक्क्या कातळापर्यंत अनेक प्रकारे जमिनीचा प्रकार, दाट जंगल या सर्व कारणांमुळे हिमालयाच्या भागात पूल उभारणे हे एक मोठेच आव्हान ठरते. ते आव्हान आपल्या लोकांनी लिलया पेलत हा पूल उभारला.