राज्याचे सुदैव

By Admin | Published: May 26, 2017 01:34 AM2017-05-26T01:34:03+5:302017-05-26T01:34:03+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे

Prosperity of the state | राज्याचे सुदैव

राज्याचे सुदैव

googlenewsNext

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निलंगा येथे झालेल्या त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातातून सुखरूप बचावले असल्याच्या वृत्ताने सारा महाराष्ट्र सुखावला आहे. हा अपघात साधा नव्हता. त्यांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर ५० फुटांवरून जमिनीवर कोसळले होते व खाली येताना त्याला उच्च दाबाच्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला होता. त्याचे दोन सुटे भाग जमिनीवरही आले होते. स्वाभाविकच पेट घेण्याच्या वा कोसळून तुटण्याच्या बेतात असलेले ते वाहन सुखरूप जमिनीवर येणे आणि फडणवीसांना त्यांच्यासोबतच्या साऱ्यांसह सुखरूप बाहेर पडता येणे ही राज्यावर झालेली नियतीची कृपाच म्हटली पाहिजे. सारे राज्य सूर्याच्या प्रकोपाने काळवंडत असताना फडणवीस मात्र त्याच्या तालुक्या-तालुक्यात जाऊन तेथील विकासकामांची पाहणी करीत व जनतेच्या तक्रारी समजून घेत आहेत. रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंत आणि नाशिकपासून कोल्हापूर-सोलापूरपर्यंतची त्यांची ही उन्हाळी रपेट साऱ्यांच्या नजरेत भरण्याजोगी आहे. शिवाय ती पाहणाऱ्याच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर व आत्मीयता वाढविणारीही आहे. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने राज्याच्या ग्रामीण भागात एवढ्या अल्पकाळात एवढे वास्तव्य केले नसेल आणि त्या क्षेत्रातील कामांचे एवढे सखोल निरीक्षणही केले नसेल. त्यांच्या परिश्रमांना येऊ घातलेले यशही महाराष्ट्राला आता दिसू लागले आहे. दरदिवशी राज्याच्या एका लांबवरच्या भागात जाण्याचा व तेथील लहानसहान कामांचा आढावा घेण्याचा त्यांचा उत्साह व त्याविषयीची त्यांची बांधीलकी मोठी आहे. आपली दैनंदिन जबाबदारी चोखपणे पार पाडून एवढे सारे करीत असलेल्या या तरुण मुख्यमंत्र्याचे साऱ्यांना कौतुकही आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होणे व त्याचे स्वरूप गंभीर असणे हे त्याचमुळे साऱ्यांना धक्का देणारे आहे. हवेच्या वेगात त्वरेने झालेल्या बदलामुळे हा अपघात झाला आणि ते हेलिकॉप्टर टिनाचे पत्रे असलेल्या दोन घरांवर कोसळले हे वर्णनही त्याचे तीव्र स्वरूप सांगणारे आहे. अशा अपघातात या देशाने माधवराव शिंदे आणि वायएसआर रेड्डींसारखे महत्त्वाचे नेते याआधी गमावले आहेत. त्याचमुळेच फडणवीसांचे सुखरूप असणे त्यांच्या आप्तांएवढेच साऱ्या महाराष्ट्रालाही सुखावणारे आहे. या युवा नेत्याला त्याचमुळे प्रचंड दीर्घायुरारोग्य लाभावे आणि त्याच्या हातून महाराष्ट्राची आणखी मोठी सेवा घडावी, अशी शुभेच्छाच अशावेळी त्याला द्यायची आहे. त्याचवेळी ज्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला ते सरकारी मालकीचे असल्याने त्याची रीतसर चौकशी होणे व यापुढील काळात अशा उड्डाणांबाबत जास्तीची काळजी घेतली जाणेही आवश्यक ठरणार आहे.

Web Title: Prosperity of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.