मद्यविक्रीवरील बंदीपेक्षा जनजागृतीच प्रभावी ठरेल

By admin | Published: March 18, 2017 05:40 AM2017-03-18T05:40:05+5:302017-03-18T05:40:05+5:30

बिहार राज्य सरकारने नुकतीच मद्यविक्रीवरील बंदी आणली आहे. मद्य सेवन आरोग्याच्या दृष्टीने घातक असते, त्याच्या सेवनाने माणूस मनावरचा ताबा घालवतो

Public awareness will be effective only to ban alcoholic beverages | मद्यविक्रीवरील बंदीपेक्षा जनजागृतीच प्रभावी ठरेल

मद्यविक्रीवरील बंदीपेक्षा जनजागृतीच प्रभावी ठरेल

Next

- डॉ. भारत झुनझुनवाला

बिहार राज्य सरकारने नुकतीच मद्यविक्रीवरील बंदी आणली आहे. मद्य सेवन आरोग्याच्या दृष्टीने घातक असते, त्याच्या सेवनाने माणूस मनावरचा ताबा घालवतो तरी असे म्हटले जाते की मद्य सेवन केलेली व्यक्ती खोटे कधी बोलत नाही. खोटे बोलण्यासाठी मनावर लागणारा ताबा त्या व्यक्तीने घालवलेला असतो. त्याच्या मनातले विचार तो उत्स्फूर्तपणे प्रकट करत असतो. पण मद्य सेवन केलेल्या व्यक्तींच्या हातून अनेक दुर्दैवी अपघात, घरगुती हिंसा आणि तत्सम गुन्हेसुद्धा घडतच असतात. म्हणून तर हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती आणि इतर सर्व धर्मात मद्य सेवन निषिद्ध मानले जाते. आॅर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोआॅपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेचा अभ्यास तर या बाबतीत धोक्याची सूचना देणारा आहे. त्यांच्या अभ्यासात असे आढळले आहे की गेल्या दोन दशकात म्हणजे २०१२ सालापर्यंत भारतातील दरडोई मद्य सेवनाचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अभ्यासातसुद्धा असा निष्कर्ष निघाला आहे की, भारतातील मद्य सेवनाचे दरडोई प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे.
या उलट असणारी परिस्थिती अशीही आहे की, काहींसाठी मद्य सेवन गरजेचे असते. सत्तरच्या दशकात मी बंगळुरूच्या झोपडपट्टीत एक सामाजिक उपक्र म राबवत होतो. एका प्रकरणात असे आढळले होते की, एका कुटुंबाचा एकमेव कमावता व्यक्ती रोज मैलोंमैल पायी चालत रिकामे पत्र्याचे खोके आणि बाटल्या गोळा करत असे. तो घरी परततांना शारीरिक- मानसिकदृष्ट्या इतका थकलेला आणि उद्विग्न असायचा की, दुसऱ्या दिवशी कामावर परत जाण्यासाठी त्याला विश्रांतीची गरज असायची, पण ती मिळवण्यासाठी त्याला मद्य सेवन हाच एकमेव पर्याय असायचा. मद्यविक्रीवर बंदी घातल्याने अशा व्यक्तींना त्यांच्या गरजेच्या विश्रांतीपासून दूर ठेवण्यासारखेच होत असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवरसुद्धा मद्यविक्री किंवा सेवनावर लावलेली बंदी अयशस्वी ठरली आहे. १९२० साली अमेरिकेने अशी बंदी लावली होती पण त्यामुळे तिथे मद्य तस्करांचा सुळसुळाट निर्माण झाला होता. मद्य पुरवठा तसाच चालू होता, फक्त छुप्या पद्धतीने होता. ही बंदी १९३३ साली अमेरिकेने मागे घेतली होती. मी एकदा उदयपूर ते अहमदाबाद असा गाडीत उभा राहून प्रवास केलेला आहे. मी थकलेलो होतो आणि खूप विनंती करून ट्रक चालकाला माझ्या इच्छीत स्थळी सोडण्यास तयार केले होते. ट्रक चालक मध्येच एका ठिकाणी थांबला होता आणि त्याने ट्रकच्या टायरमध्ये मद्य भरून घेतले होते. गुजरातमध्ये अनेक मृत्यू अवैध मद्य सेवनाने होत असतात, त्यातून हेच प्रतीत होते की, मद्याचा पुरवठा नियमित केला पाहिजे.
केरळातील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने तेथील मद्य बंदी मागे घेण्याविषयी विचार चालू केला आहे. त्यांच्या आधी असलेल्या संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने ही बंदी लागू केली होती. तिथल्या महसूल मंत्र्यांनी बंदी उठवण्याचे समर्थन करतांना असे म्हटले आहे की, मद्य बंदीमुळे अंमली पदार्थांच्या सेवनाचे परिणाम वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे की, मुंबईत मद्यावर बंदीचे धोरण राबविल्याने तिथले गुन्हेगारी जगात फोफावले होते. त्यातून मग हाजी मस्तान, करीम लाला आणि नंतर दाऊद इब्राहिम यांचा उदय झाला होता. हप्ता वसुली हा सुद्धा मद्यतस्करीशी जुळलेला भाग आहे. सरकारने देशात सोन्याच्या आयातीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सोन्याच्या तस्करीत वाढ झाली होती पण आयातीवर परिणाम झाला नव्हता. शेवटी सरकारलाच आयात कायदेशीर करावी लागली होती. ही वास्तविकता हेच दर्शवते की, कायदेशीररित्या मद्यसेवन बंदी करणे अशक्य बाब आहे.
मद्याच्या व्यवसायातून राज्य सरकारांना २० टक्के महसूल प्राप्त होत असतो. बिहार सरकारने मद्य बंदीने निर्माण होणारी तूट भरून काढण्यासाठी कापड आणि मिठाईवर कर वाढवला आहे. या आधीचा अनुभव असा आहे की मद्य बंदीमुळे मद्याची तस्करी वाढत असते. जो पैसा राज्य सरकारने करांच्या रूपात संकलित करायचा असतो तोच मग काही भ्रष्ट पोलीस हप्त्यांच्या स्वरूपात गोळा करत असतात. या उलट राज्य सरकारे कापड आणि मिठाई सारख्या निरुपद्रवी वस्तूंवर करवाढ थोपवत असते. मद्यावरच्या बंदीचे अनेक विपरीत परिणामसुद्धा आहेत. मद्य सेवन करणाऱ्यांना ते अवैध पद्धतीने आणि जादा दराने विकत घ्यावे लागत असते. वेदनेने त्रासलेले लोक मद्य सेवन केल्यानंतर आराम मिळवत असतात, भलेही तो आराम तात्पुरता असो. त्यांना या बंदीमुळे आराम मिळणे दुरापास्त होऊन बसते. राज्य सरकारला महसुलातल्या तुटीचे परिणाम सहन करावे लागत असतात. यातून फायदा फक्त माफियांना तसेच भ्रष्ट पोलिसांना होत असतो. सरकारकडे यासाठी जनजागृती मोहीम राबवणे हा एकच पर्याय आहे. त्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत मद्याचे दुष्परिणाम पोहचवून त्यांना मद्य सेवनापासून परावृत्त करायला हवे.

Web Title: Public awareness will be effective only to ban alcoholic beverages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.