पब्लिसीटी स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 09:54 AM2018-06-06T09:54:55+5:302018-06-06T09:54:55+5:30
शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली.
- मिलिंद कुलकर्णी
शेतकऱ्यांचा संप हा पब्लिसीटी स्टंट आहे, या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याने देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कामगार यांचे संप यापूर्वी झाले आहेत. हे संप या घटकांच्या मागण्यांसाठी झाले. पण अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी संप केला तर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पोटा त का दुखते? शेतकऱ्यांनी संप करायला नको, असे वाटत असेल तर त्यांचे प्रश्न सोडवा, मागण्या मान्य करा ना! संपाची हेटाळणी, कुचेष्टा कशासाठी? अन्नदाता असूनही शेतकऱ्याने कधी जगावर उपकाराची भाषा केली नाही. स्वत:च्या उत्पादित मालाची किंमत न ठरविता येणारा जगातील एकमेव उत्पादक असूनही वर्षानुवर्षे तो हा अन्यात सहन करीत आहे. कडेलोट झाला म्हणून तो अलीकडे रस्त्यावर उतरला. आंदोलने केली. स्वत: उत्पादित केलेला शेतीमाल रस्त्यावर फेकायला काळजावर दगड ठेवावा लागतो, हे मंत्रिमहोदयांना कसे कळणार? नापिकी, कर्जाचा बोजा असह्य होऊन फास जवळ करणारा शेतकरी पब्लिसीटी स्टंट करीत आहे काय? शेतकऱ्यांची मुले म्हणून प्रशासन आणि शासनामध्ये कार्यरत मंडळी शेतकरी प्रश्नावर उदासीन असल्याचे पाहून शेतकरी चिडला तर तो पब्लिसीटी स्टंट म्हणणार काय?
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटकाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. स्वत:वरील अन्यायाला लोकशाही मार्गाने वाचा फोडण्याचा शेतकऱ्याला एक नागरीक म्हणून मुलभूत अधिकार असताना मंत्र्यांनी असे बेजबाबदारपणे विधान करणे चुकीचे आहे.
शेतकºयांच्या कृतीला पब्लिसीटी स्टंट म्हटले जात असेल तर देशातील राजकीय मंडळी, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी करीत असलेल्या करामती या ‘पब्लिसीटी स्टंट’ नाहीत काय? राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी एखादे आंदोलन हाती घेतले आणि तो प्रश्न सोडविला, असे ठळक उदाहरण लगेच आठवते काय? टोलबंदीचे आंदोलन मनसेने हाती घेतले होते. दोन-चार ठिकाणी तोडफोड झाली; पण टोलबंदी कायमस्वरुपी झाली काय? मराठी पाट्यांसाठी ‘खळ्खट्याक’ करण्यात आले, पण सगळ्या पाट्यांवर मराठी अक्षरे उमटली काय? हवामान शास्त्र विभागाच्या भाकिते, अंदाजांविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फिरकी घेत अंदाज खरा ठरला तर साखर वाटेल असे म्हटले. राष्टÑवादीच्या नेत्याने पुण्यात शास्त्रज्ञांकडे साखर पाठवून दिली. आता पाकिस्तानची साखर आयात करण्यात आल्याचा निषेध म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोदामांवर छापा टाकला. आचारसंहिता काळात शासकीय वाहन वापरता येत नाही, म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर हे स्वत:चे खाजगी वाहन असतानाही ‘रिक्षातून’ जातात आणि स्वत:ची छबी टिपली जाईल, याची काळजी घेतातच ना? शासकीय अधिकारीदेखील शासकीय वाहन सोडून कधी दुचाकीवर फेरफटका मारुन वृत्तपत्र छायाचित्रकारांचे कॅमेरे स्वत:कडे वळवितात ना? पोलीस अधीक्षक स्वत: वाहतूक नियंत्रण करायला उभे राहतात, किंवा एखाद्या दारु अड्डा किंवा जुगार अड्डयावर धाड टाकतात, तेव्हा ‘कर्तव्यकठोर’ अशी प्रतिमा मिडियात निर्माण होतेच ना?
आता हे सगळे ‘पब्लिसीटी स्टंट’ आहेत, असे म्हणायचे काय? एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे असेल तर आंदोलन, कारवाई, कृती असे हत्यार वापरावे लागते. तेच शेतकºयांनी वापरले. राजकीय पक्षांनी वापरले तर त्यांची कल्पकता म्हणायची आणि शेतकºयाने वापरले तर पब्लिसीटी स्टंट म्हणायचे, याला काय अर्थ आहे?