पुणतांबा ते नाशिक, नेतृत्वाचा प्रवास

By admin | Published: June 10, 2017 12:34 AM2017-06-10T00:34:17+5:302017-06-10T00:34:17+5:30

शेतकरी संघटनेच्या आंदोलनांनी अगोदरच मशागत करून ठेवलेल्या नाशिककडे सध्याच्या संपाचे केंद्र्र सरकले, ही बाब येथल्या लढाऊपणाबरोबरच समन्वयवादी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारीच आहे.

Punatamba to Nashik, the journey of leadership | पुणतांबा ते नाशिक, नेतृत्वाचा प्रवास

पुणतांबा ते नाशिक, नेतृत्वाचा प्रवास

Next

शेतकरी संघटनेच्या आंदोलनांनी अगोदरच मशागत करून ठेवलेल्या नाशिककडे सध्याच्या संपाचे केंद्र्र सरकले, ही बाब येथल्या लढाऊपणाबरोबरच समन्वयवादी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारीच आहे.
शेतकरी चळवळीची भरभक्कम पायाभरणी करून बळीराजाच्या प्रश्नासाठी आंदोलनाच्या ठिणगीची मशाल प्रज्वलित करण्याची परंपरा ज्या नाशिकला लाभली आहे, तेथेच सध्याच्या शेतकरी संपाचे केंद्र आकारास यावे हा केवळ योगायोग नाही, येथल्या उभरत्या नेतृत्वाच्या संयोजन कुशलतेचा व येथल्या मातीला लाभलेल्या नेतृत्वगुणांंचा तो परिपाक म्हणता यावा.
राज्यातील शेतकरी संपातून आकारास आलेली किसान क्रांती आता देशपातळीवर पोहचली आहे. लगतच्या मध्य प्रदेशातही या ‘क्रांती’चे लोण पसरले आहे. कारण शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वत्र एकसमान आहेत. या प्रश्नांनी काठिण्याची अशी पातळी गाठली आहे की, झेंडा कुठलाही असू द्या व नेतृत्व कुणाचेही असू द्या; बळीराजा स्वयंस्फूर्तीने एकवटतो आणि आपल्यावरील अन्यायाविरोधात एल्गार पुकारतो. सद्यस्थितीतील संपाबाबतही तसेच झाले. पुणतांब्यात या संपाची ठिणगी पडली आणि बघता बघता संपूर्ण राज्यात तिने मशालीचे रूप धारण केलेले दिसून आले. प्रारंभी यात कोणतेही प्रस्थापित नेतृत्व नव्हते. सामान्य शेतकऱ्यांनी पुढे होत संपाची हाक दिली, तिला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तो पाहता नेतृत्वाची भर पडत गेली आणि चळवळीचे स्वरूपही विस्तारले. परिणामी आंदोलनाची धग टिकून राहतानाच ती परिणामकारक ठरण्याचीही शक्यता वाढून गेली. ही परिणामकारकता केवळ कर्जमाफीपुरती व त्यासंबंधीच्या घोषणेपुरतीच मर्यादित नाही, तर एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी सरकारी घटकाकडून गांभीर्याने विचार होण्याबाबतही अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, शेतकरी संपाला लाभलेल्या प्रतिसादानंतर नेतृत्वाची जशी भर पडली तसे चळवळीचे केंंद्रही पुणतांब्यातून नाशकात सरकले, कारण नाशिकला शेतकरी लढ्याचा वारसा आहे. एेंशीच्या दशकात शरद जोशी यांनी याच नाशिक जिल्ह्यातून शेतीप्रश्नावर उठाव घडवून आणला आणि तोपर्यंत असंघटित राहिलेल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यात जाणिवांचे आणि अस्मितांचे अंगार चेतविले. कांद्याच्या भावासाठी तेव्हा घडवून आणलेल्या आंदोलनाने राज्य व केंद्रातील सरकारी सिंहासन तर हादरलेच; परंंतु शेतीच्या उत्पादन खर्चावर आधारित भावाचे अर्थकारण बळीराजाला उमगले, त्यातून जाणिवांची जी मशागत त्यावेळी झाली तीच आजच्या शेतकरी संपात नाशिकचा पुढाकार प्रस्थापित करून द्यावयास कारणीभूत ठरल्याचे म्हणता यावे.
पुणतांब्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या संपात किसान क्र्रांती समितीव्यतिरिक्त विविध शेतकरी संघटना उतरल्या. ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी, ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, रामचंद्रबापू पाटील, समाजसेवी बाबा आढाव, न्या. बी.जी. कोळसे पाटील, आमदार बच्चू कडू आदिंचे दिशादर्शन लाभले आणि त्याचे संयोजन केले गेले ते नाशकातून. त्यामुळेच या आंदोलनाचे केंद्र पुणतांब्यातून नाशकात सरकल्याचे बोलले जाणे स्वाभाविक ठरले. शरद जोशींच्या नेतृत्वात तयार झालेले कृषितज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढाऊ चेहरा म्हणून जिल्ह्यात परिचित असलेले हंसराज वडघुले, ‘डाव्या’ मुशीतून आलेले व आंदोलने नसानसांत भिनलेले प्रा. राजू देसले, सामाजिक चळवळीत पुढाकार घेणारे चंद्रकांत बनकर, अमृता पवार, नाना बच्छाव आदि सुकाणू समितीच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, ते कुशलतेने समन्वयाची भूमिका बजावत आहेत. अन्यही अनेकांचे हात त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळेच नाशिककडे ही संधी चालून आली. यातून राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच क्रीडाविषयक ओळख जपणाऱ्या नाशिकचा शेतकरी चळवळीच्या दृष्टीने असलेला लढाऊपणाचा वारसाही पुन्हा अधोरेखित होण्यास मदत घडून येते आहे, इतकेच या निमित्ताने.
- किरण अग्रवाल

Web Title: Punatamba to Nashik, the journey of leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.