संशोधनात पुढे पुणे !
By Admin | Published: July 10, 2017 12:04 AM2017-07-10T00:04:19+5:302017-07-10T00:04:19+5:30
पुणे तिथे काय उणे? असे गौरवाभिमानाने म्हटले जाते
पुणे तिथे काय उणे? असे गौरवाभिमानाने म्हटले जाते. फार कशाला, इथे चितळेंनी नुसते दुकान दुपारी उघडे ठेवले तरी त्याची ‘बातमी’ होते. तमाम राज्यासाठी तो चर्चेचा विषय होतो. पुणे ही सांस्कृतिक राजधानी तर आहेच. इथे जितक्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तितकी अन्यत्र क्वचितच दिसून येत असावी. याहीपेक्षा पुण्याची ओळख आहे ती विद्येचे माहेरघर म्हणून. ‘आॅक्सफर्ड आॅफ द इस्ट’ म्हणून गौरवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाने याची गरिमा कायम उंचावत नेण्याचे काम केले आहे. संशोधन आणि विकासातही गेल्या काही वर्षांत पुण्याने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत नावाजलेल्या अशा संशोधनसंस्था पुण्यामध्ये एकवटलेल्या आहेत. संशोधनाच्या क्षेत्रात नॅशनल केमिकल लॅबोरटरी (एनसीएल), जीएमआरटी, आयसर, आयुका, सीडॅक, आघारकर संशोधन संस्था आदी नामवंत संशोधन संस्थांनी पुण्याच्या लौकिकात भर घातली आहे हे निर्विवाद. ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्सच्या माध्यमातून जगभरातील मोठ्या संशोधन समूहाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिल्या शंभरात पुण्याला स्थान मिळाले आहे ही निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची अशी बाब आहे. आंतरराष्ट्रीय पेटंट रजिस्टर करण्यामध्ये पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने पुण्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवता आलेला आहे. भारतातील तीन संशोधन समूह शहराची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बंगळुरू ४३ व्या क्रमांकावर आहे तर मुंबई ९५ व्या क्रमांकावर आहे व पुण्याचा ९६ वा क्रमांक आहे. पुण्यातून गेल्या पाच वर्षांत तब्बल १ हजार ६ पेटंट फाईल झालेले असून त्यातील जवळपास निम्मी पेटंट एकट्या एनसीएलची आहेत. या मानांकनाच्या निमित्ताने एक नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मिळेल. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. नरेंद्र दधीच, डॉ. गोविंद स्वरूप, डॉ. विजय भटकर आदी जगविख्यात शास्त्रज्ञ ज्या पुण्यात राहतात ते पुणे संशोधनात उणे राहून चालणारच नाही. येणाऱ्या काळातही या पुण्याची संशोधनाच्या क्षेत्रातील घोडदौड अशीच सुरू राहावी आणि जगाच्या नकाशावर पहिल्या दहामध्ये पुणे-मुंबई ही शहरे झळकावीत, हीच सदिच्छा!