काम पाहून मते हे पंजाबचे नवे मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:42 PM2022-03-13T15:42:25+5:302022-03-13T15:43:15+5:30
१२ फेब्रुवारीस पंजाब में तो इसबार झाडू चल रहा है हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या मानसिकतेचे केलेले विश्लेषण तंतोतंत खरे ठरले.
विश्वास पाटील, उपमुख्य वृत्त संपादक लोकमत कोल्हापूर
लोकांनी एकदा कुणाला विजयी करायचे आहे, यापेक्षा कुणाला पराभूत करायचे आहे हे ठरविले की, कसा निकाल लागतो याचे अत्यंत चांगले प्रत्यंतर पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत यावेळेला आले आहे. पंजाबच्या बहाद्दर मतदारांनी अत्यंत स्पष्ट कौल देऊन आम आदमी पक्षासारख्या नव्या पर्यायास भरभरून मते देऊन सत्तेत बसवले आहे. देशातील पंजाबसह,उत्तर प्रदेश,उत्तराखंड,गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात एकदमच निवडणूक झाली. त्यातील सगळ्यात निर्भेळ यश पंजाबमध्ये आप ला मिळाले आहे.
पंजाबमध्ये आपच्या मदतीला कोणताही जातीय फॅक्टर नव्हता. आर्थिक ताकद अथवा निवडणूक जिंकण्याचे दिखावू तंत्र नव्हते. त्यांचे बहुतांशी उमेदवारही राजकारणात नवखे होते. तरीही लोकांनी त्यांना एवढा मोठा विजय दिला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण की, हा पक्ष पंजाबच्या भल्याचे कांहीतरी करेल असा लोकांना वाटलेला विश्वास. या पक्षाची दिल्लीत सत्ता आहे. तिथे त्यांनी चांगला कारभार करून दाखवला आहे. मोफत वीज, उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा, तितकेच चांगले शिक्षण आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे दिल्ली मॉडेल घेऊन आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे जनतेसमोर गेले. हे मॉडेल त्यांनी पंजाबच्या सीमेपलीकडील राज्यात यशस्वीपणे राबविल्याचा अनुभव होता. त्यामुळे लोकांना त्याबद्दल खात्री वाटली. यापूर्वी काँग्रेसला आणि अकाली दल या दोनच पक्षांना पंजाबच्या जनतेने आलटून पालटून विजयी केले. त्यांना बदल हवा होता परंतू पर्याय नव्हता. तो सक्षम पर्याय आपच्या रुपात उपलब्ध झाल्यावर लोकांनी तो स्वीकारला. चांगला कारभाराची हमी मिळाल्यावर लोक एखाद्या पक्षाला इतक्या चांगल्या मतांंनी निवडून देतात ही सुद्धा देशाच्या राजकारणात बदल घडविणारी घटना आहे.
आपची २०१७ च्या निवडणुकीतही हवा झाली होती परंतू त्यावेळी त्यांना २० जागा जिंकता आल्या. त्यातील पंधरा आमदार पक्षांतर करून काँग्रेसमध्ये गेले होते. पाच वर्षात आपने पक्षीय फार मजबूत बांधणी केली होती असेही नाही. तरीही लोकांनी त्यांना दोन तृतीअंशहून जास्त बहुमताने विजयी केले आहे. याचा अर्थ काँग्रेस व अकाली दलाच्या कारभाराला ते कमालीचे विटले होते असाच होतो. पंजाबमध्ये भाजपला कधीच आपली मुळे रुजवता आलेली नाहीत. अकाली दल सोबत असतानाही त्या पक्षाचे तीन आमदार होते.
त्यातीलही एक यावेळेला कमी झाला. केंद्रातील भाजप सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनीच सर्वाधिक मोठे आंदोलन उभे केले. केंद्राने हे कायदे मागे घेतले तरी पंजाबच्या लोकांच्या मनांतून भाजप व पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कमालीचा राग होता. तो राग त्यांना व्यक्त करायचा होता. परंतू त्यासाठी काँग्रेस पेक्षा त्यांना आप हा चांगला पर्याय असल्याचे वाटले. कारण मागच्या पाच वर्षातील काँग्रेसचा कारभार चांगला नव्हता. पंजाबच्या काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू यांनी वाटोळे केले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याऐवजी सिद्धूलाच पक्षातून हाकलून द्यायला हवे होते. अमरिंदरसिंग यांना बाजूला करून काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूकही लढवली. एकतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून शंभर दिवसच काम करण्याची संधी मिळाली होती. एवढ्या कमी कालावधीत ते फार काही प्रभाव पाडू शकले नव्हते. त्यात पक्षांतील वरिष्ठ नेत्यांत कमालीची गटबाजी उफाळली होती. सिद्धू प्रदेशाध्यक्ष असतानाही एकाही उमेदवारासाठी त्यांनी सभा घेतली नाही. आपच्या एका महिलेने त्यांचा पराभव केला आहे. यावरून त्यांची मतदारसंघातील प्रभाव व लायकीही स्पष्ट होते. अकाली दलाच्या काळात राज्यात भ्रष्टाचार बोकाळला व देशातील सर्वाधिक सधन प्रांत व्यसनाच्या आहारी गेला. तो राग अजूनही कायम असल्यानेच अकाली दलाचाही धुव्वा उडाला.
पंजाबचा माणूस बहाद्दर यासाठी म्हटले की, त्यांने काँग्रेस, अकाली दल व भाजपमधील बड्या धेंड्याना घरी बसवले आहे. नव्या सभागृहात एकही माजी मुख्यमंत्री नाही. प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या अकाली दलाच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील प्रभावी नेत्यालाही पराभवाची धूळ चारली आहे. एकदोन आमदार वगळता आपचे सगळे आमदार नवीन आहेत. ते सामान्य कुटुंबातीलच आहेत. आता त्यांच्यासमोर पंजाब बदलून दाखविण्याचे आव्हान आहे. ते हे आव्हान कसे पेलतात त्यावरच या पक्षाचे पंजाबमधीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील स्थान ठरणार आहे. हा पक्ष काँग्रेसला पर्याय ठरू शकतो का, याच्या मूल्यमापनाची फूटपट्टी ही पंजाबची सत्ता आहे.
निकालानंतरचे बलाबल-एकूण जागा ११७, बहुमत ५९ (कंसातील आकडे गत निवडणुकीत जिंकलेल्या जागांचे)
आप : ९२ (२०)
काँग्रेस : १८ ( ७७ )
शिरोमणी अकाली दल : ०३(१२)
भाजप : ०२(०३)
इतर : ०२ (०२)
झाडू चल रहा है..
पंजाब विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पंजाबच्या दौरा केला. या दौऱ्यात समाजाच्या सर्वच स्तरांतील लोकांच्या भेटी झाल्या. त्यावेळी सर्वांनीच अत्यंत स्पष्टपणे पंजाबची जनता यावेळेला आप ला संधी देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यावर आधारित १२ फेब्रुवारीस पंजाब में तो इसबार झाडू चल रहा है हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पंजाबच्या मानसिकतेचे केलेले विश्लेषण तंतोतंत खरे ठरले.