पंजाबी राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’

By Admin | Published: September 10, 2016 05:45 AM2016-09-10T05:45:22+5:302016-09-10T05:45:22+5:30

क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले

Punjabi reality show 'reality show' | पंजाबी राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’

पंजाबी राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’

googlenewsNext


भाजपाने ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून बाजूला बसवल्याने नाराज झालेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले आहेत. ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्याचा इराद्याने सिद्धू यांना ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे, और दर्शन छोटे’ ही बॉलीवूडच्या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याची ओळ सांगून भाजपा, काँग्रेस व ‘आप’ या तीनही पक्षांना एकाच वेळी लक्ष्य केले. सिद्धू हे हजरजबाबी आहेत. त्यामुळे चित्रवाणीवरील वाहिन्यांच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये ते भरपूर लोकप्रियता मिळवत आले आहेत. शिवाय क्रिकेटच्या सामन्यांच्या धावत्या वर्णनाच्या वेळी एक तज्ज्ञ म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे पंजाबातील निवडणुकीच्या रिंगणात सिद्धू यांनी उडी मारल्याने प्रचाराची रंगत वाढेल हे नक्की. शिवाय त्यांच्या या ‘दुसऱ्या इनिंग’मुळे काँग्रेस व ‘आप’ या दोन्ही पक्षांना आता आपल्या रणनीतीत फेरबदल करणे भाग पडणार आहे, हेही निश्चित. पण त्यापलीकडे सिद्धू प्रत्यक्षात राजकीय बळ किती जमवू शकतात, याबाबत शंकाच आहे; कारण गेली काही वर्षे भाजपात असताना सिद्धू यांना त्या पक्षाच्या पंजाब शाखेतही आपला जम बसवता आलेला नव्हता. त्यामुळेच ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून निवडणुकीच्या खेळात सिद्धू यांना मागे बसवणे भाजपाला शक्य झाले होते. अशा रीतीने सिद्धू हे राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’ करण्याच्या तयारीस लागले असतानाच, पंजाबात बाजी मारण्याच्या ‘आप’च्या स्वप्नाला तडा जाण्यास सुरूवात झाली आहे. सिद्धू यांनी ‘एलान-ए-पंजाब’ या मंचाच्या स्थापनेची घोषणा केली, त्याच दिवशी ‘आप’चे नेते असलेले अरविंद केजरीवाल हे लुधियानात येऊन पोहचले, तेव्हा त्यांच्या विरोधात महिलांनी तीव्र निदर्शने केली. निमित्त होते, ते ‘आप’च्या एका आमदाराच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रसिद्ध होत असलेल्या कहाण्या आणि त्याला झालेली अटक. एकूणच गेल्या काही महिन्यांत ‘आप’चे आमदार एकापाठोपाठ एक अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकत गेले आहेत. हा भाजपाचा कट आहे, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. त्यात अजिबात तथ्य नाही, असेही छातीठोकपणे म्हणण्याजोगी स्थिती नाही. याचे कारण म्हणजे ‘आप’ ने निवडणुकीत धूळ चारल्याने संतप्त झालेल्या मोदी व भाजपाने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या कारभारात अडथळे आणण्याचा सतत प्रयत्न चालविला आहे. अर्थात अतिरेकी आदर्शवादाच्या आहारी जाऊन नैतिकतेच्या उंच मंचावर बसून इतरांना नीतिमत्तेचे धडे देण्याचा जो उद्योग केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून सुरू केला होता, तोच आता त्यांचा अंगाशी येत आहे. दिल्ली या ‘राज्या’ची सत्ता ‘आप’च्या हातात आली. पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. केंद्रशासित प्रदेशात जसे प्रशासकीय अधिकार नायब राज्यपालांनाच असतात, तीच घटनात्मक तरतूद दिल्लीसाठी आहे. राजकारणात उडी घेण्यापूर्वी केजरीवाल हे प्राप्तिकर खात्यात वरिष्ठ पदावर अधिकारी होते. त्यामुळे प्रशासकीय चाकोरी त्यांना माहीत नसणे असंभवनीय आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीची सत्ता हाती आल्यावर केजरीवाल यांनी या चाकोरीबाहेर पडून धडाक्याने निर्णय घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे मोदी व भाजपा यांना आयतीच संधी मिळाली आणि नायब राज्यपाल केजरीवाल यांच्या आदेशांना स्थगिती देऊ लागले. मग प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे केजरीवाल यांना हार पत्करावी लागली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. दुसरीकडे नैतिकतेचे धडे देणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षात किती अनैतिकता आहे, हे त्यांना सोडून गेलेल्या प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनीच जगासमोर आणले. ही अशी सुवर्णसंधी भाजपा सोडणे शक्यच नव्हते. पंजाबात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाल्याने तेथे बरीच मोठी मजल मारण्याची स्वप्ने केजरीवाल बघत होते, ती या अशा पार्श्वभूमीवर धूसर होत जाण्याची शक्यताच जास्त आहे. राहिला प्रश्न भाजपा-अकाली दलाचा व काँग्रेसचा. अकाली दलाच्या कारभाराला जनता विटली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाचा विळखा पंजाबातील तरूण वर्गाभोवती पडला आहे. त्यात अनेक अकाली नेत्यांचाच हात आहे. जनमानसात अकाली दलाची ही जी डागाळलेली प्रतिमा आहे, त्याने भाजपाही हतबल झाला आहे. याच परिस्थितीचा फायदा ‘आप’ उठवू पाहत होता. पण राजकीय अदूरदर्शीपणामुळें केजरीवाल यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ काँग्रेस विंगेत उभी राहून बघत आहे. आपल्याला फायदा होणार, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. पण या पक्षातही मतभेदांचे पेव पसरलेले आहे आणि प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाची यंत्रणा कामाला लागल्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा या वातावरणात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उडी मारल्याने पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ निवडणुकीच्या प्रचारता रंगत आणणार आहे. मात्र मतदारांना चांगला पर्याय देण्याच्या परिस्थितीत एकही पक्ष नाही, हीच खरी पंजाबची शोकांतिका आहे.

Web Title: Punjabi reality show 'reality show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.