उद्धव ठाकरेंचे पुण्याहून पुणतांबा
By admin | Published: June 22, 2017 01:23 AM2017-06-22T01:23:33+5:302017-06-22T01:23:33+5:30
पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते.
पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते. योगायोगाने राज्यात सध्या पुणतांबा हे गाव चर्चेत आहे. पुणतांबातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेकांना या गावाची वाट तुडवणे भाग पडले आहे. ज्यांच्या गावीही (ध्यानीमनी) हे गाव नव्हते त्यांनाही ते शोधावे लागले. पुणे, मुंबई या महानगरांच्या पलीकडे एक पुणतांबा आहे, अन् त्याचे काही प्रश्न आहेत. तेथेही मोठा मतदार आहे, तो संप करु शकतो, राज्य हादरवू शकतो, हा धडा पुणतांबाने राज्याला दिला. हा इतिहासच घडला आहे.
पण, जे पक्ष व नेते आज पुणतांबाची वाट तुडवताहेत ते अगदी सरळधोपटच येताहेत का? याबाबत साशंकता आहेतच. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आता पुणतांबेकरांच्या वाटेने निघाले आहेत म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. २५ जूनला ते येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे आत्ता इतक्या उशिराने पुणतांबाला का? असा प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित होऊ शकतो. तो होणारच. शेतकरी आंदोलनाच्या काळात ते परदेशात होते म्हणून त्यांना हा उशीर होतोय हे एक कारण झाले. ते खूपच तत्कालिक व वैयक्तिक कारण झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या या कारणाशी काहीही घेणेदेणे नसणार. एकूणच एवढी वर्षे सेना कोठे हरवली होती? असा प्रश्न शेतकरी व शिवसैनिकांनाही पडू शकतो.
सेना पुणतांबात आज पोहोचत नाही. शिवसेनेची नगर जिल्ह्यातील पहिली शाखा पुणतांबात स्थापन झाली. पुणतांबाचे सुहास वहाडणे हे सेनेचे जिल्हाप्रमुख होते. हे गाव म्हणजे संघाचाही बालेकिल्ला आहे. आजही पुणतांबात संघाची प्रभात शाखा, सायंशाखा व रात्र शाखा भरते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे हे पुणतांबाचेच. ज्या विचारांचा हे गाव बालेकिल्ला आहे त्याच विचाराचे सरकार राज्यात व देशात आज सत्तास्थानी आहे. असे असताना पुणतांबा संपावर गेले. हा संप सेना-भाजपचे यश समजायचे की अपयश?
ठाकरे हे पुणतांबेकरांशी संवाद साधायला येताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, सरकार त्यांचेच असताना शेतकऱ्यांशी मंत्रिमंडळातून संवाद साधायचा की पुणतांबातून? हा प्रश्न सेनेला विचारला जाणार. म्हणूनच ‘पुण्याहून पुणतांबा’ ही म्हण सेनेच्या या नीतीलाही लागू पडते. एकाच वेळी सरकार व पुणतांबा हे दोन्हीही सेनेला सांभाळायचे आहे, असे दिसते. शेतकरी अस्वस्थ आहे व आपण महानगरी प्रश्नातच अडकून पडलो, तर सेनेला ग्रामीण भागात भवितव्य नाही, हे सेनेनेही ओळखले आहे. नगरसारख्या जिल्ह्यातही सेनेची पीछेहाट झाली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व एकूणच ग्रामीण प्रश्नांशी सेनेचा संवाद खुंटला आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा एकही बडा नेता जिल्ह्यात फिरकला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे स्वत:ही प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. या जिल्ह्यात सेनेकडे सध्या फक्त एक आमदार व खासदार आहे. नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यात पक्षाची ही अवस्था आहे. म्हणूनच ठाकरेंना बहुधा पुणतांबा आठवले, असाही या दौऱ्याचा एक अर्थ निघतो. समृद्धी महामार्ग नगर जिल्ह्यातूनही जातो. याही शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत.
ठाकरे पुणतांबातून पुन्हा एकदा सेनेला उभारीची व शेतकरी प्रश्नांना हात घालण्याची हाक देतील, अशी शक्यता आहे. फडणवीस सरकारवर दबाव ठेवण्याची त्यांची जुनी रणनीती याही दौऱ्यात त्यांच्या सोबत आहेच. पुणतांबेकरांच्या भेटीनंतर शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्त्वत:’ ‘निकष’ हे शब्द बाजूला करून ठाकरे सरकारला ‘सरधोपट’ पुणतांबात पोहोचविणार का? यावर त्यांच्या या दौऱ्याचे फलित ठरेल. असे झाले तरच ठाकरे सरधोपट पुणतांबाला निघालेत, असे म्हणता येईल.
- सुधीर लंके