पुण्यभूषण स्वरयोगिनी प्रभा अत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:12 AM2018-04-19T03:12:11+5:302018-04-19T03:12:11+5:30
एखादा सूर असा यावा, क्षितिजाचा पार दिसावा... असं चिंतन आपल्या काव्यातून अभिव्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे... बंदिशकार, कवयित्री, लेखिका, विचारवंत, संशोधक, गुरू अशा विविध रूपांत सातत्याने नव्या वाटा शोधणाºया या स्वरयोगिनीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते...
- विजय बाविस्कर
एखादा सूर असा यावा, क्षितिजाचा पार दिसावा... असं चिंतन आपल्या काव्यातून अभिव्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे... बंदिशकार, कवयित्री, लेखिका, विचारवंत, संशोधक, गुरू अशा विविध रूपांत सातत्याने नव्या वाटा शोधणाºया या स्वरयोगिनीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते...
सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर यांच्या या शिष्येची गानशैली मूळची किराणा घराण्याची. उस्ताद अमीर खाँ यांना गुरुस्थानी मानून, त्यांचीही काही गुणवैशिष्ट्ये प्रभातार्इंनी आत्मसात केली आहेत. परंपरा आणि नवता यांचा समतोल साधून कलाक्षेत्रात स्वत:चे अनन्य स्थान त्यांनी निर्माण केले आहे.
प्रभातार्इंच्या घरी सांगीतिक वातावरण नव्हते; परंतु वडील आरपीईएस शाळेचे मुख्याध्यापक असल्याने चित्रकला, नाटक, खेळ, गायन अशा विविध प्रकारांत, स्पर्धांमध्ये ते भाग घ्यायला लावत. यातूनच एकदा आईच्या आजारपणाच्या निमित्ताने घरात हार्मोनियम आले व संगीताच्या सुरांचे आलापात रूपांतर झाले. विज्ञान व कायद्याची पदवी प्राप्त करतानाच संगीत नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. आकाशवाणी, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभागाची जबाबदारी यातून त्यांचा संगीताबद्दलचा स्वतंत्र दृष्टिकोन आणि चिंतनशील वृत्ती दिसून आली. शांत, गंभीर, भावनेने ओथंबलेले प्रभातार्इंचे गायन अतिशय बुद्धिप्रधान आहे. शब्दांचे स्पष्ट सांगितिक उच्चार, भावपूर्ण स्वरलगाव, आलाप, ताना, सरगममधील लालित्य सामान्य श्रोत्यांनाही समजेल, असे असते. ख्याल, तराणा, दादरा, टप्पा, ठुमरी, चतुरंग, भजन, गीत, गझल अशा वेगवेगळ्या संगीतप्रकारांत त्यांनी अनेक बंदिशी रचल्या आहेत. मारूबिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना!’, कलावती रागातील ‘तन मन धन’ या विलक्षण सुंदर रचना तर गानरसिकांच्या मनामनांत पोहोचल्या. प्रभातार्इंच्या संवेदनक्षम, तरल, सुजाण वृत्तीमुळे त्यांच्या कंठातून निघणारा सूर जितका नादमधुर असतो, तितकेच बोलकेपण त्यांच्या शब्दातूनही प्रकट होते. आपल्या ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’ या पुस्तकांतून संगीतसौंदर्याबद्दल उपजत संवेदनक्षमता व विचार सोप्या भाषेत मांडणाºया या गानप्रभेने आपले सुरांशी असलेले ‘अंत:स्वर’ तरल अशा कवितांतून व्यक्त केले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांत त्यांनी सातत्याने केलेले सांगीतिक लेखन अन्य भाषांतही अनुवादित होत आहे. शास्त्रीय संगीतात विपुल लेखन करणाºया मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे योगदान मौलिक आहे. आज वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षीही भारतातच नव्हे, तर अनेक देशांमधून अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार आपल्या गानप्रस्तुतीतून, सप्रयोग व्याख्यानातून त्या सातत्याने व उत्साहाने करतात. ‘स्वरमयी गुरुकुल’च्या माध्यमातून संगीताचे सर्वांगीण शिक्षण देत
गुरू-शिष्यपरंपरा जपणाºया, ‘गानवर्धन’ संस्थेच्या माध्यमातून अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रसारार्थ गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाºया या स्वरमयीला आजही स्वरांचे विश्व खुणावत असते. त्यांच्या अनेक मैफलींपैकी पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाची त्यांच्या गायनाने होणारी ‘भैरवी’ या महोत्सवाची सांगता नसून, ‘नवक्षितिजाला साद घालणारी मैफल’ असल्याची रसिकांना अनुभूती येते. काळ कितीही बदलला तरी शास्त्रीय संगीताचे भविष्य उज्ज्वल आहे, अशी अढळ श्रद्धा असलेल्या प्रभातार्इंचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने आज पुण्यात सन्मान होत आहे. आयुष्यभर स्वरांवर प्रेम करणाºया ‘स्वरयोगिनी प्रभा अत्रे’ यांना अगणित सुरेल शुभेच्छा!