रोजगारात वाढ होत असल्याची माहिती शुद्ध फसवेगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:33 AM2018-06-20T00:33:38+5:302018-06-20T00:33:38+5:30
-डॉ. भारत झुनझुनवाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागार मंडळाचे एक सदस्य प्रोफेसर सुरजित भल्ला यांच्या मते मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थकारणाने दीड कोटी रोजगारांची निर्मिती केली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग आॅफ इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) यांच्या अहवालात दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे विधान केले होते.
अहवालात म्हटले आहे की २०१६-१७ या आर्थिक वर्षात २५ ते ६४ वयोगटातील लोकांसाठी एकूण १ कोटी १८ लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे. सुरजित भल्ला यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हाच इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, बेंगळुरुचे प्रोफेसर पुलक घोष यांनी स्पष्ट केले की, चालू २०१७-१८ वर्षात एकूण ६६ लाख नवे रोजगार निर्माण झाले आहेत. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट आॅर्गनायझेशनमध्ये नोंद झालेल्या नव्या सदस्यांच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली आहे. या दोघांच्या आकडेवारीत फरक आहे. कारण प्रोफेसर भल्ला यांनी अपारंपरिक क्षेत्रातील रोजगार देखील मोजलेआहेत. त्यात ई-रिक्षा चालवणारे रिक्षाचालकही समाविष्ट आहेत. याउलट ज्या उद्योगात २०पेक्षा अधिक लोक काम करतात आणि ज्यांना एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड संघटनेत नोंद करणे अपरिहार्य आहे, अशा उद्योगातील नव्या रोजगारांचा समावेश प्रोफेसर घोष यांच्या आकडेवारीत आहे. त्या आकड्यावरून देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचे दिसून येते.
पण सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की, २५ ते ६४ वयोगटात एकूण १.१८ कोटी नवीन रोजगार जरी निर्माण झाले असले तरी याच काळात १५ ते २४ वयोगटातील लोकांना ७० लाख रोजगार गमवावे लागले तर ६५ वर्षावरील लोकांना ३० लाख रोजगार गमवावे लागले. अशातºहेने गमावलेल्या रोजगारांची संख्या १ कोटी इतकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त १८ लाखच नवे रोजगार निर्माण झाले असा निष्कर्ष निघतो. प्रोफेसर भल्ला यांनी आपली आकडेवारी एकूण नवीन रोजगार किती निर्माण झाले यावर आधारली असून याच काळात रोजगार गमावलेल्यांची संख्या त्यांनी विचारात घेतली नाही अशातºहेने त्यांनी आकडेवारी मांडताना बनवाबनवी केल्याचे दिसून येते!
सीएमआयइने केलेल्या खुलाशामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की २५ ते ६४ वयोगटातील लोकांच्या रोजगारात जी वाढ झाली ती त्या रोजगारांची पूर्वी नोंद न झाल्याने आणि त्यानंतर झालेल्या निश्चलनीकरणामुळे तसेच वस्तू व सेवाकर कर लागू झाल्याने रोजगार दाखवणे बंधनकारक केल्यामुळे झाली आहे. याचा अर्थ हे कर्मचारी पूर्वीपासून नोकरीत होते पण त्यांची नोकरी आता दाखविण्यात आली आहे.
पूर्वी जे उद्योग आपले खरेदी विक्रीचे व्यवहार रोखीत करीत होते. त्यांना आता बँकांमार्फत आपले व्यवहार करावे लागत असल्यामुळे आपल्या कर्मचाºयांचे रोजगार ते लपवून ठेवू शकत नव्हते. त्यांना त्यांचा अहवाल सादर करावा लागत असल्यामुळे रोजगारात ही वाढ दिसून येत आहे.
एकूण रोजगार निर्मिती ही पारंपरिक क्षेत्राकडून अपारंपरिक क्षेत्राकडे वळली आहे. म्हणजेच नवे रोजगार निर्माण झाले हा भ्रम असून लोक पारंपरिक क्षेत्राकडून अपारंपरिक क्षेत्राकडे वळल्यामुळे १.१८ कोटी नवे रोजगार निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पण त्यातही तरुणांनी ७० लाख रोजगार गमावले आहेत तर प्रौढांनी ३० लाख रोजगार गमावले आहेत. नवीन रोजगार निर्मिती होत असताना रोजगार गमावले जाण्याची संख्याही तुलनेने वाढत आहे.
उद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असल्याचे शेअर बाजारातील उसळीमुळे स्पष्ट झाले आहे. पण ही उसळी बड्या उद्योगांपुरतीच सीमित आहे. याचा अर्थ लहान उद्योग बंद पडत असल्यामुळे रोजगार घटत आहेत असा होतो. घरात मोठ्या भावाने जास्त खाल्ल्याने लहान भावाची उपासमार व्हावी तसा हा प्रकार म्हणावा लागेल. बडे उद्योग लहान उद्योगांना गिळंकृत करीत आहेत असेच यातून दिसून येते.
बड्या उद्योगांची भरभराट होते आणि लघु उद्योग एकामागून एक बंद पडणे यामुळे एकूणच उद्योगाची अवस्था चिंताजनक झाली आहे. त्यामुळे एकूण अर्थकारण घसरणीस लागल्याचे दिसून येते. लहान उद्योगांची स्थिती बिकट होणे आणि बड्या उद्योगांची स्थिती मजबूत होणे या दोन्ही घटना हातात हात घालून चालताना दिसतात. त्यामुळे रोजगारात वाढ झाली आहे हे प्रोफेसर भल्ला आणि प्रोफेसर घोष यांचे म्हणणे भ्रममूलक आहे. सरकारने त्यांच्या म्हणण्यावर विसंबून अर्थकारणाची भरभराट होत असल्याचा चुकीचा निष्कर्ष काढून स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये. याउलट प्रत्यक्ष रोजगारात कशी वाढ होईल याकडे लक्ष पुरवावे. अर्थकारणाला खºया अर्थाने मजबुती येण्याच्या दृष्टीने असे करणे श्रेयस्कर ठरेल.
(अर्थशास्त्राचे अध्यापक)