पुरुषोत्तम! नाटक असं नसतं राजा.. नाटक असं नसतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 08:53 AM2022-09-20T08:53:54+5:302022-09-20T08:54:31+5:30

‘पुरुषोत्तम’मध्ये करंडकास पात्र नाटकेच सादर न होणे, हा रंगभूमीच्या आणि महाविद्यालयांच्या आजच्या स्थितीचा प्रतिध्वनी तर नाही ना?’...

Purushottam karandak! Drama is not like that, Raja.. Drama is not like that! | पुरुषोत्तम! नाटक असं नसतं राजा.. नाटक असं नसतं!

पुरुषोत्तम! नाटक असं नसतं राजा.. नाटक असं नसतं!

googlenewsNext

संजय आवटे

‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धा’ सुरू झाली १९६३ मध्ये. पहिले दोन पुरुषोत्तम करंडक जिंकले, ते डॉ. जब्बार पटेल यांनी. त्यानंतर डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्यापासून ते थोरल्या सोनाली कुलकर्णीपर्यंत अशी अनेक नावं सांगता येतील. ‘पुरुषोत्तम’वर नाव कोरणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी वर्षभर मुलं-मुली मेहनत घेतात. नाटकवाल्यांचे अड्डे जमतात. गेल्या सहा दशकांमध्ये जग खूप बदलले, ‘पुरुषोत्तम’ची जादू मात्र ओसरली नाही. ‘पुरूषोत्तम’चा निकाल यंदाही जाहीर झाला. बक्षिसेही मिळाली. मात्र, यंदा कोणालाच ‘पुरुषोत्तम करंडक’ मिळाला नाही. पुणे केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत करंडकपात्र संघ नव्हता आणि कोणी व्यक्तिगत पातळीवरही तो स्तर गाठला नाही. ‘पुरुषोत्तम’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात झालेल्या महाअंतिम फेरीतही पुण्यातल्या एकाही संघाला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. २०१४ मध्येच ही धोक्यांची घंटा वाजली होती. पुण्या-मुंबईतली मुलं ‘नाटक’ कमी करतात आणि बाकी भपका मात्र भरपूर उडवतात. तंत्रज्ञानाचीही कमाल दाखवतात. पण, त्यात नाटकाचा जीव नसतो. आशय नसतो. भवतालचा आवाका नसतो.. असे निरीक्षण आहे. 

तात्कालिक प्रतिक्रियेसारखी लिहिली गेलेली संहिता आणि दृश्य माध्यमाच्या प्रभावातून आलेला सादरीकरणाचा घाट यातून ‘इन्स्टंट’ नाटकं उभी राहिली, तर त्यांना करंडक कसा देणार, असा परीक्षकांचा प्रश्न आहे. ही स्पर्धा पुणे केंद्रावरची होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव, नागपूर या केंद्रांवरच्या स्पर्धा व्हायच्या आहेत. तिथली मुलं करंडक मिळवतीलही. पुण्यातली मुलं-मुली मात्र त्यासाठी पात्र ठरलेली नाहीत, ही खरी बातमी आहे!  ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धा ज्यांच्या नावाने घेतली जाते, ते पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ अप्पासाहेब वझे हे त्या अर्थाने रंगकर्मी नव्हते. ते मुळातले शिक्षक. जी ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ नावाची संस्था या ‘पुरुषोत्तम’ची आयोजक आहे, ती संस्थाच स्थापन केली नूतन मराठी विद्यालयातल्या कलासक्त शिक्षकांनी. मोठमोठे स्टार तयार करणे, हे  ‘पुरुषोत्तम’चे स्वप्न कधीच नव्हते. महाविद्यालयीन वयातल्या मुलांनी नाटकाचं बोट पकडायला हवं, हा खरं म्हणजे मुख्य हेतू. ही स्पर्धा सुरू झाली, तो काळच झपाटलेला होता. मराठी रंगभूमीवर खूप प्रयोग होत होते. खुद्द विजय तेंडुलकर, पु.ल.देशपांडे, सतीश आळेकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार अशा नाटककारांच्या संहिता घेऊन मुलं उभी राहात होती किंवा स्वतंत्रपणे स्वतःही लिहीत होती. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये तसे झपाटलेले वातावरण होते. नाट्यमंडळं होती. आज अशी स्थिती आहे की, विद्यापीठांमध्ये स्वतंत्र नाट्यशास्त्र विभाग आहेत. ललित कला केंद्र आहेत. पण, अपवाद वगळता एकाही विभागातून ‘पुरुषोत्तम’साठी साधी प्रवेशिकाही येत नाही.

‘पुरुषोत्तम’चे आणखी एक वेगळेपण आहे. इथे जी बक्षिसे दिली जातात, त्यासाठी निकष कोणते? फक्त लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन. बाकी, नेपथ्य, प्रकाश, ध्वनी, तंत्र अशा बाबींना इथे विचारात घेतले जात नाही. राजाभाऊ नातूंसारख्या ज्येष्ठ रंगकर्मीने हे निकष निश्चित करताना त्यामागे एक भूमिका होती. हा पैशांचा खेळ होऊ नये! एखादा संघ महागडा सेट लावेल वा पैसे उधळून तांत्रिक करामती करेल. दुसरे असे की, नेपथ्य वा ध्वनी-प्रकाश बाहेरच्या व्यावसायिक कंपनीने करून दिले, तरी ते समजणार नाही. त्याचा फटका प्रामाणिक आणि साध्या मुलांना बसेल. त्यामुळेच तर कॉर्पोरेट शिक्षण समूहांनी प्रयत्न करूनही त्यांना हा करंडक पळवता आला नाही. उलटपक्षी पुण्या-मुंबईबाहेरच्या महाविद्यालयांची कामगिरी अधिक चमकदार होऊ लागली आहे. ‘महाराष्ट्रीय कलोपासक’चे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले तसे, ‘पुरुषोत्तम’मध्ये करंडकास पात्र नाटकेच सादर न होणे, हा रंगभूमीच्या आणि महाविद्यालयांच्या आजच्या स्थितीचा प्रतिध्वनी तर नाही ना?’ यामुळे एक मात्र झाले - ‘पुरुषोत्तम’विषयी आणि एकूणच नाटकाविषयी लोक बोलू तरी लागले! म्हणून यंदा चर्चा विजेत्यांची नाही. परेश मोकाशी, पौर्णिमा मनोहर आणि हिमांशू स्मार्त या परीक्षकांची आहे. आणि, मुख्य म्हणजे, नाटक कसं नसतं, याची आहे!

Web Title: Purushottam karandak! Drama is not like that, Raja.. Drama is not like that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.