नामांतरानंतरची विद्यापीठाची गुणात्मक झेप

By admin | Published: January 14, 2015 03:47 AM2015-01-14T03:47:32+5:302015-01-14T03:47:32+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे म्हणून २७ जुलै १९७८ ते १४ जानेवारी १९९४ पर्यंत १७ वर्षे परिवर्तनवादी चळवळीने जो लढा दिला,

The qualitative leap for university after transformation | नामांतरानंतरची विद्यापीठाची गुणात्मक झेप

नामांतरानंतरची विद्यापीठाची गुणात्मक झेप

Next

बी.व्ही. जोंधळे, (दलित चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक) - 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे म्हणून २७ जुलै १९७८ ते १४ जानेवारी १९९४ पर्यंत १७ वर्षे परिवर्तनवादी चळवळीने जो लढा दिला, तो सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. नामांतरप्रश्नी बाबासाहेबांच्या नावे वेगळे स्मारक उभारू; पण मराठवाड्याची अस्मिता जपण्यासाठी विद्यापीठास बाबासाहेबांचे नाव नको, अशी भूमिका नामांतर विरोधकांनी घेतली होती. अर्थात, ही छुपी जातीय मानसिकताच होती.
नामांतराची मागणी ही केवळ विद्यापीठाची पाटी बदलण्यापुरती सीमित नव्हती, तर ती दलितविरोधी जातीय मानसिकता बदलण्याचीही होती; पण नामांतर होऊन आता वीस वर्षे उलटून गेल्यावरही दलितविरोधी मानसिकता बदलली नाही, ही बाब सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने चिंताजनकच म्हटली पाहिजे. मात्र, समाधानाची बाब अशी की, नामांतर झाल्यावर बौद्ध विद्यापीठ होणार आहे, मराठवाड्यातील महाविद्यालये विद्यापीठाशी असलेली संलग्नता तोडणार आहेत, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळणार आहे, नामांतर झाले तर काही जण आत्मदहन करणार आहेत, असा जो विषारी अपप्रचार नामांतरविरोधकांकडून केला गेला तो मात्र खोटा ठरून गेल्या वीस वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उत्तरोत्तर भौतिक विकासाबरोबरच आपली शैक्षणिक गुणवत्ताही वाढवीत आहे, हे नाकारता येत नाही.
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना २३ आॅगस्ट १९५८ साली झाली व विद्यापीठाचे नामांतर १४ जानेवारी १९९४ रोजी झाले. नामांतरापूर्वी १९५८ ते १९९४ च्या ३६ वर्षांत या विद्यापीठास सुंदोपसुंदीच्या गटबाज जातीय राजकारणाने चांगलेच ग्रासले होते. नामांतरानंतरच्या गेल्या २० वर्षांत आता विद्यापीठाचे मलिन चित्र उजळ झाले असून, विद्यापीठाने ज्ञानाच्या - संशोधनाच्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावली आहे, हेही तेवढेच खरे आहे.
नामांतरानंतर माजी कुलगुरू शिवराज नाकाडे यांच्या कार्यकाळात संगणकशास्त्र व माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन प्रशासन, उर्दू, पाली आणि बुद्धिझम, विधि, शिक्षणशास्त्र (उस्मानाबाद उपकेंद्र), इंग्रजी (उस्मानाबाद उपकेंद्र), जैवतंत्रज्ञान (उस्मानाबाद उपकेंद्र), जल आणि भूमी व्यवस्थापन, मानसशास्त्र, संस्कृत, जीवरसायन (उस्मानाबाद उपकेंद्र) हे विभाग नव्याने उभारले गेले. तसेच माजी कुलगुरू के.पी. सोनवणे यांच्या १९९९ ते २००४ च्या कार्यकाळात दोन नवी वसतिगृहे आली. ग्रंथालयाचे संगणकीकरण झाले. विशेष म्हणजे सोनवणेंच्याच कार्यकाळात डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखालील परिसर विकास समितीने २०० एकर पडीत जमिनीवर १५ हजार झाडांची फळबाग विकसित करून औरंगाबाद शहरासाठी आॅक्सिजन पुरविणारा हरितपट्टा तयार केला.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात नॅनो टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, फाईन आर्टस्, मानसशास्त्र, भूगोलशास्त्र, नृत्य व संगीत विभाग आले. विद्यापीठात आज ४४ विभाग कार्यरत असून, प्राणिशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय दर्जाची डीएनए लॅब उभारण्यात आली आहे. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात राज्यातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचा डिजिटल (रेडिओ टीव्ही) स्टुडिओ उभारण्यात आला आहे. रसायन तंत्रज्ञान, केमिस्ट्री, फिजिक्स, प्राणिशास्त्र, बायोकेमिस्ट्री, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विभागांचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे. भव्य नाट्यगृह उभारले आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ ही योजना विद्यापीठाचे भूषण आहे.
विद्यापीठात म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, राजर्षी शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, म. गौतम बुद्ध, अण्णाभाऊ साठे, गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करणारी संशोधन केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेला व राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ समितीने बनविलेला जवळपास सर्वच विषयांचा अत्याधुनिक अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केला आहे.
डॉ. विठ्ठलराव घुगे, डॉ.शिवराज नाकाडे, के.पी. सोनवणे, कृष्णा भोगे व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात विद्यापीठाने जो उल्लेखनीय असा शैक्षणिक व भौतिक विकास साधला, त्याची फलनिष्पत्ती म्हणूनच माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात मुंबई-पुणे विद्यापीठानंतर एका प्रादेशिक भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘ए ग्रेड’ मिळविला, ही बाब निश्चितच भूषणावह आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे नाव धारण करणारे विद्यापीठ म्हणूनच ज्ञानपरायण असले पाहिजे. अद्ययावत अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे कौशल्याभिमुख शिक्षण देणेही गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हा त्यांचा श्वास होता. देशात आज फॅसिझमला पूरक ठरणारी सांस्कृतिक हिंदू राष्ट्रवादाची भेसूर भाषा झडत आहे. लोकशाही- धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने ही बाब गंभीरच आहे.
विद्यापीठाचे विज्ञान विभाग एकीकडे अद्ययावत होत असतानाच दुसरीकडे भाषा-सामाजिकशास्त्रे विभागात प्राध्यापकांची संख्या कमी आहे. विद्यापीठाला एक उंची प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटक, नागरिक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यापीठाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र आले पाहिजे.
नामांतर वर्धापनदिन साजरा करताना दलित चळवळीनेही भावनात्मक राजकारणाच्या पलीकडे जाऊन दलितांच्या बुनियादी प्रश्नांवर चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने अंतर्मुख व्हायला पाहिजे असे वाटते. दुसरे काय?

Web Title: The qualitative leap for university after transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.