गुण नव्हे गुणवत्ता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:19 AM2018-04-06T04:19:18+5:302018-04-06T04:19:18+5:30

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले.

Qualities Need No Quality | गुण नव्हे गुणवत्ता हवी

गुण नव्हे गुणवत्ता हवी

Next

सरकार बदलले की भूमिका, निर्णय बदलायचे किंवा सत्तेत असताना एक भूमिका घ्यायची व विरोधी बाकावर बसल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी राजकारणाला फाटा देऊन चांगल्या निर्णयाचा पाठपुरावा केला, तर त्यातून नक्कीच काही सकारात्मक हाती लागते, याचेच प्रत्यंतर ‘बालभारती’च्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अवलोकन केले असता आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शिक्षण हक्क कायदा लागू झाला व शिक्षणात ज्ञानरचनावादाला महत्त्व देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. एसएससीची परीक्षा देणारी मुले सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या तुलनेत पिछाडीवर राहतात, हे वास्तव हेरून राज्यातील काँग्रेस सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता. राजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री असताना त्यांनी २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम कसा बदलायचा, याचे वेळापत्रक ठरवून दिले होते. दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल होऊन विनोद तावडे शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्याच निर्णयांचा पाठपुरावा केला व नवी ज्ञानरचनावादी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पडण्याचा मार्ग मोकळा झाला. एकेकाळी टीव्ही, संगणक, मोबाइल उपलब्ध नव्हते तेव्हा पुस्तके हाच ज्ञान मिळवण्याचा मार्ग होता. त्या वेळी हॅरी पॉटर किंवा अकबर-बिरबल यांच्या गोष्टी वाचल्यावर प्रत्येक मुलगा-मुलगी त्याच्या कल्पनेनुसार या व्यक्तिरेखा व त्यामधील प्रसंग डोळ्यांसमोर रंगवत होता. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीला अनेक गोष्टी सहज प्राप्त झाल्या. मात्र, त्यांची कल्पनाशक्ती क्षीण होत गेली. एकेकाळी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्ये असलेली चुरस संपुष्टात आली, इतकेच नव्हे तर या स्पर्धा जवळपास बंद झाल्या. शाळा, क्लास किंवा अपेक्षित प्रश्नसंच पुस्तिकांमध्ये दिलेल्या उत्तरांची घोकंपट्टी करायची व तसेच्या तसे उत्तर लिहून पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे, असा सुलभ पॅटर्न रूढ झाला होता. नव्या अभ्यासक्रमात मुलांना वेगवेगळ्या विषयांवर स्वप्रतिभेतून व्यक्त व्हावे लागेल. जुनाट संकल्पना हद्दपार होऊन सध्याच्या जीवनातील आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्थेतील संकल्पनांची माहिती दिली जाणार असल्याने मुलांना तो अभ्यास हवाहवासा तर वाटेलच, पण भविष्यात रोजगाराभिमुख ठरेल. चित्रांचा वापर करून शिक्षण देण्यामुळे अनेक बाबींचे आकलन सहजगत्या होते. गणिताच्या परीक्षेत आतापर्यंत एखाद्याने वेगळी रीत वापरून अचूक उत्तर दिले, तरी त्याच्या नशिबी भोपळा येत होता. आता रीत नव्हे तर गणिताच्या गाभ्याचे आकलन विद्यार्थ्याला झाले आहे किंवा कसे, हे पाहिले जाणार आहे, ही खरोखरच नवी दृष्टी आहे. समाजशास्त्र व तत्सम विषयांमधील तोंडी परीक्षेचे हक्काचे गुण जाऊन त्याची जागा परीक्षेने घेतल्याने अव्वाच्या सव्वा गुणांचे डोंगर पुढील वर्षी पाहायला मिळणार नाहीत. या नव्या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचे गुण काही अंशी घटले तरी चालतील, पण गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे.

Web Title: Qualities Need No Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.