गुणवत्तेची कास
By admin | Published: February 16, 2015 12:43 AM2015-02-16T00:43:10+5:302015-02-16T00:43:10+5:30
इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे. काय होतो आपण नि काय झालो आपण?
डॉ. कुमुद गोसावी -
इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे.
काय होतो आपण नि काय झालो आपण? मनातल्या मनात मग एक गणित सुरू होतं. त्याचं अचूक उत्तरही आपल्याकडंच असतं. उमेद, उत्साह नि ऊर्जा या तीन ओमकाराचं पैंजण आपापली गुणवत्ता आपल्याला बहाल करीत असतं, या पैंजणाच्या नादलयीत नवनवीन आव्हानांकडं जाता येतं हे अध्यात्मच आपल्याला सांगत असतं.
मूर्ख माणूस स्वत:च्या दोषांकडं डोळेझाक करतो. इतरांचे दोष काढतो ‘मी’भोवतीची त्याची येरझार नि वाईट बुद्धीनं घडणारे व्यवहार यांनी तो घेरला जातो. मन:शांती, मन:स्वाथ्य घालवून बसतो. जात, धर्म, पंथ नि नाती-गोती यात अडकून पडतो कोळिष्टकासारखा. त्यामुळं गुणवत्तेची कुचंबणा होते. जोपर्यंत गुणवत्तेला महत्त्व येत नाही, तोवर समाजाला भविष्य नाही.
जोडिली अक्षरे।नव्हती बुद्धीची उत्तरे।
नाही केली आटी।काठी मानदंडासाठी।
कोणी भाग्यवंत।तया कळेल उचित।
तुका म्हणे झरा।आहे मुळीचाची खरा।
जगद्गुरू तुकोबांंनी प्रापंचिकांना अशी गुणवत्तेची ओळख करून दिली आहे. तेव्हा त्यातील अध्यात्म ध्यानी घेऊन गुणवत्ता जपायलाच हवी, नाही का?
संस्कृतीचा प्रकाश आत्मोन्नतीची दिशा दाखवतो. तिच्यामुळं आत्मबोधाची दालनं खुली होतात. म्हणून तर एखादा रिक्षावाला पिता नि लोकांची धुणी-भांडी करणारी माता आपल्या मुलांनी शिकून गुणवत्ता वाढवावी नि गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर, इंजिनिअर होऊन सुखी जीवनाची गुढी उभारावी, यासाठी अहोरात्र कष्ट उपसतात, अर्धपोटी राहतात नि सुदैवानं त्यांचं स्वप्न सफल झालं तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं मानतात.
गुणवत्तेची महती जर आमचा कष्टकरी, कामकरी, शेतकरी स्वत:चा घाम गाळता-गाळता जाणू शकतो, तर समाजाच्या सर्वच स्तरांतील जनलोकांनी सर्वच क्षेत्रातील गुणवत्ता कशी राखली जाईल, तिची चिरंतन वृद्धीच कशी होईल, याकडं सर्वंकष लक्ष सतत पुरवलं, त्यासाठी गरजूंना मदतीचा समर्थ प्रेमळ हात पुढं केला, अभेदभाव राखला तर आजही गुणवत्तेचं प्रमाण वाढतच राहील.
पै वसंताचे रिगवणे।
झाडाचे नि साजेपणे।
जाणिजे तेवी करती।
सांगती ज्ञान।
वसंताचा प्रवेश असा झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, तसा कोणताही देश, कोणताही समाज त्याच्यातील गुणवत्तेवरून जाणता येतो. ‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ तेव्हा आपला देश, आपली संस्कृती जर या गुणवत्तेवरून ओळखली जाते, तर तिची कास आपण प्रत्येकानं धरण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे?