९६ वर्षे जगलेल्या राणी एलिझाबेथ यांनी बदलते जग अनुभवले; नामधारी राणीची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:48 AM2022-09-12T10:48:25+5:302022-09-12T10:48:50+5:30
जागतिक महासत्तेचा लंबक युरोपने गमावला. बलाढ्य रशिया व अमेरिका, त्यांच्यातील शीतयुद्ध, नंतर जपान, चीन असा हा लंबक हेलकावत राहिला. शेकड्यांनी देश स्वतंत्र झाले. त्यांनी लोकशाही स्वीकारली
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने शरणागती पत्करली. मित्रराष्ट्रांनी निर्विवादपणे महायुद्ध जिंकले, त्या दिवशी म्हणजे ८ मे १९४५च्या रात्री अख्खे लंडन शहर विजय साजरा करायला रस्त्यावर उतरले होते. एलिझाबेथ व मार्गारेट या ब्रिटनच्या राजकन्याही आईकडून विशेष परवानगी काढून जल्लोषात सहभागी झाल्या. त्या तिनेक तास बकिंगहम पॅलेसच्या बाहेर होत्या. २०१५ साली दिग्दर्शक ज्युलियन जेरॉल्ड यांनी ‘अ रॉयल नाइट आऊट’ चित्रपटात थोडे स्वातंत्र्य घेताना या घटनेला रोमँटिक वळण दिले, की गर्दीत दोघींची चुकामूक होते. वेगवेगळ्या बसमधून जाताना मार्गारेटला एक नाविक तर एलिझाबेथला वैमानिक भेटतो. चौघांकडेही काही गुपिते असतात आणि त्यातून हळवे क्षण साकारतात. कॅनडियन सारा गेडनच्या रूपातील एलिझाबेथ अनेकांना भावली.
प्रत्यक्षात दोन्ही राजकन्यांना युद्धकाळात लंडनपासून दूर स्कॉटलंडमध्ये ठेवण्यात आले होते. असे काही चित्रपट किंवा वेबसिरीजच्या नायिका असलेल्या, ब्रिटिश राजमुकुट सर्वाधिक काळ भूषविलेल्या महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले आणि तब्बल सत्तर वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीचे चलचित्र जगाच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. दुसऱे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच एलिझाबेथ यांना प्रिन्सेस ही उपाधी लाभली होती. कारण, चुलते एडवर्ड यांनी अमेरिकन घटस्फोटितेशी लग्न करण्यासाठी चक्क सूर्य न मावळणाऱ्या बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचे सिंहासन नाकारले होते. एलिझाबेथ व मार्गारेट यांचे वडील पंचम जॉर्ज गादीवर आले होते. एलिझाबेथ यांचा नातू प्रिन्स हॅरी व नातसून मेघन यांनी ऐंशी वर्षांनंतर एडवर्ड यांच्या पावलावर पाऊल टाकले, तर राजकुमारी डायना यांनीही थोडा मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केला होता. ९६ वर्षे जगलेल्या राणी एलिझाबेथ यांनी बदलते जग अनुभवले. सत्तर वर्षांत जग पूर्णत: बदलले.
जागतिक महासत्तेचा लंबक युरोपने गमावला. बलाढ्य रशिया व अमेरिका, त्यांच्यातील शीतयुद्ध, नंतर जपान, चीन असा हा लंबक हेलकावत राहिला. शेकड्यांनी देश स्वतंत्र झाले. त्यांनी लोकशाही स्वीकारली. आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण, मध्यमवर्गाची भरभराट, विज्ञान - तंत्रज्ञानातील भरारी, अंतराळात मानवी पाऊल, ब्रह्मांडाचा वेध असे स्थित्यंत्तराचे टप्पे जगाने अनुभवले. या काळात “इंग्लंडची महाराणी” ही एकच बाब जणू स्थिर होती. द ओन्ली कॉन्स्टन्ट इन द चेंजिंग वर्ल्ड! महत्त्वाचे म्हणजे, जगभर सामान्य माणसे सत्तेवर आली. लोकच सरकार बनवू लागले. सम्राट नामधारी व राजघराणी नाममात्र बनली. परंपरांची जळमटे मिरविणाऱ्या भव्य राजप्रासादांना प्रत्यक्षात काळ्या गढीच्या ओसाड भिंतींची अवकळा आली. राणीसाठी हे स्थित्यंत्तर अधिक मर्मभेदी. ब्रिटिश जोखडातून मुक्त झालेल्या भारताच्या कारभाराशी एलिझाबेथ यांचा संबंध आला नाही. भारतीय स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी त्या गादीवर आल्या. त्यामुळेच भारत भेटीत सम्राज्ञीचा तोरा फार मिरविता येणार नाही, याचे पुरेसे भान महाराणी एलिझाबेथ यांना होते.
तीन भारतीय भेटीमध्ये त्यांनी कधीकाळच्या इथल्या रयतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. १९६१ साली त्यांची पहिली भेट तर राजा किंवा राणीचा भारतीय उपखंडात पन्नास वर्षांनंतरचा दौरा होता. भारतीयांना तरूण राणीचे प्रचंड आकर्षण होते. विमानतळावरून राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या महाराणीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा दहा लाखांवर लोक तिष्ठत उभे होते. राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीसाठी १९८३ साली त्यांचा दुसरा दौरा झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवासाठी १९९७ साली त्या आल्या, तेव्हा भारतीयांची ऐंशी वर्षांची ठसठसती जखम असलेल्या “जालियनवाला बागे”ला त्यांनी भेट दिली. त्या नरसंहारासाठी राणीने भारताची माफी मागावी, यासाठी आंदोलन झाले. परंतु, त्यांनी माफी मागितली नाही. त्याऐवजी फाळणीवेळच्या रक्तपाताबद्दल सहानुभूती व्यक्त केली. खरे पाहता या भेटीपेक्षा अनमोल कोहिनूर परत देण्याची मागणी हा एलिझाबेथ यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीशी भारताचा अधिक निकटचा संबंध.
तेराव्या शतकात गुंटूरच्या खाणीतून मिळालेला कोहिनूर अनेक राजे-सम्राटांकडे फिरून महाराजा रणजितसिंहांकडून एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला ब्रिटिश राजघराण्यात पोचला. राणीच्या रत्नजडीत मुकुटावर विराजमान झाला. एलिझाबेथ यांच्या मातोश्रींच्या निधनावेळी त्याचे जगाला अखेरचे दर्शन झाले. आता एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पुन्हा एकवार सोशल मीडियावर कोहिनूर झळकला इतकेच.