कोरोनामुळे उद्भवला जैविक युद्धाचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:17 AM2020-02-10T05:17:00+5:302020-02-10T05:18:04+5:30
व्हायरसची माहिती देणाऱ्या डॉ. वेनलियांग यांचा मृत्यू : त्यांना पोलिसांनी ताब्यात का घेतले होते?
कोरोना व्हायरसने मांडलेल्या उच्छादामुळे काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावर विचार केला असता भयानक चित्र दिसून येते. चीनने वुहान येथील सीफूड मार्केटमधून व्हायरसचा प्रसार झाल्याची गोष्ट दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट अमेरिकेचे सिनेटर टॉम कॉटन यांनी उघड करून जगभर खळबळ माजवून दिली आहे. हा व्हायरस वुहानच्या इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजी येथून निघाला असण्याची शक्यता आहे. आपल्या माहितीसाठी टॉम कॉटन यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही, तरीही त्यांचे म्हणणे डावलता येणार नाही. चीनच्या भूमिकेने आणि वुहान सेंट्रल हॉस्पिटल येथील डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूने गंभीर संशयाचे वातावरण मात्र निर्माण झाले आहे.
डॉक्टर वेनलियांग यांनी आपल्या सहकाऱ्यांना डिसेंबर महिन्यातच या गंभीर प्रकारच्या व्हायरसची कल्पना देताना स्पष्ट केले होते की, त्यावर आपल्याजवळ कोणताही इलाज नाही! कोरोनाने बाधित रोगी त्यावेळी वुहानच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले होते. डॉ. वेनलियांग यांनी याची माहिती सोशल मीडियावरही दिली होती. त्यामुळे चीनच्या पोलिसांनी १ जानेवारी २०२० रोजी डॉक्टरांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांना लिहून दिले की, आपण सोशल मीडियावर जे लिहिले होते ते चुकीचे होते! त्यानंतरच ३ जानेवारी रोजी त्यांची सुटका करण्यात आली होती! त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये कामावर रुजू झाले होते, पण गेल्याच आठवड्यात कोरोना व्हायरसने त्यांचा बळी घेतला.
आता प्रश्न असा आहे की, चीनच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात कशासाठी घेतले होते? कारण तोपर्यंत कोरोनाने महामारीचे रूप धारण केले होते. डॉक्टर वेनलियांग यांना मिळालेली माहिती दडपून ठेवण्याची चीनची इच्छा होती का? वस्तुस्थिती कोणतीही असो, पण चीन आपल्या सुपर लेबॉरेटरी अशी ओळख असलेल्या वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजीत जो व्हायरस विकसित करीत होता तो चुकून बाहेर पडला असावा, अशी आता चर्चा होऊ लागलीय!
ही शंका यासाठी व्यक्त करण्यात येत आहे कारण सध्या जैविक शस्त्रास्त्रांविषयी जगात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि ब्रिटन या देशांनी जैविक शस्त्रास्त्रे बाळगायला सुरुवात केली आहे. उत्तर कोरियानेदेखील जैविक शस्त्र बनवायला सुरुवात केली आहे. एका देशातून दुसºया देशात जैविक शस्त्रांच्या तस्करीचा धोकाही आहे. गेल्याच आठवड्यात हॉर्वर्ड विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख चार्ल्स लिव्हर यांना चीनला मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली, तेव्हा चीनने अमेरिकेपर्यंत मजल मारली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
जैविक शस्त्रांचा इतिहास तसा जुनाच आहे. १९३२ मध्ये जपानने चीनच्या क्षेत्रात विमानाच्या माध्यमातून किटाणूंनी संक्रमित केलेले गव्हाचे दाणे फेकले होते. त्यामुळे चीनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव होऊन ३,००० लोकांचे जीव गेले होते. जैविक शस्त्रे ही धोकादायक असतात, असे मानले जाते. कारण काही काळातच त्यामुळे मोठ्या प्रदेशातील लोक आजारी पडून प्राणाला मुकतात. जैविक शस्त्रे ही रासायनिक शस्त्रास्त्रांपेक्षा घातक समजली जातात. कारण त्याचा संसर्ग खाद्यपदार्थातून तसेच मांस आणि माशांच्या माध्यमातून नव्हे तर फळांच्या माध्यमातूनही व्यापक परिसरात होत असतो. त्यामुळे प्रभावाच्या दृष्टीने हे हत्यार रासायनिक शस्त्रास्त्रांपेक्षा घातक ठरले आहे. कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत जी पडताळणी झाली ती पाहता अशी माहिती मिळाली आहे की, तो लवकरच कोट्यवधी लोकांना आपल्या कवेत घेईल, अशा प्रचंड गतीने वाढत आहे. हा विषाणू अवघ्या सहा महिन्यांत ३ कोटी ३० लाख लोकांचा बळी घेईल, असा बिल गेट्स यांनी दिलेला इशाराही स्मरणात ठेवावा.
जगासमोर याहून भयंकर चिंता ही आहे की, ही जैविक शस्त्रास्त्रे जर दहशतवादी गटांपर्यंत पोहोचली तर काय अनर्थ होईल? २०१६ साली आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटनेने शंका व्यक्त केली होती की, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जैविक शस्त्रास्त्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालविला असून, त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यावेळी अमेरिकेच्या जेम्स स्टॅवरिडिस या ज्येष्ठ अधिकाºयाने म्हटले होते की, इबोला आणि जीका यांसारखे घातक व्हायरस जर दहशतवाद्यांच्या हाती लागले तर ते जगात धुमाकूळ घालतील आणि त्यातून ४० कोटी लोक दगावतील.
आपल्या देशासाठीसुद्धा हा विषय चिंतेचा आहे, हे उघड आहे. कारण आपला देशही दहशतवाद्यांना तोंड देत आहे, तसेच आपल्या देशाच्या सीमा चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलेल्या आहेत. २०१७ साली अफगाणिस्तानातील लोकांच्या अंगावर मोठमोठे फोड येऊ लागले तेव्हा रासायनिक हल्ला झाल्याची चर्चा झाली होती. त्यावेळी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर
पर्रिकर म्हणाले होते की, रासायनिक शस्त्रास्त्रांचा सामना करण्याची आपण तयारी ठेवायला हवी. आता प्रश्न हा आहे की, आपण खरोखरच कितपत सज्ज आहोत?... आणि जगासमोर हे आव्हान आहे की, जैविक आणि रासायनिक हत्यारांवर कशा प्रकारे प्रतिबंध घालता येईल?
- विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह