प्रश्न विश्वासार्हतेचा आहे!
By admin | Published: October 6, 2016 05:21 AM2016-10-06T05:21:20+5:302016-10-06T05:21:20+5:30
आधी एक पोटार्थी (की पोटावळा?) पत्रकार म्हणून मुंबईत पाय ठेवलेल्या, त्याच सुमारास तेथील जाज्वल्य मराठी आणि महाराष्ट्राभिमानी संघटनेने आता मराठी मराठी फार झाले
आधी एक पोटार्थी (की पोटावळा?) पत्रकार म्हणून मुंबईत पाय ठेवलेल्या, त्याच सुमारास तेथील जाज्वल्य मराठी आणि महाराष्ट्राभिमानी संघटनेने आता मराठी मराठी फार झाले, त्याने फारसा लाभ होत नाही असा विचार करुन हिन्दीभाषकांना कुरवाळण्यासाठी सुरु केलेल्या हिन्दी सायंदैनिकात प्रवेशलेल्या, संधीचा शोध यशस्वी ठरताच हे दैनिक आणि त्याच्या प्रतिपालक संघटनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसात शिरलेल्या, शत्रू गटातला कुणी अलबत्या गलबत्या जरी येऊन मिळाला तरी मोगलांच्या तंबूचे कळस कापून आणल्यावर आनंदून जाणाऱ्या मावळ्यांगत आनंदून गेलेल्या काँग्रेसने लगोलग शुद्ध करुन घेऊन थेट लोकसभा दाखविलेल्या संजय निरुपम नावाच्या पुरुषोत्तमाच्या आणि शिवसेनेसारख्या संघटनेच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न नाही. पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना युद्धपिपासू अशी उपाधी बहाल करणाऱ्या, राहुल गांधी यांचे स्वयंघोषित सखा, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून दीर्घकाळ मिरवून घेणाऱ्या आणि कदाचित त्यापायीच आज परिघाबाहेर नेऊन सोडण्यात आलेल्या दिग्विजय सिंह यांच्याही विश्वासार्हतेचा हा प्रश्न नाही. लोकानी आपल्याला केवळ भांडाभांडी करण्यासाठीच सत्तेत नेऊन बसविले आहे अशी ठाम समजूत करुन घेऊन तसेच वागणाऱ्या व आपण एका छोट्या राज्याचे केवळ अर्धे मुख्यमंत्री आहोत याचे भान सोडून देऊन भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधानाशी सतत बरोबरी करु पाहाणाऱ्या, तात्त्विकतेची व शुद्ध आचरणाची सतत दुहाई देत राहतानाच स्वत:च्या वर्तुळात अनेक कलंकितांचा सुखेनैव वावर सहन करीत राहाणाऱ्या महानुभाव अरविंद केजरीवाल यांच्यादेखील विश्वासार्हतेचा हा प्रश्न नाही. पाकिस्तानी कलाकार आर्टिस्ट आहेत टेररीस्ट नाहीत असे बोबडे बोल बोलणाऱ्या सलमान खानच्या, लष्करात वा सीमा सुरक्षा दलात त्यांना मरायला जायला सांगितले होते कुणी, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या ओम पुरीच्या आणि ज्यांना नोकरी मिळत नाही ते लष्करात भरती होतात असे हिणकस उद्गार काढून स्वत:मधील हिणकस वृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या व माध्यमांनी डोक्यावर चढवून घेतलेल्या कन्हैयाकुमार याच्यासुद्धा विश्वासार्हतेचा हा प्रश्न नाही. नरेन्द्र मोदी यांनी खड्यासारखे बाजूला काढून ठेवल्याचा राग अगदी प्रतिशोधाच्या भावनेतून सतत व्यक्त करीत राहाताना मोदींना जळी स्थळी काष्टी पाषाणी पाण्यात पाहाणाऱ्या अरुण शौरी किंवा इतके दिवस मोदींचा द्वेष करता करता आता अचानक मोदीप्रेमाचे कढ येणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्यासारख्या भाजपातील निर्माल्याच्या विश्वासार्हतेचाही हा प्रश्न नाही. आतून अत्यंत घबराटलेल्या पण वरकरणी नाटक करीत काही विदेशी पत्रकारांना हाताशी धरुन भारताने सर्जिकल स्ट्राईक वगैरे काहीही केलेले नाही तो भारताचा बनाव आहे असे जगाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विश्वासार्हतेचा तर प्रश्नच निर्माण होत नाही कारण विश्वास आणि विश्वासार्हता यांचा थेट जन्मापासूनच पाकिस्तानचा अगदी दुरुनदेखील संबंध नाही. त्यामुळे प्रश्न आहे तो भारतीय जनतेच्या मनात दृढपणे वसलेल्या भारतीय लष्कराविषयीच्या आणि स्वत:च निवडून दिलेल्या सरकारविषयीच्या विश्वासाचा आणि पर्यायाने खुद्द सरकारच्या विश्वासार्हतेचा. त्यामुळे पाक बळकावून बसलेल्या काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी जे शौर्य गाजविले त्याविषयी आम भारतीयांच्या मनात आदराबरोबरच कौतुक आणि अभिमानदेखील आहे. पण युद्धस्य कथा रम्या: हे वचन लक्षात घेता, अशा शौर्यगाथा लोकाना तपशीलात जाऊन ऐकायला आणि वाचायला आवडत असतात हे सार्वत्रिक सत्य आहे. आणि तंत्रशास्त्रात झालेली प्रगती लक्षात घेता आता अशा शौर्यकथा लोक आपल्या डोळ्यांनी बघूदेखील शकतात. त्यामुळे जनतेच्या मनातील ही उत्सुकता शमविण्यासाठी तरी सरकारने आता त्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेचे चित्रीकरण जनतेसाठी खुले करण्याची गरज आहे. गृहमंत्री राजनाथसिंंह यांना या विषयावर छेडले असता त्यांनी थांबा आणि वाटा पाहा इतकेच म्हटले आहे. लष्कराने यशस्वीपणे पार पाडलेल्या मोहिमेचा वृत्तांत केवळ लष्करच जनतेला देईल असे पंतप्रधानांनी ठरविले होते आणि त्यानुसार लष्करी मोहिमेचे महासंंचालक लेफ्टनंट जनरल रणबिरसिंग यांनीच माध्यमांना या मोहिमेचा वृत्तांत कथन केला होता. याचा अर्थ लष्करी कारवाईत लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा केन्द्र सरकारचा मानस होता आणि म्हणूनच त्या मोहिमेचे चित्रिकरण आणि छायाचित्रे जनतेसमोर येऊ द्यायची वा नाही याचा निर्णय सरकार नव्हे तर लष्करच घेणार हे अनुस्यूत होते. पण आता लष्करानेही तसे करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सरकारसमोर अन्य कोणतीही अडचण येण्याचे कारण उरत नाही. लष्कर, सरकार आणि पर्यायाने देश यांच्याविषयी संभ्रम कोण निर्माण करतो हे महत्वाचे नाही. तो निर्माण केला जातो आहे आणि त्याचे निराकरण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.