प्रज्ञा-प्रतिभेचे प्रश्नोत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:23 AM2018-04-05T00:23:30+5:302018-04-05T00:23:30+5:30
प्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता.
- डॉ. रामचंद्र देखणे
प्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता. माघाला उगाच अहंकार वाटू लागला की, या अरण्यात राजा भोजला वनश्री इतकीच माझी प्रतिभाही आनंद देत आहे. तेवढ्यात आकाशात ढग दाटून आले. विजा चमकू लागल्या. अंधार पडला आणि पाऊस पडू लागला. बाजूला एक झोपडी होती. दोघेही झोपडीपाशी आले. आत एक म्हातारी बसली होती. पावसात भिजू नये म्हणून दोघेही आत गेले आणि म्हातारीला विचारले, ‘आजीबाई हा रस्ता कुठे जातो? ‘बाबांनो रस्ता कुठे जात नाही, या रस्त्यावरून चालणारा फक्त जात असतो. आजीच्या उत्तराने दोघेही अवाक् झाले आणि पुढे म्हणाले, ‘आजी आम्ही प्रवासी आहोत’ ‘बाबारे प्रवासी दोनच आहेत. एक सूर्य आणि दुसरा चंद्र. अखंड प्रवास करून जगाला प्रकाश देतात’ या उत्तरापुढे आता काय म्हणावे? राजा म्हणाला, ‘आजी आम्ही पाहुणे आहोत’ ‘पाहुणे तर दोनच आहेत. एक धन आणि दुसरे यौवन’ ‘आजी मी राजा आहे आणि हा पंडित’ ‘काही तरीच काय सांगता? राजा फक्त इंद्र आणि मृत्यू आहे. त्याच्या नियंत्रणात सर्व आहे आणि पंडित म्हणाल तर एक बृहस्पती आणि दुसरा शुक्राचार्य’
‘आजीबाई आम्ही मजूर आहोत’
‘खोटे बोलू नकोस. मजूरही दोघेच एक भूमी आणि दुसरी स्त्री. आयुष्यभर दुसऱ्यांचे भार वाहते’... ‘आजी आम्ही हरलो’
‘जगात दोघेच हरलेत. एक कर्जदार आणि दुसरा मुलीचा बाप...’ प्रज्ञावान महाकवी आणि व्यासंगी राजाही आजीच्या उत्तराने निरुत्तर झाला. भोजराजाच्या दरबारातच केवळ प्रज्ञावंत माणसे नव्हती तर त्याच्या राज्यातील सामान्य झोपडीतली माणसेही किती प्रतिभावान होती. जर समजा ही घटना आजच्या वर्तमानात घडली असती तर... राजा आणि माघ आजीबाईला म्हणाले असते.
‘आजीबाई तुमच्या उत्तराने आम्ही निर्भय झालो. त्यावर आजीने भाष्य केले असते, ‘निर्भय तर दोघेच असतात. एक साहित्यिक आणि दुसरा पत्रकार’ खरंतर दोघेही जीवनाचे भाष्यकार. साहित्यिकाची लेखणी ही धनुष्यासारखी असते तर पत्रकाराची लेखणी ही बाणासारखी.