डॅडींचा सोप्पा पेपर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:37 AM2018-08-24T06:37:04+5:302018-08-24T06:39:09+5:30
प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला.
प.पू. डॅडी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरील परीक्षेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याचे ऐकून व वाचून चाळीतील प्रत्येकाचा ऊर भरून आला. डॅडींची ती ऐतिहासिक प्रश्नपत्रिका आमच्या हाती लागली असून विनाविलंब त्यास प्रसिद्धी देत आहोत...
प्रश्न क्र. १) गाळलेल्या जागा भरा
अ) महात्मा गांधी यांची निर्भर्त्सना अर्धनग्न... म्हणून केली जायची.
ब) गांधीजींच्या आजोबांचे नाव... होते.
क) गांधीजींनी ... पदवी प्राप्त केली होती.
ड) महात्माजींचे.... हे गुरू होते.
......................
प्रश्न क्र. २) योग्य पर्याय निवडा
अ) गांधीजींना ‘महात्मा’ ही उपाधी कुणी दिली?
अ) शर्मिला टागोर, ब) रवींद्रनाथ टागोर, क) उत्पल टागोर, ड) देब टागोर
ब) लहानग्या मोहनदासच्या मनावर कोणत्या कथेचा परिणाम झाला?
अ) डोरेमॉन, ब) हॅरी पॉटर, क) श्रावणबाळ, ड) संतोषीमाता.
क) गांधीजींच्या आंदोलनाचे नाव काय?
अ) मूक मोर्चा, ब) ठोक मोर्चा, क) तिरडी मोर्चा, ड) असहकार.
ड) गांधीजींची हत्या कुठे झाली?
अ) गांधी भवन, ब) नेहरू सायन्स सेंटर, क) बिर्ला भवन, ड) गांधीनगर स्टेशन.
.........................
प्रश्न क्र. ३) योग्य जोड्या जुळवा
विन्स्टन चर्चिल - जालियनवाला बाग
नीळ - दांडी यात्रा
कस्तुरबा- आई
जनरल डायर- नंगा फकीर
पुतळीबाई - पत्नी
डर्बन - रेल्वेतून ढकलले
मीठ- चंपारण
पीटरमारित्झबर्ग - टोपी काढायला लावली.
..................
प्रश्न क्र. ४) खालीलपैकी कोणत्याही तीन विषयांवर १० ते १५ ओळीत टीप लिहा.
अ) आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन
ब) भारत छोडो आंदोलन
क) गोलमेज परिषद
ड) करा किंवा मरा
.........................
प्रश्न क्र. ५) खालील विधाने कोण कोणास म्हणाले ते संदर्भासह स्पष्ट करा. (कोणतीही दोन)
अ) मांस, बाई व बाटली यापासून आपण आयुष्यभर दूर राहू.
ब) अगोदर या देशाचा संपूर्ण दौरा करा, देश नीट पाहा आणि मगच राजकारणात प्रवेश करा.
क) स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणण्याकरिता स्वत:चे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता हवी.
ड) दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिकदृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे.
.............
निबंध लिहा
अ) नथुराम तुमच्या समोर उभा राहिला तर...
ब) गांधीगिरी काळाची गरज आहे का?
क) ड्राय डेने देश व्यसनमुक्त होईल का?
(डॅडींची उत्तरपत्रिका हाती लागताच ती जाहीर करू.)
- संदीप प्रधान