हा प्रश्न मोदींनी स्वत:लाच विचारायचा..

By admin | Published: April 6, 2017 12:07 AM2017-04-06T00:07:49+5:302017-04-06T00:07:49+5:30

देशाच्या पंतप्रधानाने आपल्या तरुणाईला विचारावा की विचारू नये हा प्रश्न दिसतो तेवढा साधा नाही.

This question was asked by Modi himself. | हा प्रश्न मोदींनी स्वत:लाच विचारायचा..

हा प्रश्न मोदींनी स्वत:लाच विचारायचा..

Next

‘तुम्हाला टूरिझम हवा की टेररिझम’ हा नरेंद्र मोदींनी काश्मिरातील तरुणांना विचारलेला प्रश्न सरळ व साधा दिसणारा असला तरी तो देशाच्या पंतप्रधानाने आपल्या तरुणाईला विचारावा की विचारू नये हा प्रश्न दिसतो तेवढा साधा नाही. काश्मिरातील टेररिझम तिथल्या तरुणांनी आणला नाही. झालेच तर त्या राज्याचा संपत चाललेला टूरिझमही त्या तरुणांनी संपविलेला नाही. तिथला टेररिझम पाकव्याप्त काश्मिरातून आणि प्रत्यक्ष पाकिस्तानातून आलेला आहे व तो रोखण्यात आणि त्याच्या प्रचारी प्रभावापासून काश्मिरातील तरुणांना दूर ठेवण्यात जम्मू आणि काश्मीरच्या सरकारांएवढेच भारताच्या आजवरच्या सरकारांनाही अपयश आले आहे. काश्मिरातील असंतोषाला धर्मविद्वेषाची धार आहे हे एक वास्तव आहे. मात्र ही धार कमी करायची आणि राजकारण धर्ममुक्त करायचे तर त्याची सर्वात मोठी जबाबदारी सरकारवर येणारी आहे. राजकारण आणि धर्म यांना काश्मिरी तरुणांनी एकत्र आणले नाही. ते तेथील राजकारण्यांएवढेच दिल्लीच्या राजकारणकर्त्यांनीही एकत्र आणले आहे. त्यामुळे राजकारणाला धर्मनिरपेक्ष बनविण्याच्या जबाबदारीचा आरंभही दिल्लीतच व्हायला हवा. तो होत नाही. उलट दिल्लीचे राजकारण दिवसेंदिवस जास्तीचे धर्मग्रस्त व धर्मविद्वेषाचे होत चालले आहे. गेली ६० वर्षे काश्मीरचे खोरे लष्कराच्या नियंत्रणात आहे. तेथील मुलकी प्रशासनही लष्कराच्या व आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट या जुलुमी कायद्याच्या बळावर उभे आहे. गेल्या साठ वर्षातील प्रत्येकच महिन्यात त्या राज्यातील ३० ते ५० मुले लष्कराच्या गोळ्यांना व पाकिस्तानी घुसखोरांच्या हल्ल्यांना बळी पडली आहेत. मृत्यूचा हा हिशेब २० हजाराच्या पुढे जाणारा आहे. काश्मीर खोऱ्याची २५ लक्ष ही लोकसंख्या लक्षात घेतली तर तेथे घरटी एक तरुण असा मारला गेला आहे. मारली गेलेली सगळी मुले टेररिस्ट किंवा पाकधार्जिणी होती असे म्हणण्याचे धाडस मोदींनाही करता येणार नाही. रोजगाराची उपलब्धी, उद्योगधंद्यांचा विकास, कारखान्यांची उभारणी व कृषी उत्पादनाला सहाय्य या सगळ्या प्रकारांपासून वंचित राहिलेल्या आणि केवळ देशी व विदेशी प्रवाशांच्या आणि तेथे होणाऱ्या केशर व शालींसारख्या वस्तूंवर आयुष्य काढणाऱ्या तरुणांमध्ये समाधान व संतोष कोठून व कसा येणार? त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा आणि तुमची उत्तरेही तुम्हीच मिळवा असे त्या अभागी पोरांना ऐकवून चालणार नाही. काश्मिरात टूरिझम वाढवायचा की टेररिझम जगू द्यायचा हा प्रश्न सरकारसमोरचा आहे आणि त्याचे उत्तरही सरकारनेच दिले पाहिजे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीवरील निष्ठेवर धर्मांधतेला किती मात करू द्यायची याही प्रश्नाचे उत्तर मोदींच्याच सरकारला द्यावे लागणार आणि त्याची सुरुवात मोदींना स्वत:पासूनच करावी लागणार. एखाद्या प्रदेशात नुसती सुबत्ता आली आणि लोक संपन्न झाले म्हणजेच तो प्रदेश शांत व समाधानी होतो असे समजण्याचे कारण नाही. जर्मनी व जपान हेही सधन देशच होते. तरीही त्यात हुुकूमशाही आली. अमेरिका हा आजचा जगातला सर्वात श्रीमंत देश आहे आणि त्यात लोकांनी ट्रम्पशाहीला सत्तेवर आणले आहे. अशांतता मध्यपूर्वेतच नाही, ती युरोप आणि अमेरिकेतही आहे. ती घालवायची तर ‘टूरिझम हवा की टेररिझम’ असा उथळ प्रश्न नव्या मुलांना विचारून चालणार नाही. त्यासाठी राजकारणाला व नेतृत्वालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. काश्मिरातील तरुण अंगावर शालींची वजनदार ओझी घेऊन देशभर हिंडतात. त्या शाली विकत घेऊन त्या मुलांना मदत करावी एवढे औदार्य आपल्यातील किती जणांजवळ आहे? ती मुले बिचारी ती ओझी घेऊन तशीच आपल्या प्रदेशात परत जातात. अशा एका तरुणाजवळून काही शाली विकत घेतल्या तेव्हा प्रस्तुत लेखकाजवळचे काही पैसे कमी पडले. त्यावर तो म्हणाला, ‘रहने दिजिये साहब. अगले साल आऊंगा तो ले लूंगा’ त्यावर पुढल्या वर्षी आम्हीच येथे नसलो तर, असे विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘साहब, वैसे भी तो वापीस जा कर भुकेही रहना है’ या तरुणांनी टेररिझम आणि टूरिझम यातून हवे ते निवडायचे असते काय? आपण विचारलेल्या अशा प्रश्नांची उत्तरे कशी येऊ शकतात, हे नेत्यांनाही कळू नये काय? सरकार टेररिझम थांबविणार नाही आणि त्यामुळे टूरिझम बंद पडला तर त्या दोहोंचेही बळी ठरणाऱ्यांना ‘यातले तुम्ही काय निवडाल’ असे विचारायचे असते काय? काश्मीरचा प्रदेश भारतात असणे हे त्याच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे सर्वात मोठे उदाहरण आहे असे पं. नेहरू व सरदार पटेल म्हणत. तो काळ आता लोटला. खरे तर त्या नंतरच्या काळात काश्मीरला खरोखरीच्या नंदनवनाचे स्वरूप यायचे. पण राजकारण खेकड्याच्या वाकड्या चालीने चालते. राजकारणासाठी धर्माचा व जातीचा वापर करणाऱ्यांनी त्या प्रदेशाला देशाजवळ येऊच दिले नाही. त्याला जवळ आणणे व आपलेसे करणे हे देशातील बहुसंख्य समाजाचे, त्याचे राजकारण करणाऱ्यांचे, सत्ताधाऱ्यांचे व नेतृत्वाचे काम आहे. त्यामुळे मोदींच्या प्रश्नाचे उत्तर मोदींनी स्वत:च शोधायचे व देशाला द्यायचे आहे.

Web Title: This question was asked by Modi himself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.