परीक्षेच्या हंगामात अनेकांचे कोटकल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:21 AM2018-03-31T02:21:19+5:302018-03-31T02:21:19+5:30

खेड्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला की, फक्त परीक्षेलाच जायचे असते. कॉपी उघड चालते. पर्यवेक्षक, भरारी पथकात निवड यासाठी लॉबिंग होते.

Quota of many in the test season | परीक्षेच्या हंगामात अनेकांचे कोटकल्याण

परीक्षेच्या हंगामात अनेकांचे कोटकल्याण

Next

खेड्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला की, फक्त परीक्षेलाच जायचे असते. कॉपी उघड चालते. पर्यवेक्षक, भरारी पथकात निवड यासाठी लॉबिंग होते. असे वरपासून खालपर्यंत सारे काही बिनबोभाट चालू आहे. परीक्षा म्हणजे एक हंगाम आहे. या हंगामात अनेकांचे दरवर्षी कोटकल्याण होते.

बरे झाले मराठवाड्याचे नाव कुठे तरी झळकले. परीक्षेतील कॉपीमध्ये मराठवाडा अव्वल असल्याची बातमी आली, म्हणजे कोणत्या तरी क्षेत्रात कर्तबगारी दाखविली असेच म्हणायला पाहिजे. शेतकरी आत्महत्येत आघाडीवर, कचरा करण्यात पुढे, टँकर मागणीसाठी आग्रही, विविध आघाड्यांवर मराठवाड्याची कीर्ती असताना त्यात आणखी एक भर पडली. यानिमित्ताने आणखी एक आठवण झाली की, २०१० ते १३ या काळात तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी घेतलेल्या कॉपीमुक्त अभियानाची. या काळात मराठवाडा कॉपीमुक्त झाला होता. आजची वाताहत पाहता असे खरेच झाले होते का? असा विचार येतो.
हे झाले १० वी, १२ वीचे. विद्यापीठाच्या पातळीवर वेगळे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गेल्या पाच दिवसांत ५०४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. कॉपी हा सुनियोजित धंदा आहे. त्याचे वेगळेच अर्थकारण आहे आणि यात सारी शिक्षण व्यवस्थाच बरबटलेली आहे. कॉपीसाठी काही गावे, शहरे, शाळा, महाविद्यालये कुप्रसिद्ध आहेत. अशा शाळा, महाविद्यालये आडमार्गावर असतानाही शहरासारखा तेथे विद्यार्थीसंख्येचा प्रश्न कधी निर्माण होत नाही, उलट देणगी देऊन येथे विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रवेशासाठी अक्षरश: रांगा लागतात. गेल्या वर्षी औरंगाबादेत वसंतराव नाईक महाविद्यालयात कॉपी पकडणाऱ्या प्राध्यापकाला विद्यार्थ्याने मारहाण केली होती. ‘आम्ही किती प्रयत्न करून हे केंद्र मॅनेज केले, त्यासाठी पैसे मोजले’ असे त्याने जाहीर सांगितले होते.
हे अर्थकारण फक्त परीक्षा केंद्रापुरते मर्यादित नाही. महाविद्यालयात प्रवेश, परीक्षा केंद्रावर नियंत्रकांच्या नियुक्त्या, भरारी पथकांमध्ये समावेश, शिक्षक, प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग, संस्था चालकांचा आशीर्वाद, अशा सगळ्याच पातळ्यांवर परीक्षेची जय्यत तयारी असते. एक तर महाविद्यालयांमध्ये शिकविणे बंदच झाले. १० वी, १२ वीची मुले शाळेपेक्षा खासगी शिकवण्याच पसंत करतात. खेड्यातील महाविद्यालयांत प्रवेश घेतला की, फक्त परीक्षेलाच जायचे असते. कॉपी उघड चालते. पर्यवेक्षक, भरारी पथकात निवड यासाठी लॉबिंग होते. असे वरपासून खालपर्यंत सारे काही बिनबोभाट चालू आहे. परीक्षा म्हणजे एक हंगाम आहे. क्रिकेट, खरीप, रबी ज्याचा व्यवसायालाफायदा होतो. तसे या परीक्षा हंगामात अनेकांचे दरवर्षी कोटकल्याण होते. आता भास्कर मुंडे यांनी त्यावेळी काय केले, तर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती असते, ही कागदावरची समिती त्यांनी सक्रिय केली. कुप्रसिद्ध शाळांची यादी करून तेथे प्रामाणिक कर्मचाºयांची बैठी पथके बसवली. काही राजकीय नेत्यांच्या संस्थांना कुुलूप ठोकले. शिक्षण क्षेत्रातील संघटना अंगावर आल्या तर त्यांचा कायदेशीर बंदोबस्त केला. गुन्हे दाखल केले. या प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम म्हणजे ९५ टक्के निकाल असलेल्या लातूरची टक्केवारी ४१ वर, नांदेडची ३२ टक्क्यांवर घसरली होती. कॉपीला आळा बसला होता. सगळी महसूल यंत्रणा कामाला लावली होती, पण अधिकारी बदलला की, स्थिती पूर्वपदावर येते, तसे येथेही झाले. कॉपीबहाद्दर आणि सगळीच यंत्रणा मोकाट झाली आणि कॉप्यांचा धुमाकूळ चालला. त्यात अवघे शिक्षण क्षेत्रच वाहून गेले. मराठवाड्यातील शिक्षणाच्या अवनतीचे आणखी काय रंग पाहायला मिळतात ते पाहायचेच बाकी आहे. इतके सोडले तर सारे काही आलबेल.
- सुधीर महाजन

Web Title: Quota of many in the test season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.