भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनविणारे आर. व्ही. भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:08 AM2020-06-15T03:08:23+5:302020-06-15T03:09:28+5:30

कधी काळी अमेरिकेत ‘नासा’मध्ये व्हिजीटिंग रिसर्च असोसिएट म्हणून काम केलेले डॉ. भोसले हे डॉ. विक्रम साराभाई आणि प्रा. रामनाथन यांच्या आवाहनानुसार देशसेवेसाठी भारतात आले.

R v bhosale who built Indias first radio telescope | भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनविणारे आर. व्ही. भोसले

भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनविणारे आर. व्ही. भोसले

googlenewsNext

- उदय कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, कोल्हापूर

प्रा. डॉ. राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले रविवारी गेले. माणूस मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडे गावचा. याच माणसानं १९६० मध्ये भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनविला. कधी काळी अमेरिकेत ‘नासा’मध्ये व्हिजीटिंग रिसर्च असोसिएट म्हणून काम केलेले डॉ. भोसले हे डॉ. विक्रम साराभाई आणि प्रा. रामनाथन यांच्या आवाहनानुसार देशसेवेसाठी भारतात आले. प्रा. के. आर. रामनाथन म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांचे पहिले विद्यार्थी. त्यांच्यासोबत आर. व्हीं.ना काम करता आले. पृथ्वीपासून सुमारे ६० ते १००० कि.मी. इतक्या उंचीपर्यंत रेडिओलहरी परावर्तित करणारा वातावरणातील जो थर असतो, त्याचा अभ्यास हा आर. व्हीं.चा मुख्य अभ्यास विषय. आर. व्हीं.ना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्यांचा सहवास तर लाभलाच, पण इस्रोमध्ये डॉ. कलाम यांना रुजू करून घेण्याची शिफारस ज्यांनी केली होती, ते ‘पद्मभूषण’ पुरस्कारप्राप्त प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांच्याशीही आर. व्हीं.चा विशेष स्नेह!
खरे तर आर. व्हीं.सारख्या माणसाला अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीतून निवृत्त झाल्यावर जगात कुठंही मानाचं स्थान उपलब्ध होऊ शकलं असतं आणि त्यांच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतला गेला असता; पण आर. व्हीं.नी आपल्या जन्मभूमीचं ॠण फेडायचं म्हणून कोल्हापुरातच येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. काळाची पावलं ओळखून शिवाजी विद्यापीठात अवकाशशास्त्र विषयक अभ्यास शाखा सुरू व्हायला हवी, असा त्यांचा आग्रह होता. याबाबत ते म्हणत, ‘अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात तर नजीकच्या काळात मोठी प्रगती होणारच आहे; पण त्यात शिवाजी विद्यापीठाला वेगळं स्थान मिळायचं तर प्रथम विद्यापीठात ही शाखा सुरू करायला हवी. भारत सरकारच्या या पुढच्या योजनांमध्ये ‘एज्युसॅट’चा प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा कृत्रिम उपग्रह अवकाशात भूस्थिर करण्यात आला की, ६४ दूरदर्शन वाहिन्या सर्व स्तरावरील शिक्षण तरुणांना देण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. कोल्हापूरची तरुण पिढी आणि विद्यापीठातील वेगवेगळे विभाग मिळून या वाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करू शकतील. या जोडीला अवकाश निरीक्षणासाठी पन्हाळा येथे आपण विद्यापीठाचे एक अवकाश निरीक्षण केंद्र उभे करू. शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात तारांगण व सायन्स म्युझियम आकाराला आणता येईल. हे सगळं आपण करू शकलो तर सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातील तरुणाईला खूप मोठी संधी उपलब्ध होईल आणि देशाच्या व जगाच्या नकाशावर विद्यापीठाचे नाव उंचावेल!’
मात्र, स्थानिक राजकारणी आणि नेत्यांकडूनही याचा पाठपुरावा झाला नाही. आर. व्हीं.सारख्या मोठ्या माणसाला टाळता येणार नाही म्हणून त्यांना शिवाजी विद्यापीठात ‘आॅनररी प्रोफेसर आॅफ स्पेस सायन्स’ या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. स्पेस सायन्स या विषयाचा अभ्यासही विद्यापीठात सुरू करण्यात आला. पन्हाळा येथील अवकाश निरीक्षण केंद्रासाठी जी एक एकर जागा सुचविण्यात आली होती, ती विद्यापीठानं आपल्या ताब्यात घेण्यास वर्षानुवर्षे दिरंगाई केली. सायन्स म्युझियमच्या उभारणीचं त्यांचं स्वप्न अपुरंच राहिलं. नाही म्हणायला ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी’च्या सहकार्यानं शिवाजी विद्यापीठात भूकंप मापनाची उपकरणं त्यांनी बसवून घेतली, तसेच फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी शिवाजी विद्यापीठ आणि आणखी एक संस्था यांच्यामध्ये करार घडवून आणून आयनोस्फिअरमध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलांची नोंद घेण्यासाठी एक रडारही उभारले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आता सगळेच शिक्षण आॅनलाईन किंंवा टी.व्ही.च्या माध्यमातून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता ‘एज्युसॅट’चे व त्यासाठीच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.
कोल्हापूर महापालिकेने ‘कोल्हापूर भूषण’ म्हणून त्यांचा गौरव केला. आर. व्हीं.सारख्या द्रष्ट्या आणि कोल्हापूरअभिमानी शास्त्रज्ञाची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील!

Web Title: R v bhosale who built Indias first radio telescope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.