ज्याचे हाती ससा, तो पारधी!

By admin | Published: January 20, 2015 10:36 PM2015-01-20T22:36:15+5:302015-01-21T02:44:58+5:30

सेंजर आॅफ गॉड’ म्हणजे खरा तर देवदूत. त्यानं कसं, समाजात दुही असेल, दुभंग असेल तर तो सांधण्याचा प्रयत्न करायचा. पण इथं.

The rabbit in his hands, the poodler! | ज्याचे हाती ससा, तो पारधी!

ज्याचे हाती ससा, तो पारधी!

Next

मेसेंजर आॅफ गॉड’ म्हणजे खरा तर देवदूत. त्यानं कसं, समाजात दुही असेल, दुभंग असेल तर तो सांधण्याचा प्रयत्न करायचा. पण इथं. वेगळाच अनुभव. खरं तर तो वेगळा तरी का म्हणायचा? प्रामुख्याने हरयाणा आणि पंजाब परिसरात ज्याचे अनंत अनुयायी आहेत, त्या डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांची स्वत:चीच भूमिका असलेल्या आणि त्यांचाच जीवनपट चितारणाऱ्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या सिनेमाने बरेच काही दुभंगून टाकले असले तरी या आधीही या पंथाने समाजात दुभंग निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचा अकाली दलाचा आरोप आहे. साहजिकच अकाली आणि डेरा सच्चा यांच्यामधून विस्तवदेखील जात नाही. एकीकडे त्या दोहोतील ही दुही आणि दुसरीकडे विद्यमान सत्ताधारी रालोआला अकालींच्या तुलनेत सच्चा डेराविषयी वाटू लागलेले अधिकचे ममत्व, अशा साऱ्या गलबल्यात आणखी काही दुह्या जन्माला आल्या. त्याची सुरुवात चित्रपट परीक्षण मंडळाने गुरुमीत राम रहीम यांच्या सिनेमाला प्रमाणपत्र नाकारल्यानंतर झाली. मंडळाच्या निर्णयाविरुद्ध सिनेमावाले लवादाकडे गेले. लवादाने सिनेमाच्या बाजूने निवाडा दिला आणि परीक्षण मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी सर्वात आधी आणि त्याच्या पाठोपाठ उरलेल्या अकरा सदस्यांनीही मंडळाचे राजीनामे दिले. सॅमसन यांनी थेट सरकारवरच आरोप करताना, सरकारवर हस्तक्षेप करण्याचा ठपका ठेवला. तिसरीकडे काहींनी न्यायालयात धाव घेऊन सदर चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण करू शकतो, असा आक्षेप घेऊन त्याच्या प्रदर्शनावर बंदी लागू करावी, अशी याचना केली. पंजाब सरकारने बंदी अगोदरच लावली होती. पण ती लावताना, केन्द्र सरकारच्या शिफारसीवरून आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणूनच बंदी लागू केली असल्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी जाहीर केले. म्हणजे केन्द्र सरकार या सिनेमाचे पक्षपाती आहे की विरोधी आहे, असा एक वेगळाच दुभंग निर्माण झाला. अर्थात एखाद्या सिनेमाच्या जाहीर प्रदर्शनास चित्रपट परीक्षण मंडळाने संपूर्ण आक्षेप घेणे, काही शर्तींवर प्रदर्शनास अनुमती देणे वा लवादाने जसा आहे तसा सिनेमा मंजूर करणे, हे मेसेंजर आॅफ गॉडच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले आहे, असे नव्हे. अधूनमधून असे प्रकार होत असतात आणि मुळात चित्रपट असो की नाटक, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी परीक्षण मंडळाची गरजच काय, असा सनातन प्रश्नदेखील चर्चेस येत असतो. पण ही मंडळे राहत आली आहेत व राहणार आहेत आणि त्यामुळेच लीला सॅमसन व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामे दिल्याच्या परिणामी सरकारने नवे चित्रपट परीक्षण मंडळ गठित करुनही टाकले आहे. खरे तर सरकारला हे आधीही करता आले असते. कारण सॅमसन यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची मुदत अगोदरच संपुष्टात आली होती आणि त्या काळजीवाहू अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. नव्या सरकारचे आणि आपले जमणार नाही, याची तेव्हांही त्यांना कल्पना असणारच. तेव्हां हे काळजीवाहूपण त्यांना नाकारता आले असते. पण तसे झाले नाही. आता त्यांच्या जागी पहलाज निहलानी नावाचे हिन्दी चित्रपट निर्माते नव्या मंडळाचे अध्यक्ष राहणार आहेत. गोविंदा आणि चंकी पांडे या नटांना पहिल्यांदा चित्रपटात झळकविणारे म्हणून निहलानी ओळखले जातात. तेव्हां त्यांची किमान चित्रपट निर्मिती क्षेत्रातील जातकुळी लक्षात यायला हरकत नाही. ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ आदि चित्रपटांची नावे पाहिल्यानंतर या जातकुळीचा आणखी उलगडा होऊ शकतो. पण म्हणून ते अध्यक्ष झाले असे नव्हे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांनी ‘हर घर मोदी’ ही सहा मिनिटांची फिल्म तयार केली होती व या फिल्मनेच त्यांना फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी लायक बनविले, हे उघड आहे. त्यांच्या जोडीने मंडळात सदस्य म्हणून जे आणखी नऊ लोक नेमले गेले आहेत, त्यांच्यात संघ परिवाराचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विवेक’चे संपादक रमेश पतंगे यांचे नाव असून एक मराठी नाव मंडळात आले म्हणून काहींना हर्ष होऊ शकतो. वाणी त्रिपाठी, अशोक पंडित, दूरचित्रवाणीवरील चाणक्य मालिकेचे डॉ.चन्द्रप्रकाश द्विवेदी अशी काही नावे या नवांमध्ये असून त्या प्रत्येकाचा एक तर संघ परिवाराशी वा भाजपाशी संबंध आहे. या संबंधांवरुन आता नव्या चित्रपट परीक्षण मंडळाच्या रचनेवर टीकादेखील होऊ लागली आहे. वस्तुनिष्ठ विचार केला तर, ही टीका अयोग्य वा निराधार ठरविता येणार नाही. पण अशा नेमणुकांच्या बाबतीतला आजवरचा इतिहास बघू जाता, ज्याचे हाती ससा तो पारधी हाच न्याय आजवरच्या सर्व सरकारांनी लावला असल्याचे आढळून येईल. लीला सॅमसन यांच्या बाबतीतही तोच न्याय लावला गेला होता. सरकारी कृपाप्रसाद म्हणजे केवळ मंत्रिपद नसते. विविध मंडळे आणि महामंडळे यांची संचालकपदे हीदेखील कृपाप्रसाद याच श्रेणीत मोडतात. हा प्रसाद मिळावा म्हणूनच मग जो पक्ष सत्तेत येतो, त्याच्याविषयी अचानक अनेकांच्या मनात आपुलकी निर्माण होत असते. जशी ती आता जयाप्रदा या नटीच्या मनातदेखील निर्माण झाली आहे. त्यामुळे मेसेंजर आॅफ गॉडविषयी भले कितीही वादळे निर्माण होऊ देत. पहलाज निहलानी यांच्या दृष्टीने मात्र तो खरोखरीचा देवदूत ठरला आहे.

Web Title: The rabbit in his hands, the poodler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.