‘आयपीएल’ आयोजनात बीसीसीआयसमोर अडथळ्यांची शर्यत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:18 PM2020-08-08T20:18:26+5:302020-08-08T20:18:48+5:30

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या ‘बीसीसीआय’ला सर्वांत जास्त महसूल या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतो.

Race for hurdles in front of BCCI in IPL! | ‘आयपीएल’ आयोजनात बीसीसीआयसमोर अडथळ्यांची शर्यत!

‘आयपीएल’ आयोजनात बीसीसीआयसमोर अडथळ्यांची शर्यत!

Next

- संतोष मोरबाळे (वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, कोल्हापूर)

क्रिकेट हा भारतीयांचा प्राण आहे. क्रिकेटला इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)ने नव्या रूपात सादर केले. या लीगला असंख्य क्रिकेटप्रेमींनी डोक्यावर घेतले. प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या स्पर्धेचे यंदाचे १३ वे सत्र आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाजगतच स्तब्ध झाले असताना आयपीएलचे आयोजन होणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अनेक स्पर्धा रद्द करण्याच्या घोषणा झाल्या. मात्र, आयपीएलच्या आयोजकांनी प्रयत्न सोडले नव्हते. कोरोना हा तर मुख्य अडथळा होताच, त्याचबरोबर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हा खरा अडथळा होता. दि. १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात प्रस्तावित असणारी विश्वचषक स्पर्धा आयोजन करण्यात आॅस्ट्रेलियाने असमर्थता दर्शवली आणि आयपीएलची स्वप्ने पाहणाऱ्या एका गटाला आनंद झाला.

भारतात ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी फार अगोदरपासूनच अनेक पर्यायांची चाचपणी सुरू केली होती. श्रीलंकेनेही ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारताकडे प्रस्ताव दिला होता. संयुक्त अरब अमिरात (युएई) हे भारतीय क्रिकेटप्रेमींना आपुलकीचे असणारे ठिकाण आयपीएलच्या आयोजकांनी पक्के केले. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेची तारीख निश्चित करत आयोजकांनी एक अडथळा दूर केला असला तरी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. या स्पर्धेला जाताना कोरोना व त्यासंदर्भातील अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनानंतरचे जग वेगळेच झाले आहे. क्रीडापटूंना याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण खेळाचा संबंध थेट शरीराच्या संपर्काशी येतो. युएईला जाणाºया खेळाडू, सहयोगी कर्मचाºयांना अलगीकरणात राहावे लागणार आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजच्या यशस्वी दौºयामुळे क्रिकेटशी संबंधित सर्वांनाच आत्मविश्वास आला आहे. त्यामुळे या समस्येवरही आयोजकांना उपाय सापडला आहे.

आयपीएलच्या आयोजनाबाबत या स्पर्धेशी संबंधित सर्वच घटक सुरुवातीपासूनच सकारात्मक होते. कसल्याही स्थितीत ही स्पर्धा घ्यायची, असे त्यांचे मत होते. या सर्वाला अर्थकारणाचीही किनार आहे. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या ‘बीसीसीआय’ला सर्वांत जास्त महसूल या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतो. या स्पर्धेतून मिळालेल्या पैशांच्या जोरावरच बीसीसीआय भारतीय क्रिकेटच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करू शकते. आयपीएल रद्द होणे ही बीसीसीआयसाठी खूप मोठ्या तोट्याची गोष्ट ठरली असती. या स्पर्धेच्या प्रसारणाच्या हक्कांच्या मोबदल्यात ‘स्टार स्पोर्ट्स’ ही क्रीडावाहिनी बीसीसीआयला दरवर्षी ३३०० कोटी रुपये देणार आहे. यंदा ही स्पर्धा झाली नसती तर इतक्या मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले असते. त्यातून मिळणाºया पैशांतूनच बीसीसीआय खेळाडूंचे वेतन, स्थानिक खर्च, विविध स्पर्धा आयोजनांचा खर्च करते. बीसीसीआय दरवर्षी सुमारे दोन हजार स्थानिक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करते. त्यामुळेच भारतीय क्रिकेटचा पाया भक्कम झाला आहे. कोणत्याही देशापेक्षा भारतीय क्रिकेटमधील पायाभूत संरचना व सुविधा चांगल्या आहेत.

आयपीएलचे आयोजन दुबईत होणार हे निश्चित होताच बीसीसीआयसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. चीनच्या सैनिकांनी जून महिन्यात गलवान खोºयात २० भारतीय सैनिकांना अमानुषपणे ठार मारले. त्यामुळे भारतीयांच्या मनात चीनबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे. भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे आयपीएलचा मुख्य प्रायोजक असणाºया ‘व्हिवो’ या चिनी कंपनीबद्दलही आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. ‘आमचा विरोध आयपीएलला नाही, मात्र चिनी प्रायोजकाला आहे,’ असे सांगत स्वदेशी जागरण मंचने विरोध करण्यास सुरुवात केली. बीसीसीआयने प्रायोजक न बदलण्याची भूमिका घेतली असली तरी आता ‘व्हिवो’नेच यातून माघार घेण्याची घोषणा केली आहे.

‘व्हिवो’ २०१७ पासून आयपीएलचे प्रायोजक आहे. त्यांनी बीसीसीआयबरोबर पाच वर्षांसाठी २,१९९ कोटींचा करार केलेला आहे. त्यामुळे बीसीसीआयला दरवर्षी ‘व्हिवो’कडून सुमारे ४४० कोटी रुपये मिळतात. ‘व्हिवो’ने माघार घेतली तर इतक्या कमी वेळात इतकी मोठी रक्कम देणारा प्रायोजक कुठून शोधायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘व्हिवो’च्या माघारीचा फटका आयपीएलमधील फ्रॅँचायजींनाही बसणार आहे. बीसीसीआय आणि फ्रॅँचाईजी यांच्यामध्ये ५०:५० असा करार असल्यामुळे बीसीसीआयला २२० कोटी, तर उर्वरित २२० कोटी फ्रॅँचाईजीला मिळतात. त्यामुळे आयपीएलमधील प्रत्येक फ्रॅँचाईजीला सुमारे २८ कोटी रुपये मिळत होते. प्रेक्षकांविना होणाºया आयपीएलमुळे तिकिटांपासून मिळणारे उत्पन्न अगोदरच बंद झाल्याने फ्रॅँचाईजींना हा मोठा तोटा असणार आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी फक्त ४० ते ४५ दिवस शिल्लक असताना निर्माण झालेला हा पेच बीसीसीआय कसा सोडवते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. या सर्वच अडथळ्यांवर मात करत बीसीसीआय इंडियन प्रीमिअर लिग कशी यशस्वी करते, हे पाहणे क्रिकेट सामन्यांइतकेच रंजक असेल.

Web Title: Race for hurdles in front of BCCI in IPL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPLआयपीएल