रफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...
By गजानन जानभोर | Published: January 2, 2018 12:10 AM2018-01-02T00:10:28+5:302018-01-02T00:10:33+5:30
मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.
तो मोहम्मद रफींचा मुलगा. मोठ्या माणसांच्या मुलांच्या वाट्याला येणारे वलय आपसूक त्याच्याही भोवती. वडील सर्वोत्तम गायक़ चाहत्यांसाठी साक्षात परमेश्वरच. त्यामुळे त्यांच्याही मुलाने गायकच व्हावे, ही सा-यांचीच अपेक्षा. पण, त्याने या वाटेने येऊ नये असे रफींना वाटायचे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान, शाहीद. तो १९ वर्र्षांचा असताना मोहम्मद रफी गेले. अब्बांच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कुमारच्या कुशीत तो दिवसभर रडत होता. नंतर सावरला, पण वडिलांसारखेच गाण्याचे दडपण न पेलवणारे... त्याने हे ओझे काही दिवस वाहून बघितले, संगीतकार-निर्मात्यांकडे गेला. पण, निराश झाला. शेवटी त्याने गाणे थांबवले. स्वत:च्या आनंदासाठी आणि अब्बांच्या नामस्मरणासाठी मात्र तो नियमित गायचा, अजूनही गातो...
शाहीद परवा नागपुरात भेटला आणि मनातले सारे सच्चेपण त्याने प्रकट केले. मायावी दुनियेतील गळेकापू स्पर्धेत आपली मुले टिकू शकणार नाहीत, ही भीती मोहम्मद रफींना वाटायची. गुणवत्ता असूनही आपल्याला सोसावे लागले ते मुलांच्या नशिबी येऊ नये ही त्यांची कळकळ. रेकॉर्डिंगच्या वेळीही मुलांना ते थांबू देत नव्हते. मुले थोडी मोठी झाली आणि रफींनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले. शाहीदची इच्छा नव्हती. शाळेतील मुले म्हणायची ‘तुझे अब्बा खूप छान गातात, तू का गात नाहीस?’ मग त्यालाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखेच गावे. काहीशा अनिच्छेनेच तो लंडनला गेला...
रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. एरवी असे होत नाही. प्रतिभावंतांची मुले दडपणात वाढतात. आई-वडील, घरातील वातावरण त्यांना स्वतंत्रपणे उमलू देत नाही. मुलांची वाढ आपणच अशी खुंटवून टाकतो. ‘तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल? काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का? ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’? असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का? असे असंख्य प्रश्न शाहीदशी बोलताना मनात उभे राहतात. रफींनी या आई-बाबांसारखी चूक केली नाही. शाहीदला त्याच्यासारखेच होऊ दिले, स्वत:सारखे नाही. तो यशस्वी उद्योजक होऊ शकला, तो त्यामुळेच. गाणे ही शाहीदची आवड होती. ती आजही आहे. पण, तिला उदरनिर्वाहाचे साधन होऊ दिले नाही.
गाण्याबद्दल अब्बांमध्ये असलेले समर्पण आपल्यात नाही, ही जाणीव शाहीदला हरक्षणी व्हायची. ‘‘अब्बांनी मला माझे मीपण दिले’’ असे सांगताना शाहीद गहिवरतो. आपल्या मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात मात्र ते कुठेच येत नाही. आपल्या वात्सल्याचाही तो भाग होत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.