राहुल गांधींना नेतृत्व घडवावे लागेल
By Admin | Published: January 13, 2015 02:01 AM2015-01-13T02:01:07+5:302015-01-13T02:40:15+5:30
काँग्रेस हा १३० वर्षांचा सर्वात जुना राजकीय पक्ष निवडणुकांमधील पराभव, पक्षांतर, धोरणात्मक संदिग्धता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेतृत्वाच्या संकटाने हा पक्ष न भूतो असा छिन्नविछिन्न झाला आहे
हरीश गुप्ता,लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर -
काँग्रेस हा १३० वर्षांचा सर्वात जुना राजकीय पक्ष निवडणुकांमधील पराभव, पक्षांतर, धोरणात्मक संदिग्धता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेतृत्वाच्या संकटाने हा पक्ष न भूतो असा छिन्नविछिन्न झाला आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेतृत्वाची धुरा उत्तमपणे सांभाळली असेच म्हणावे लागेल. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्ष झाली व तब्बल १० वर्षे सत्तेत राहिली. परंतु आता प्रकृतीसोबत मतदारही साथ देत नसल्याने सोनिया गांधींचा कालखंड आता पुढे सुरू राहील, असे दिसत नाही. काँग्रेस हा उघडपणे घराणेशाहीने चालणारा पक्ष असल्याने पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची मंगळवारी बैठक होईल, तेव्हा पक्षाची धुरा राहुल गांधींच्या रूपाने नेहरू-गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीकडे सोपविण्याची पक्षातील आतुरता उघड होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या डोक्यावर अध्यक्षपदाचा मुकुट चढविण्याचे ठरविल्यावर अ. भा. काँग्रेस समितीच्या येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता असेल.
काँग्रेस हा काही झाले तरी राहुल गांधींचा कौटुंबिक पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची खरी चिंता राहुल गांधी नेतृत्व करण्यासाठी उपलब्ध होतील की नाही याची नसून, ते नेते म्हणून यशस्वी ठरतील की नाही याची आहे. सप्टेंबर २००७ मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी पक्षातील पद प्रथम स्वीकारल्यापासून त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही. २००९च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशातून पक्षाला अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने जागा निवडून दिल्या. पण पाच वर्षांनी नरेंद्र मोदींच्या रूपाने आव्हान समोर उभे ठाकल्यावर ते अगदीच निष्प्रभ दिसून आले. निवडणूक प्रचारसभांमधील त्यांच्या भाषणांमध्ये जोश आणि जान नव्हती व वयाच्या चाळिशीत असूनही टीव्ही कॅमेऱ्यापुढे त्यांची देहबोली काही फारशी आश्वासक दिसली नाही. पण सोनिया गांधी यांची पक्षाध्यक्ष या नात्याने भूमिका मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकांच्या आधीच नाममात्र झाली होती. त्यामुळे त्यांच्या खालोखालच्या-उपाध्यक्ष पदावरील सर्वात सक्रिय नेते म्हणून याची जबाबदारी राहुल गांधींवर येतेच.
राहुल गांधींच्या बाबतीत काँग्रेसची आणखी एक अडचण अशी आहे, की कोणालाही त्यांच्या मनाचा निश्चित ठाव लागू शकत नाही. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते, की अनेक मुद्द्यांवर राहुल गांधींची स्वत:ची अशी ठाम मते आहेत. पण अनेक वेळा ते त्यावर ठाम न राहिल्याचेही दिसते. विकीलिक्सने प्रसिद्ध केलेल्या टिप्पणांनुसार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या भारतातील राजदूतास असे सांगितले होते, की भारतात इस्लामी दहशतवादी गटांएवढ्याच धोेकादायक अशा हिंदू अतिरेकी संघटना आहेत व द्वेषाच्या बाबतीत रा.स्व. संघ आणि ‘सिमी’ यांच्यात फारसा फरक नाही.
विकीलिक्सचे हे दस्तावेज प्रसिद्ध झाले, तेव्हा गांधी कुटुंबीयांकडून त्याचा ठामपणे इन्कार न केला जाण्याने पक्षनेत्यांची पंचाईत झाली होती. खरोखरच राहुल गांधी यांचे तसे मत असेल तर त्यांनी त्याची जाहीर वाच्यता न करणेच श्रेयस्कर होते. कारण कोणत्याही हिंदू संघटनेला ‘दहशतवादी’ लेबल लावण्याची जनमानसात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटणार हे स्वाभाविक होते. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले आणि तेवढ्यावरून काँग्रेसला एक विधानसभा निवडणूक गमवावी लागली होती. सोनिया गांधी यांच्या त्या विधानाचा परिमाम म्हणूने गुजरातमध्ये हिंदू मतदार मोदी आणि भाजपाच्या मागे एकसंघपणे उभे राहिले होते. त्यामुळे राहुल गांधींनी खरेच तसे वक्तव्य केले असेल, तर त्याचे काय परिणाम होतात हे त्यांना आपल्या आईकडून नक्कीच कळले असते.
ग्रेटर नॉइडामधील ज्या भट्टा-परसोलमधील गुज्जर जमीनमालक आपल्या जमिनी चांगली किंमत मिळते म्हणून विकायला स्वत:हून तयार होते, तेथे जाऊन भूसंपादनाच्या विरोधात आंदोलन करण्याची राहुल गांधींची कल्पनाही अशीच नवखेपणाची होती. याचा परिणाम म्हणून गुज्जर समाजाने एक असाधारण गोष्ट केली आणि नंतर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पडावेत, यासाठी बसपाच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळे काँग्रेस पक्षास पुन्हा सतास्थानी आणायचे असेल तर राहुल गांधींनी खरा भारत अजून किती जाणून घेण्याची गरज आहे, हेच यावरून स्पष्ट होते. व्यावसायिक सल्ला झुगारून एका ठरावीक इंग्रजी वृत्तवाहिनीला राहुल गांधींनी पहिली टीव्ही मुलाखत देणे, हेही असेच नुकसानीचे ठरले.
दुसऱ्याच कोणाच्या तरी पत्रकार परिषदेत मध्येच येऊन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करण्यावरूनही राहुल गांधींमध्ये किमान सौजन्यमूल्यांचा अभाव असल्याचेच दिसून आले. सप्टेंबर २०१३ मध्ये हा प्रसंग घडला तेव्हा भडकती महागाई आणि भ्रष्टाचारावरून देशात एवढी संतापाची लाट होती, की राहुल गांधींच्या त्या विधानाने लोकांच्या मनात डॉ. सिंग यांच्याविषयी कणव निर्माण झाली. एक वर्ष आणि एक निवडणूक उलटल्यानंतर आता राहुल गांधींचे ते वक्तव्य हे मनापासून असण्यापेक्षा दिखाव्यासाठीच अधिक होते, असे वाटते.
काँग्रेस पक्षाची सूत्रे पूर्णपणे हाती आली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने काही मोठी आत्मघाती चूक करण्याची घाई केली नाही तर राहुल गांधींना आपले नेतृत्व कौशल्य अधिक तावूनसुलाखून घेण्यास पुरेसा अवधी मिळेल. एवढे बरे की आजी आणि वडिलांच्या निर्घृृण हत्यांचे आघात लहानपणीच सोसावे लागल्याने बहीण प्रियंकाप्रमाणेच राहुल गांधीही ‘विपस्यना’ या बौद्ध ध्यानधारणा तंत्राचे सक्रिय अनुयायी झालेले आहेत. राजकीयदृष्ट्या अयोग्य वक्तव्य करण्याची आणि राजकीय डावपेच घाईगर्दीने आखण्याची राहुल गांधींची शैली पाहता, येत्या २०१९ च्या नाही तरी त्यानंतरच्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकांपर्यंत तरी नेतृत्वगुण अधिक प्रगल्भ करण्यास राहुल गांधींना ‘विपस्यने’ची मदत होऊ शकेल. त्यांनी अलीकडेच गाजावाजा न करता म्यानमारला दिलेली भेट हाही त्याच प्रयत्नांचा एक भाग होता. वय त्यांच्या बाजूचे आहे.
२०१४ च्या निवडणुकीत झालेली वाताहत आणि राजकीय पटलावर उजवीकडे भाजपापासून ते डावीकडे ‘आप’पर्यंत पर्यायी शक्तींचा उदय पाहता, काँग्रेसला या दीर्घकालीन प्रक्रियेतून जावेच लागेल. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशातील राजकारण अधिक स्पर्धात्मक होईल, हेही लक्षात घ्यावे लागेल.