परदेशातून नव्या आत्मविश्वासाने परतलेले राहुल गांधी
By Admin | Published: January 14, 2017 01:06 AM2017-01-14T01:06:10+5:302017-01-14T01:06:10+5:30
तुघलक लेनमधला ११ नंबरचा बंगला.... राहुल गांधींचे दिल्लीतले अधिकृत निवासस्थान.... मंगळवारी इथला माहोल काही वेगळाच होता.
तुघलक लेनमधला ११ नंबरचा बंगला.... राहुल गांधींचे दिल्लीतले अधिकृत निवासस्थान.... मंगळवारी इथला माहोल काही वेगळाच होता. वातावरणात थंडीचा प्रभाव असूनही सकाळी नऊ वाजेपासूनच इथे गर्दी जमू लागली. अकराच्या सुमाराला सोनिया गांधींच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. त्यांची काळी सफारी थेट आत गेली. काही काळानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग व पाठोपाठ प्रियांका वाड्रांच्या गाड्यांचे ताफे येऊन धडकले. मग अहमद पटेल आले. त्या सर्वांना पाहिल्यावर गर्दीची खात्री पटली की राहुल बंगल्यातच आहेत.
दरम्यान बंगल्यात दुसरी बैठक सुरु झालेली असते. राहुल, सोनिया, प्रियांका खेरीज अहमद पटेल, आॅस्कर फर्नांडिस, रणदीप सिंग सुरजेवाला इत्यादी नेते सहभागी झालेले असतात. बहुदा नोटबंदीच्या विषयावर नियुक्त समितीची ही बैठक असावीे. बैठक संपताच एसपीजी ची लगबग सुरु झाली. काही क्षणातच एक गाडी गेट मधून बाहेर निघाली. ड्रायव्हींग सीट वर स्वत: राहुल आणि शेजारच्या सीटवर सोनिया गांधी बसल्या होत्या. काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीचे जणू हे प्रतीकच होते. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी असल्या तरी प्रत्यक्ष कामकाज राहुलच चालवीत आहेत. गाडीच्या काचा खाली करून तमाम पत्रकारांना त्यांनी आदराने नमस्कार केला. कॅमऱ्याचे फ्लॅश लकाकले. मीडियाला एक छान छायाचित्र मिळाले. परदेशात आठवडाभराची सुटी संपवून राहुल गांधी परतले. सुटीच्या काळात ते नेमके कोणाबरोबर होते. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना गुरुमंत्र कोणी दिला, या गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास जाणवतो आहे. मध्यंतरी सोनियांच्या अनुपस्थितीत काँग्रेस संसदीय पक्षाची तसेच कार्यकारिणीची बैठक राहुलच्या अध्यक्षतेखाली झाली. बहुतांश सदस्यांनी राहुलनी अध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह केला. राहुलनी पुढाकार घेऊन स्वबळावर पक्षाचे नेतृत्व करावे ही तर स्वत: सोनिया गांधींचीच इच्छा आहे.
बुधवारी काँग्रेसच्या ‘जन वेदना’ संमेलनात त्याची प्रचिती आली. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधे दिवसभराच्या संमेलनात, उद्घाटन आणि समारोप प्रसंगी राहुल गांधींनी दोन भाषणे केली. सकाळी उद्घाटनाचे भाषण ऐकताना अनेकदा जाणवले की सुटीच्या काळात देशाच्या एकूण अवस्थेला अधोरेखित करणाऱ्या अनेक मुद्यांची त्यांनी पुरेपूर तयारी केली असावी. तर्कशुद्ध युक्तिवाद, आश्वासक शब्दफेक, कधी मिस्कील शैलीत तर कधी गांभीर्याने त्यांनी जे मुद्दे मांडले, त्यात देशातल्या अनेक महत्वाच्या गोष्टींची दखल त्यांनी सहज सोप्या शब्दात घेतली. भाषण इंग्रजीत असो की हिंदीत नेटक्या शब्दात आपली भूमिका विशद करण्याचे कौशल्य एव्हाना राहुलना जमलेले दिसते. त्यांच्या दोन्ही भाषणात हे जाणवले. इंग्रजी पेक्षाही हिंदीतले त्यांचे भाषण अधिक प्रभावी होते.
केंद्र सरकारचे अग्रक्र म दररोज बदलतात. मोदी सरकारच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीची त्यामुळेच अद्याप नीटपणे समीक्षा झालेली नाही. राहुल गांधींनी तो प्रयत्न यशस्वीरीत्या केला. आपल्या भाषणात सरकारी गलथानपणाच्या अनेक मुद्यांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदींच्या कामकाजावर व अपयशांवर त्यांनी चौफेर हल्ला चढवला. त्यात मुख्यत्वे स्वच्छता अभियान, मेक इन इंडिया, स्टार्टअप्स, स्कील इंडिया, डिजिटल इंडिया अशा तमाम उपक्र मांची हजेरी घेताना मिस्कील शब्दात मोदींच्या ‘मन की बात’ पासून पद्मासनापर्यंत तमाम गोष्टींची राहुलनी जोरदार खिल्ली उडवली. नोटबंदीच्या निर्णयानंतर नेमके किती काळे पैसे सरकारच्या हाती लागले, या प्रश्नाचा पुनरुच्चार करताना, राहुलनी थेट आरोप केला की देशातल्या ज्या पन्नास उद्योगपती घराण्यांकडे बँकांचे ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज अडकून पडले आहे, केवळ त्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच नोटबंदीचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे. बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य लोक काही भ्रष्ट नव्हते. मेहनतीतून कमवलेल्या त्यांच्या कष्टाच्या पैशांवर मोदी सरकारने तथाकथित सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोपही राहुलनी केला.
पंतप्रधान मोदींचे सारे तत्त्वज्ञान लोकाना भीती दाखवून राज्य करण्याचे आहे. भूसंपादन कायद्याचा धाक दाखवून दीड वर्षापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना घाबरवून सोडले. काँग्रेसने या निर्णयाला आव्हान दिले तर सरकारला लगेच माघार घ्यावी लागली. मोदी राजवटीत रिझर्व्ह बँकेसारखी महत्वाची संस्थाही आज हास्यास्पद बनली आहे, याचा उल्लेख करताना राहुल म्हणाले, भाजपा, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काँग्रेसचे वैर नाही. मात्र एक गोष्ट निश्चित की त्यांच्या विचारसरणीचा पराभव करून भाजपा आणि मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, संमेलनात ही ग्वाही देताना राहुल गांधींचा आत्मविश्वास दुणावलेला दिसला. अडीच वर्षांच्या कालखंडानंतर पंतप्रधान मोदींची भाषणे एकसुरी बनत चालली आहेत, तर काल परवापर्यंत ज्यांची यथेच्छ टिंगल उडवली जात होती त्या राहुल गांधींच्या भाषणांचा सारा बाजच बदलला आहे. परदेशातून नव्या आत्मविश्वासाने परतलेले राहुल बरेच आश्वासक वाटत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातला हा बदल स्वागतार्ह आहे.