मोदींसमोरील राहुल गांधींचे आव्हान निर्णायकतेकडे?
By admin | Published: July 26, 2016 02:19 AM2016-07-26T02:19:05+5:302016-07-26T02:19:05+5:30
‘काही जण जन्मत:च थोर असतात, काहींना त्यांच्या कर्तृत्वाने थोरपण लाभते तर काहींवर ते लादले जाते’ असे विल्यम शेक्सपियर यांनीच ‘ट्वेल्थ नाईट’ या पुस्तकात म्हणून ठेवले आहे.
- हरिष गुप्ता
‘काही जण जन्मत:च थोर असतात, काहींना त्यांच्या कर्तृत्वाने थोरपण लाभते तर काहींवर ते लादले जाते’ असे विल्यम शेक्सपियर यांनीच ‘ट्वेल्थ नाईट’ या पुस्तकात म्हणून ठेवले आहे. काँग्रेसे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जन्मत:च थोरपण लाभले आहे. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपासमोरील राहुल हे एक मोठे आव्हान आहे. त्यांच्यामुळे मोदी व भाजपा सतत उद्विग्नावस्थेत असतात.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत तयार झालेल्या आघाडीमुळे काँग्रेसला विरोधकांच्या यशात चांगला वाटा मिळाला होता. पण आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळात मात्र काँग्रेसला जबर हानीला सामोरे जावे लागले. आसामची सत्ता काबीज करायची हे काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपात गेलेल्या ४७ वर्षीय हिमंता बिस्वास सर्मा यांचे ध्येय होते.
पण आता दोन महिन्यानंतर परिस्थिती एकदम पालटलेली दिसते. केंद्रातील सत्ता हाती आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचे सारे प्रयत्न एकदिलाने बेरजेचे राजकारण करण्याकडे होते. हे प्रयत्न वरकरणी प्रामाणिक वाटत असले तरी आसामात त्या पक्षाला जसा विजय मिळाला तसा विजय पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मिळू शकेल याविषयी आता शंका निर्माण होत आहे. नवज्योत सिंग सिद्धूने भाजपा सोडल्यानंतर आता पंजाबात महाराष्ट्रासारखा विजय मिळण्याची भाजपाची संधीदेखील सुटली आहे. गुजरातेत त्या पक्षाची हवी तशी तयारी नाही आणि तिथे राहुल गांधींनी जनतेची सहानुभूती प्राप्त करीत पुनरागमन केले आहे.
मोदी-शाह सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत कारण त्यांना निवडणुकांच्या तोंडावर पक्षात माजलेल्या बेदिलीचाही सामना करावा लागत आहे. कथित ‘भगव्या सेने’ला आता सरकारच्या धोक्याच्या इशाऱ्यांचेही भान राहिलेले दिसत नाही. या सेनेपायी समाजात निर्माण होत असलेला दुभंग प्रकर्षाने समोर आला तो ११ जुलै रोजी. या दिवशी गुजरातेतील उना येथे चार चर्मउद्योगातील दलित युवकांना स्वयंघोषित सवर्ण गो-रक्षकांकडून अमानुष मारहाण केली गेली. याच गोरक्षकांनी मारहाणीचे छायाचित्रण करून आपल्या या दु:साहसाचे प्रदर्शन करण्यासाठी ते इंटरनेटवरुन प्रसारितही केले. तसे करण्यामागे भाजपाने काही राज्यात लागू केलेली गोहत्त्या बंदीच कारक असणार. मारहाणीच्या या प्रकाराने देशात खळबळ माजविली. मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आणि त्याच दरम्यान झालेल्या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचा जीव गमवावा लागला तर १२ दलितांनी आत्महत्त्ये प्रयत्न केला. या घटनेने संसदेत विरोधकांना तर बळ मिळालेच पण तर राहुल गांधींनाही पीडितांची बाजू घेण्याची संधी मिळाली. उनाला भेट देणाऱ्यांमध्ये एकटे राहुल नव्हते, तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि ‘आप’चे अरविंद केजरीवालसुद्धा होते. पण राहुल यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. २०११ साली त्यांनी दलित वस्तीत काही रात्री घालवल्यापासून दलित-हितचिंतक अशी त्यांची प्रतिमा बनत आली आहे.
अर्थात उत्तर प्रदेशात दलितांच्या मतांवर एकटी काँग्रेस हक्क सांगू शकत नाही. या स्पर्धेत बहुजन समाज पक्ष बराच पुढे आहे. उनाचे प्रकरण धगधगत असतानाच उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी एका जाहीर सभेत मायावतींवर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. परिणामी संसदेतील समस्त विरोधी पक्ष मायावतींच्या पाठीशी उभा राहिला. त्यामधूनच भविष्यातील काही संभाव्य युतींची शक्यतासुद्धा निर्माण झाली. दयाशंकर सिंह यांच्या पत्नीने हे प्रकरण बसपाच्या नेत्यांवर उलटवले असले आणि बसपच्या नेत्यांनी दयाशंकर यांच्या टीकेला उत्तर म्हणून दयाशंकर यांची पत्नी आणि १२ वर्षीय कन्या यांची निर्भर्त्सना केली असली तरी तो भाग पूर्णपणे वेगळा आहे.
नंतर मुद्दा येतो, मुस्लीम मतांचा. या समूहासोबत काँग्रेसचे पारंपरिक संबंध असले तरी याच वर्षाच्या प्रारंभी केरळातील मुस्लीमांनी काँग्रेस-मुस्लिम लीग युतीवर बहिष्कार टाकत आपली मते माकपाच्या पारड्यात टाकली होती तर आसामात ‘आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ला पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशात मुस्लीम मते १७ टक्के आहेत व तीे महत्वाची आहेत.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मते मुलायम सिंह यांच्या समाजवादी पार्टीकडे जात होती. पण आता चित्र बदलत चालले आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे प्रशासन कौशल्य यथातथा आहे आणि त्यांचा ना हिंदू, ना मुस्लीम, कोणत्याही समाजातील नवमतदारांशी फारसा संपर्क नाही. उलट समाजवादी पार्टीचे भाजपाशी छुपे सामंजस्य असल्याचा समज मुस्लीम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे आणि ही बाब भारतीय मुस्लीमांना न रुचणारी आहे.
काश्मीरात सध्या बुऱ्हान वानीच्या चकमकीत झालेल्या हत्त्येनंतर त्या राज्यातील स्थानिक निदर्शक आणि सुरक्षा सैनिक यांच्यात जो संघर्ष सुरु आहे त्यात सैन्याने पॅलेट गनचा वापर केल्याने अनेकाना अंधत्व आले आहे. दरम्यान मोदींनी वाद शमवण्यासाठी जमतील तेवढे प्रयत्न केले असले आणि त्यांच्याच आदेशाने सैन्याने शांततेचे पाऊल उचलले असले तरी काश्मीरींच्या मनातील राग शांत होणार नाही. गेल्या आठवड्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरचा दौरा केला पण त्यांची भेट घेण्यास स्थानिक व्यावसायिकांनी चक्क नकार दिला होता. काश्मीरातील मुसलमानांचा राग उत्तर प्रदेशातील मुस्लीम मतांपर्यंत पोहोचला तर ते मायावतींकडे वळू शकतील आणि कदाचित त्यापायी तेथील अवघड बनू पाहाणारे राजकीय गणित सुटूनही जाऊ शकेल. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसचा सहभाग असलेले सरकार सत्तेत असणे ही बाब राहुल गांधीं यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण राहील.
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )