सावळ्यागोंधळावर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:38 AM2018-07-20T03:38:28+5:302018-07-20T03:41:15+5:30
अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे.
अंधेरीतील पादचारी पूल कोसळण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा ठपका रेल्वेच्या सुरक्षा समितीने ठेवल्याने या प्रकरणातील जबाबदारीची टोलवाटोलवी आता संपेल, अशी आशा आहे. आम्ही दुरुस्ती-देखभालीचे पैसे देत होतो, असे सांगत रेल्वेवर जबाबदारी टाकून मुंबई महापालिकेचे अधिकारी मोकळे झाले असले; तरी त्यांनीही पादचारी पुलावर क्षमतेपेक्षा ४४ टक्के म्हणजेच १२४ टनांचा अतिरिक्त भार टाकल्याने त्यांनाही या प्रकरणात दोषी धरण्यात आले आहे. अर्थात हा झाला चौकशीचा प्राथमिक भाग. त्याचा अहवाल सादर होताच पालिकेच्या अधिकाºयांनी पुन्हा रेल्वेकडे आणि रेल्वेच्या अधिकाºयांनी पुन्हा पालिकेकडे बोट दाखवत परस्परांवर चिखलफेक केलीच. त्यामुळे या अहवालाच्या आधारे कारवाई काय होणार हा पश्चिम रेल्वेवरील ३५ लाख प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. गोखले पुलाला लागून असलेल्या पादचारी पुलावर वाळू, सिमेंट, पेव्हर ब्लॉक, केबल यांचे वजन वाढत गेले. त्यातून पूल वाकला आणि नंतर तो कोसळून एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभरासाठी ठप्प झाली. तरीही या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या अहवालानंतर तो दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. पालिकेने कोणाच्या आदेशाने पुलावर वजन वाढवले, ते स्पष्टपणे समोर यायला हवे. तसेच ते वाढवले जात असताना रेल्वेचे अधिकारी झोपले होते का, या न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही समोर यायला हवे; तरच या चौकशीला अर्थ राहील. अन्यथा हाही दोषी आणि तोही दोषी या पद्धतीने अहवालाचा फक्त सोपस्कार उरकला जाईल. या दुर्घटनेनंतर जवळपास पाचशे पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा निर्णय झाला. उच्च न्यायालयाने रेल्वे, राज्य सरकार आणि पालिकेची कानउघाडणी केल्यानंतर या यंत्रणांनी परस्परांकडे बोट न दाखवता नेमक्या काय उपाययोजना करता येतील, यावर लक्ष केंद्रित केले. अंधेरीतील घटनेनंतर तीन ते चार पुलांना तडे गेल्याचे लक्षात आल्याने वाहतूक थांबवावी लागण्याच्या घटना घडल्या. अजूनही मुंबईत रेल्वेवरून जाणाºया पुलांत दादरचा टिळक पूल, करी रोड, चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवरील उड्डाणपूल, भायखळ्याचा एस ब्रिज यांचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीचा निर्णय लवकरात लवकर व्हायला हवा. अहवालानंतर रेल्वे दोषी की पालिका, एवढ्यापुरता हा विषय मर्यादित न राहता
नेमके विभाग-अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित व्हायला हवी. तसे झाले तरच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अखत्यारीतील प्रकल्प, त्यांच्या दुरुस्ती-देखभालीतील सावळा गोंधळ रोखला जाईल. अंधेरीत घडले त्याप्रमाणे पुलावर अतिरिक्त भार टाकण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी
त्याची कल्पना परस्परांना देण्याचा पायंडा पडेल. प्रवाशांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे.