पाऊस पुरेसा नाही, पण जलजन्य आजार वाढले!
By किरण अग्रवाल | Published: July 21, 2024 12:05 PM2024-07-21T12:05:47+5:302024-07-21T12:06:14+5:30
Waterborne diseases : केवळ आरोग्याचीच समस्या पुढे आली आहे असे नव्हे; तर विशेषत: पाणंद रस्त्यांच्या सार्वत्रिक दुरवस्थेचे असे चित्र पुढे आले आहे की, बळीराजाने शेतात पोहोचायचे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित व्हावा.
- किरण अग्रवाल
एकीकडे पावसाबाबतची चिंता पुरेशी मिटली नसताना, दुसरीकडे पावसाळ्याशी संबंधित प्रश्न व आजारांत मात्र वाढ झाली आहे. दवाखाने भरू लागले असून, बैलगाडीची चाके चिखलात रूतू लागली आहेत. याकडे दरवर्षाचाच प्रश्न म्हणून दुर्लक्ष करणार की कुणी काही हातपाय हलविणार..?
आताशी कुठे पावसाळा सुरू झाला आहे. अजून अनेक भागात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस नाहीच, तरी ग्रामीण भागात पावसाळ्याशी संबंधित साथरोगांनी उचल खाल्ल्याने चिंता वाढणे स्वाभाविक ठरले आहे. बरे, केवळ आरोग्याचीच समस्या पुढे आली आहे असे नव्हे; तर विशेषत: पाणंद रस्त्यांच्या सार्वत्रिक दुरवस्थेचे असे चित्र पुढे आले आहे की, बळीराजाने शेतात पोहोचायचे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित व्हावा.
विलंबाने का होईना, मान्सून दाखल झाल्यामुळे शेतीकामांची लगबग वाढली आहे. बी-बियाणे, रासायनिक खते, तणनाशके विक्रेत्यांच्या दुकानांवरील गर्दी वाढली आहे. अशात दूषित पाण्यामुळे कॉलरा, डायरिया आदी साथींचा उद्रेक होत असून, रुग्णालयांमधील गर्दीही वाढली आहे. तण व कीटकनाशके पिकांवर फवारताना पुरेशी काळजी घेतली न गेल्याने विषबाधा होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. हे सर्व प्रकार पाहता ग्रामस्थांनी स्वतः याबाबत काळजी घेणे तर गरजेचे आहेच, परंतु सरकारी यंत्रणांनीही यात त्यांचा रोल प्रामाणिकपणे अदा करणे गरजेचे बनले आहे.
अकोला जिल्ह्यातील आपातापा येथे पाणी व चिखल साचलेल्या रस्त्यावरून निघालेली एक गर्भवती भगिनी पाय घसरून पडल्याने जवळपासच्या महिलांनी तिला अक्षरशः आदिवासी वाड्या-पाड्याप्रमाणे साडीच्या झोळीत टाकून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवले व पुढे रुग्णालयात तिला दाखल केल्यावर तिचे बाळ दगावल्याचे निष्पन्न झाले. अंगावर शहारे आणणारीच ही घटना आहे. अकोला जिल्हाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिमसह संपूर्ण पश्चिम वऱ्हाडाच्या पट्ट्यात ग्रामीण भागातील रस्ते उखडले आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणच्या रस्त्यांवरील छोटे पूल वाहून गेले असून, रहदारी खोळंबली आहे. प्रशासन मात्र त्याबाबत म्हणावे तितके गंभीर दिसत नाही.
पाणंद रस्त्यांची तर मोठी दुरवस्था झाली आहे. शेतीचे सामान घेऊन चिखल तुडवत शेत कसे गाठावे? असा प्रश्न आहे. यात बळीराजाच्या तर नाकीनऊ येत आहेच, शिवाय चिखलातून गाडा ओढताना मुक्या जीवांच्या तोंडाला जो फेस येत आहे त्याची चिंता कुणी करायची? लोकसभा निवडणुकीत व्यस्त राहिलेले राजकारणी व प्रशासन यांचे याबाबत दुर्लक्षच झालेले दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीसारखे काही अपवाद वगळता पाणंद रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. गेल्यावर्षी याच मुद्यावरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर आमदारांनी उपोषण केल्याचे दिसून आले होते. यंदा सारेच गायब आहेत. त्यामुळे चिखलातून मार्ग काढण्याची वेळ बळीराजावर ओढवली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पावसाळी पाण्याचा वेढा पडण्यापूर्वीच साथरोगांचा वेढा ग्रामीण भागात पडू पाहतो आहे. अकोल्याच्या सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कॉलरा व डायरियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत सदरचे रुग्ण वाढतातच, असे म्हणून याबाबत आरोग्य विभागाने हात वर करू नयेत. पाणीपुरवठ्याच्या टाक्या निर्जंतुक करणे वगैरेसारख्या बाबी ग्रामपंचायत व पाणीपुरवठा यंत्रणांनी करावयाच्या असल्या, तरी शासनाने हाती घेतलेले ‘स्टाॅप डायरिया’ अभियान प्रभावीपणे गावागावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. ते पुरेसे क्षमतेने होताना दिसत नाही. या अभियानासाठी संबंधित यंत्रणा नेमके काय करत आहेत, याचा आढावा एकदा जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा. जलजन्य आजारांमुळे फक्त लोकांचेच आरोग्य बिघडत आहे असे नव्हे, तर मुक्या प्राण्यांचे व दूधदुभत्या जनावरांचेही आरोग्य बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा त्याचाही विचार व्हायला हवा.
सारांशात, जलजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी स्वतःहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवीच, पण यंत्रणांनीही यासंदर्भात गांभीर्य बाळगत उपाययोजनांसाठी पुढे सरसावणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष पुरवून पावले उचलणे अपेक्षित आहे.