काँग्रेसला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:31 PM2017-10-12T23:31:53+5:302017-10-12T23:32:49+5:30

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी

 Raise the Congress | काँग्रेसला उभारी

काँग्रेसला उभारी

Next

प्रतिकूल परिस्थितीत नांदेड महानगरपालिकेतील सत्ता आपल्याकडे अबाधित राखण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे केवळ यशस्वीच राहिले नाहीत तर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांची त्यांनी अक्षरश: धूळधाण उडवली. हे यश त्यांनी एक हाती मिळविले. भाजपची अवस्था तर तोंड वर करण्यासारखी ठेवली नाही. हा विजय काँग्रेस पक्षामध्ये संजीवनी निर्माण करणारा आणि भाजपचा सुसाट सुटलेला वारू रोखता येतो, असा आत्मविश्वास देणारा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अस्तित्वच महापालिकेतून संपणे, दुसºया शब्दात मुस्लिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदार जो गेल्या काही वर्षांपासून दुरावला होता तो पुन्हा परतला, ही काँग्रेसच्या दृष्टीने सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीच्या माध्यमातून एमआयएमने महाराष्टÑाच्या राजकारणात खाते उघडले होते आणि तेथून त्यांनी विधानसभेतही मर्यादित का होईना यश मिळवले होते. त्यांचा समाजावरील प्रभाव संपणे हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी चांगले चिन्ह समजता येईल. ज्या पद्धतीने काँग्रेसने सर्वांचा सफाया केला त्यावरून मराठा मतेही काँग्रेसकडेच वळली, हे स्पष्ट होते. सर्वात दारुण पराभव भाजपचा झाला. पूर्वी त्यांचे केवळ दोन सदस्य होते तरी त्यांनी निवडणूक प्रचारात जी राळ उठवून आभास निर्माण केला आणि सत्ता काबीज करण्याच्या वल्गना ज्या आत्मविश्वासाने केल्या हे पाहता त्यांच्यासाठी हा दारुण पराभवच म्हणता येईल. संभाजीराव पाटील निलंगेकरांचा ‘लातूर पॅटर्न’ येथे लागू पडला नाही. आयात केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर निष्प्रभ ठरले. मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांचे झंझावाती प्रचार दौरे परिणाम घडवू शकले नाहीत. चिखलीकरांचे आखाड्याबाहेरचे डावपेच आणि आयाराम-गयाराम उमेदवारांवर असलेली भिस्त, शिवाय भाजपच्या पदरात पडले की सगळेच पावन होतात हा गोड गैरसमज फोल ठरला. या पक्ष दलबदलूंना मतदारांनी स्पष्ट नाकारले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत अशोक चव्हाणांवर केलेली वैयक्तिक टीका मतदारांना आवडली नाही. पाऊण तासाच्या भाषणात त्यांनी अर्धा तास चव्हाणांवर वाग्बाण चालवले होते; पण या मोहिनी अस्त्राने मतदारांवर मोहिनी घालता आली नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील नळावरच्या भांडणाने येथेही दोघांचे नुकसान झाले. भाजपची सर्व सूत्रे चिखलीकरांच्या हाती होती आणि ते निष्ठावंतांना काय, पण मतदारांनाही रुचले नाही. कोणतीही रणनीती न आखता हवेत गोळ्या झाडत वरकरणी प्रचार करून हवा निर्माण केल्यामुळे भाजपचा हा फुगा फुटला. भाजपकडे नेतृत्वाचा चेहराच नव्हता. वास्तवात येथे भाजपचे अस्तित्व नव्हते. त्यांनी इतर पक्षांतील लोकांना फोडून आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय चिखलीकरांनी आपली फौज भाजपच्या तंबूत डेरेदाखल केली; पण ही फौज नसून बाजारबुणगे होते, हे मतदारांनी दाखवून दिले. एवढा आटापिटा करूनही भाजप दोन आकडी संख्या गाठू शकला नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. त्यांची पालिकेतील संख्या एकदम रोडावली. चिखलीकरांसाठी सेनेचे दरवाजे बंद झाले. राष्टÑवादी काँग्रेसचे अस्तित्व संपले. पूर्वी त्यांचे काही का होईना दोन सदस्य होते. चव्हाणांनी भेटीगाठी, वैयक्तिक संबंधावर जोर देत वैयक्तिक प्रचारावर भर दिला. दलित, मुस्लिम मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात त्यांना यश आले. हा काँग्रेसचा परंपरागत मतदार पुढे विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी शक्ती ठरणार आहे. अशोकरावांनी दिलेला हा धक्का भाजपच्या लक्षात राहील.

Web Title:  Raise the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.