आजचा अग्रलेख: पॉर्नचा वखवखाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 07:16 AM2021-07-21T07:16:57+5:302021-07-21T07:17:39+5:30

या प्रकरणात अटक झालेल्या उमेश कामत याने राज कुंद्रा व प्रदीप बक्षी यांचा सहभाग उघड केला. 

raj kundra case and the chatter of porn | आजचा अग्रलेख: पॉर्नचा वखवखाट

आजचा अग्रलेख: पॉर्नचा वखवखाट

Next

राज कुंद्रा हे सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती नसते तर कुंद्रा नावाच्या इसमाची दखल घेण्याचीही गरज नाही. बिटकॉनपासून इक्बाल मिर्चीपर्यंत आणि बेटिंगपासून ब्ल्यू फिल्मच्या निर्मितीपर्यंत सर्व घोटाळे, कुकर्म यामध्ये नाव आलेल्या कुंद्राला सोमवारी वेब सिरीज, टीव्ही मालिका बनवण्याच्या नावाखाली पॉर्न फिल्म तयार करण्याकरिता अटक केली. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडे याबाबत तक्रार आली होती. ‘हॉटशॉट’ या ॲपद्वारे कुंद्राशी संबंधित कंपनी ही पॉर्न फिल्म प्रसृत करीत होती. हे ॲप डाऊनलोड करण्याकरिता लोकांकडून पैसे घेतले जात होते. या प्रकरणात अटक झालेल्या उमेश कामत याने राज कुंद्रा व प्रदीप बक्षी यांचा सहभाग उघड केला. 

गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांची प्रतिमा आरोप-प्रत्यारोपांनी खालावली आहे. शिवाय काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. कुंद्रा याला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या प्रकरणातून अलगद बाहेर काढण्याची तयारी केली होती. मात्र आता परमबीर यांच्या काळातील अनेक प्रकरणांची फेरचौकशी सुरू झाली असून, त्यामुळे कुंद्राभोवती कारवाईचा फास आवळला गेला. ‘व्हॉट‌्सॲप विद्यापीठा’तून मिळणारी माहिती अनेकजण खातरजमा न करता फॉरवर्ड करतात. या विद्यापीठातील एक शाखा ही अर्थात पॉर्नची आहे. बहुतांश पुरुषांच्या व्हॉट‌्सॲप ग्रुपमध्ये एक-दोन ग्रुप हे अश्लील विनोद, पॉर्नबाबत असतात. त्यावर वेगवेगळ्या देशी-विदेशी सॉफ्ट-हार्डकोअर पॉर्न फिल्म काही उत्साही सदस्यांकडून विनासायास पुरवल्या जातात. एकेकाळी पिवळ्या जिलेटीनच्या पेपरचे वेष्टण असलेली पुस्तके विकली जात. डेबोनियरसारख्या मासिकाचा अंक हातात घेतानाही लोक आजूबाजूला कुणी ओळखीपाळखीचा बघत नाही ना, याची खात्री करत. आता मोबाइलमध्ये सर्व उपलब्ध असून, मोबाइलचा पासवर्ड गुप्त ठेवल्यास तुमच्या ‘खजिन्या’त काय आहे हे पाहण्याची सोय इतरांना नाही. 

मुंबई ही मायावी नगरी आहे. येथे बॉलिवूडमध्ये करिअर करायला देशाच्या कानाकोपऱ्यातून मुले-मुली येतात. ‘स्ट्रगलर्स’ या गोंडस नावाखाली या महागड्या शहरात भटकणाऱ्यांना पॉर्न फिल्म तयार करणाऱ्या कंपन्यांचे एजंट आपल्या जाळ्यात ओढतात. मढ आयलंड किंवा मुंबईतील काही हॉटेलमध्ये नियमित पॉर्नचे शूटिंग होत असते. नव्याने जाळ्यात ओढलेल्यांना अगोदर एखाद्या सिरिअल, वेब सिरीजचे शूटिंग सुरू असल्याचे भासवले जाते. मग हळूहळू बोल्ड सीन देण्याकरिता राजी किंवा सक्ती केली जाते. जेथे हे शूटिंग चालते तेथे कंपनीने गुप्त कॅमेरे बसवलेले असतात. त्याद्वारे या तरुणींचे अश्लील फोटो अथवा फिल्म काढून घेतात. मग तेच दाखवून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. काही प्रकरणात तरुणींना एखादा देखणा तरुण हेतूत: जाळ्यात ओढतो. मग राजीखुशीने झालेले त्यांचे शरीरसंबंध याच भांडवलावर पॉर्न फिल्म तयार केली जाते. फिल्म, मॉडेलिंग वगैरे क्षेत्रात ‘तेजी’चा काळ फार थोडा असतो. पुढे काम मिळेनासे झाल्यावर उभे केलेले ऐश्वर्य टिकवणे कठीण जाते. अशावेळी एक मार्ग पॉर्न फिल्ममध्ये काम करणे हा असतो. 

सर्वसामान्य माणसांमध्येही गेल्या काही वर्षांत अनेक विकृतींचा शिरकाव झाला आहे. अनेक विवाहित अथवा अविवाहित जोडपी शरीरसंबंध ठेवताना फोटो, फिल्म काढतात. एखाद्याचा मोबाइल दुसऱ्याच्या हातात पडला किंवा जुना मोबाइल विकून नवीन घेताना अशी फिल्म त्रयस्थाच्या हाती पडली तर ब्लॅकमेलिंगची संधी त्याला मिळते. शोडषवयीन तरुणींचा असाच गैरफायदा घेऊन त्यांच्या फिल्म काढण्याचे रॅकेट असून, चाइल्ड पोर्नोग्राफी हा वेगळा अध्याय आहे. कुंद्रा यांच्या कंपनीने तयार केलेले ॲप डाऊनलोड करणाऱ्यांना अशा वेगवेगळ्या पॉर्न फिल्म्स पाहायला मिळत होत्या. विदेशात पॉर्न फिल्मच्या निर्मितीकरिता परवाना दिला जात असल्याने कुंद्रा यांच्या कंपनीनेही तेथेच नोंदणी केली होती. मात्र निर्मिती येथे होत होती. अर्थात अशी शेकडो ॲप असून, भारतात पॉर्न फिल्मची बाजारपेठ किमान १५ हजार कोटी रुपयांची आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात असलेले अनेकजण अशी ॲप डाऊनलोड करीत असल्याने सध्या हा बाजार गरम आहे. आचार्य रजनीश म्हणतात की, स्त्री म्हणजे तिचे शरीर नव्हे तर ह्रदय. त्यामुळे स्त्रीला नव्हे तर स्त्रीत्वाला स्पर्श करा. पॉर्नच्या दुनियेत ही तरलता नाही. आहे केवळ वखवखाट..
 

Web Title: raj kundra case and the chatter of porn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.