'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा
By अतुल कुलकर्णी | Published: August 8, 2023 06:03 PM2023-08-08T18:03:13+5:302023-08-08T18:17:38+5:30
राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत.
>> अतुल कुलकर्णी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे दोघे एकत्र येणार म्हणून दोन दिवस बातम्या सुरू आहेत. मात्र त्यात कसलेही तथ्य नाही. हे दोघे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, त्याला कारण ठरले दोन हर्षल. ठाकरेंच्या शिवसेनेत हर्षल प्रधान तर राज ठाकरे यांच्याकडे हर्षल देशपांडे नावाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत. या दोघांच्या एकमेकांशी झालेल्या चर्चेनंतर या बातमीने वेग घेतला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सध्या सुरू आहे.१९६६ पासून बाळासाहेबांच्या भाषणांचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंगची फारशी सुविधा नव्हती. सुरुवातीची काही भाषणे राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे हर्षल प्रधान यांनी, हर्षल देशपांडे यांना फोन केला. बाळासाहेब ठाकरे यांची ऑडिओ भाषणे, फोटो, पुस्तकं मिळू शकतील का? आपल्याला स्मारकासाठी ती हवी आहेत, असे सांगितले. त्यावर हर्षल देशपांडे यांनी ही गोष्ट राज ठाकरे यांना सांगितली.
यासंदर्भात हर्षल प्रधान 'लोकमत'शी बोलताना म्हणाले, ही मागणी हर्षल देशपांडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलून घेतले होते. तुम्हाला काय काय हवे आहे ते सांगा, म्हणजे मी काढून ठेवतो. तुम्ही येऊन पाहा, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे हर्षल प्रधान यांचे म्हणणे आहे. त्यानुसार ही गोष्ट जेव्हा उद्धव ठाकरे यांना सांगितली तेव्हा त्यांनी, अशी सगळी माहिती असेल तर त्यांना काढू दे. आपण स्वतः जाऊन पाहू, असे सांगितल्याचेही हर्षल प्रधान म्हणाले. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे विधानभवनात आले. तेव्हा बोलताना त्यांनी ही गोष्ट काही पत्रकारांना देखील सांगितली. त्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का? असा सवाल विचारला असता, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मी कुठेही जायला तयार आहे, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोमवारी टोलवरून आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाची भाषा केली. त्यावर मनसेनेही प्रतिक्रिया दिली. त्यावरून तेव्हाचा संदर्भ घेत काहींनी दोघे एकत्र येणार अशा बातम्या सुरू केल्या.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांची पुस्तके, सीडी, भाषणांच्या ऑडिओ असा सगळा ऐवज स्वतः राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे दिला होता. त्यामुळे आता आपल्याकडे फार काही आहे असे वाटत नाही. बघू, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे प्रसिद्धीप्रमुख हर्षल देशपांडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
घडले ते एवढेच. मात्र यावरून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी पतंगबाजी सुरू झाली. दोघांमधील राजकीय मतभिन्नता सर्वश्रुत आहे. कार्यकर्त्यांना हे दोन्ही नेते एकत्र यावे असे कितीही वाटले, तरी ते दोघे एकत्र येण्याची कसलीही शक्यता आज तरी नाही. भविष्यातही ती असेल, अशी कोणतीही घटना घडताना दिसत नाही. आदित्य ठाकरे यांनी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोल रद्द करण्याची मागणी केली, तेव्हा मनसेने देखील त्यांच्या टोल आंदोलनाला साथ दिल्याच्या बातम्या काहींनी केल्या. मात्र, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता. त्यावेळी टोल माफीची घोषणा का केली नाही? असे म्हणून आपला वेगळा सूर स्पष्ट केला. त्यामुळे टोलवरून राज आणि उद्धव एकत्र येतील अशा बातम्या म्हणजे करमणुकीचे उत्तम साधन आहे, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. खासगीत बोलताना दोघांनी ते बोलूनही दाखवले आहेत. उद्धव ठाकरे यांना माझ्या इतका आतून बाहेरून कोणीही ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया एकदा राज ठाकरे यांनीच दिली होती. मध्यंतरीच्या काळात एका मुलाखतीत, उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास नाही. तो माणूस बोलतो वेगळे करतो वेगळे. त्यांच्याबद्दल न बोललेले बरे, अशी थेट प्रतिक्रिया राज यांनीच दिली होती. त्यात काहीही बदल झालेला नाही. एवढे सगळे घडलेले असताना, हे दोन नेते एकत्र कसे येतील?, याचाही विचार कोणी का करत नाही?, अशी मनसे नेत्यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरे यांना अमितचे राजकारण पुढे आणायचे आहे. तर उद्धव यांना आदित्यचे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येतील हे महाराष्ट्रासाठी दिवास्वप्नच राहील.