उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर!
By यदू जोशी | Published: March 24, 2023 12:44 PM2023-03-24T12:44:18+5:302023-03-24T12:46:32+5:30
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पळवली खरी; पण त्यांना ठाकरे ब्रँड पळवता आला नाही. त्यासाठी ठाकरेच लागेल ना.. राज ठाकरे त्याच प्रयत्नात असावेत!
राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर गुढीपाडव्याला जे भाषण दिले, त्यातील काही मुद्द्यांकडे त्यांचा गेमप्लॅन म्हणून बघता येईल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच खासदार अन् पंधरा आमदार ठेवलेत फक्त. उद्धव यांच्याकडे आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या आहेत : एक ठाकरे हा ब्रँड आणि दुसरी त्यांना असलेली सहानुभूती. उद्धव यांनी जी प्रतिमा उभी केली आहे तिच्या भंजनाचे काम भाजपने हाती घेतले आहेच. भविष्यात मातोश्रीचे काही विषय समोर आणून त्या प्रतिमेवर अधिक वार केले जातील असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पळविली खरी, पण त्यांना ठाकरे ब्रँड पळवता आला नाही. ठाकरे ब्रँड पळवायचा तर ठाकरेच लागेल ना ! त्यामुळे तो पळविण्याचे काम शिंदेंपेक्षा राज अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. लोहा लोहे को काँटता है तसे ठाकरे ठाकरे को काटने निकला है हा कालच्या भाषणाचा गाभा आहे.
या ब्रँडच्या अपहरणासाठीच्या राज यांच्या प्रयत्नात त्यांना भाजप व शिंदे यांची छुपी मदत नक्कीच मिळू शकते. माहीममधील मजार बारा तासाच्या आत हटवणे हे त्याचेच द्योतक आहे. उद्धव यांनीच शिवसेना बुडविली यावर ‘लाव रे ते व्हिडीओ’ धर्तीवर पुढच्या काही सभा होवू शकतात. ‘आपण स्वत:, नारायण राणे असे कोणीही उद्धव यांनाच शिवसेनेत नको होतो. अनेकांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थाने केली. त्यांनी जे पेरले तेच उगवले’ हे राज यांचे सभेतील वाक्य महत्त्वाचे आहे. मुंबई, ठाणे महापालिका असो की राज्यातील शिवसेना; आम शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जे चित्र निर्माण करण्यात आले आहे त्याला छेद जावा यासाठी अशी वाक्ये ही एक रणनीती असू शकते. उद्धव यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता संपविणे आणि त्यायोगे आम शिवसैनिकांमध्ये स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण करणे असा दुहेरी उद्देश राज यांच्या विधानांमागे दिसतो.
बाळासाहेबांचे शिवधनुष्य एकाला (उद्धव) झेपले नाही ते दुसऱ्याला झेपेल की नाही? - या वाक्यातून राज यांनी उद्धव यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्याही नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले. बाळासाहेबांचा वारसा तेच चालवू शकतात हे त्यांना सूचित करायचे असावे. उद्धव यांची खलनायकी प्रतिमा रंगविल्याशिवाय आपली प्रतिमा उजळ करता येणार नाही असे राज यांना वाटत असावे. उद्धव यांच्यापायी एकेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले हा राज यांचा तर्क मान्य केला तरी मनसेमधून गेल्या १८ वर्षांमध्ये अनेक नेते, कार्यकर्ते का सोडून गेले हा प्रश्न पडतोच; पण ठाकरेंना प्रश्न विचारायचे नसतात. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे वकीलही तेच असतात आणि न्यायाधीशही तेच ! शिवाजी पार्कवर राज यांचा करिष्मा दिसला, हे मात्र खरे ! मैदान तुडुंब भरले होते. राज नावाचे गारुड अजूनही कायम आहे. एक मात्र खरे की राज यांचे सर्वांत मोठे शत्रू ते स्वत:च आहेत. व्यक्तिमत्व, अफलातून भाषणशैली, लोकांच्या मनाला भिडतील असे विषय हाती घेणे ही बलस्थाने एकीकडे; आणि भूमिकेतील सातत्याचा अभाव, कार्यकर्त्यांचे नेटवर्क निर्माण न करणे, अधूनमधून गुहेबाहेर येणे हे दुसरीकडे ! त्यांचे हे दुसरे रूप राज यांच्या मार्गातला मोठा अडसर आहे. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतून बाहेर पडणे, उद्धव ठाकरेंची कमी झालेली ताकद या पार्श्वभूमीवर आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेऊन राज ठाकरे नव्याने पुढे सरसावले आहेत. मशिदींवरील भोंगे, माहीमची मजार हे विषय त्याच अनुषंगाने आलेले दिसतात.
अजितदादा बदलले?
अजित पवार विरोधी पक्षनेते झाल्यापासून बदलले आहेत की काय? पाहावे तेव्हा ते रागात असल्यासारखे दिसत. त्यांच्याशी सहज बोलता येत नाही असा अनेकांचा अनुभव. ते फटकळ आहेत आणि कडक शिस्तीचेही. यातून मग माणसे जवळ यायला चाचरतात. या प्रतिमेतून बाहेर यायचे असे त्यांनी ठरविलेले दिसते. आता ते स्वत:हून अनेकांशी बोलतात. विनोद करतात. मिश्किल भाव चेहऱ्यावर असतो त्यांच्या कधीकधी. हा मोठा बदल आहे. अजितदादांना कोणी सल्ला दिला माहिती नाही; पण हा बदल चांगला आहे.
मुंडे-गडकरी अन् ...
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक (गोपीनाथ गड) सिन्नर तालुक्यातील नांदुरशिंगोटे येथे उभारले असून, त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गेल्या आठवड्यात गेले होते. मुंडे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये गडकरींविषयी एक अढी तयार झाली; आणि ती कुठे ना कुठे दिसत असे. या कार्यक्रमात गडकरींनी ती अढी दूर केली. ते म्हणाले, “मी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फक्त दोघांच्या पाया पडलो, त्यातील एक लालकृष्ण आडवाणी अन् दुसरे गोपीनाथ मुंडे !” -असे काही प्रसंग यावे लागतात ज्याने अढी दूर व्हायला मदत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातही दुरावा आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करताहेत. लवकरच यश येईल असे दिसते.
जाता जाता..
जुन्या पेन्शनप्रकरणी कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही तरी सरकारी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. त्यावर सोशल मीडियात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यातली एक भारीच होती : एवढी मोठी शिवसेना फोडली; त्या मुख्यमंत्र्यांना संप मोडणं काय कठीण होतं?