‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?
By किरण अग्रवाल | Published: August 29, 2019 09:01 AM2019-08-29T09:01:53+5:302019-08-29T09:55:39+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता प्रचाराचे मैदान राज ठाकरे यांनी गाजविले होते.
किरण अग्रवाल
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची ‘युती’ टिकून राहणार की नाही, याबद्दल अजूनही साशंकताच व्यक्त केली जात असल्याने त्याबाबत जितकी वा जशी उत्सुकता आहे, तशीच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘मनसे’ सामील होणार की नाही याचीही उत्कंठा लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे. विशेषत: ‘मनसे’चे सुप्रीमो स्वत: राज ठाकरे किंवा त्या पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी निवडणूक लढायची की नाही यासंबंधी अद्याप स्पष्टता केली नसताना, नाशकात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी मात्र उमेदवारांची चाचपणी करतानाच ‘मनसे’ निवडणूक लढणार असल्याचेही सांगून टाकल्याने या उत्कंठेत भर पडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यात विविध पक्षीयांच्या यात्रा व संवाद सत्र जोरात आहे. प्रमुख भाजप-शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे ठिकठिकाणी कार्यक्रम होत असून, वंचित आघाडीही यात मागे नाही. तुलनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आघाडीवरील निवडणुकीची तयारी दर्शनीपणे दिसून आलेली नसली, तरी राज्यात काही ठिकाणी ‘मनसे’ फॅक्टरची होणारी चर्चा दुर्लक्षिता येणारी नाही. मुंबई, ठाणे, नाशिक व पुणे भागात नाही म्हटले तरी ‘मनसे’ला पुन्हा उठून उभे राहण्याची अपेक्षा आहे, कारण गतकाळात याच भागात या पक्षाने आपले अस्तित्व दाखवून दिले होते. पण, आता पुन्हा ते निर्माण करायचे तर अगोदर ‘मनसे’ निवडणूक लढणार आहे का, याचा निर्णय होणे गरजेचे आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता प्रचाराचे मैदान राज ठाकरे यांनी गाजविले होते. त्यांच्या वक्तृत्वाचा व सभांना मिळालेल्या प्रतिसादाचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लाभ झाल्याचे दिसून येऊ शकले नाही, मात्र विधानसभेच्या मतदारसंघातही तसेच होईल असे म्हणता येऊ नये. अर्थात, त्यासाठी त्यांचा पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का, व उतरला तर स्वबळावर लढेल, की काँग्रेस आघाडीसोबत असेल; याची स्पष्टता होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा त्यांना असलेला विरोध मावळून ते आघाडीत सामील होतील अशी अटकळ बांधली जात आहे; पण त्यादृष्टीने कसलीच पावले पडताना दिसलेली नाही. दरम्यानच्या काळात मुंबईतील कोहिनूर मिलच्या जागेप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने राज ठाकरे यांना नोटीस बजावली व त्यांची चौकशीही झाल्याने निवडणूक लढायच्या चर्चेऐवजी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना हेतुत: लक्ष केले जात असल्याचाच मुद्दा प्रकर्षाने चर्चिला गेला. अर्थात, आपल्या कितीही चौकशा केल्या तरी तोंड बंद ठेवणार नाही म्हणून राज यांनी ठाकरी शैलीत वार केल्याने त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते अमित शहा यांना असलेला विरोध आणखीनच टोकदार होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे ‘मनसे’ या निवडणुकीत अधिक त्वेषाने उतरण्याची शक्यता आहे.
अर्थात, ते स्वाभाविकही असले तरी तशी स्पष्टता खुद्द राज ठाकरे किंवा बाळा नांदगावकर आदी नेत्यांकडून होऊ शकलेली नाही. तयारी असेलच; परंतु ती जशी दिसायला हवी तशी आतापर्यंत दिसली नाही. नाशिकला मात्र पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे व अभिजित पानसे यांनी उमेदवारांची चाचपणी करतानाच ‘मनसे’ लढणार असल्याचेही सांगितल्याने उमेदवारी इच्छुकांच्या आशा पल्लवित होऊन गेल्या आहेत. स्वबळावर लढो, की आघाडीत जाऊन; पण लढणे निश्चित असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. आघाडीत गेले तर राज्यात १२ ते १५ व त्यातील नाशकात किमान दोन जागांची मनसैनिकांना अपेक्षा आहे. आतापर्यंत पक्ष लढेल की नाही, हेच कळत नसल्याने पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असलेले राहुल ढिकले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले गेले. अशा काठावर असलेल्या वा ओहोटीत दुसऱ्या किनारी जाण्याची शक्यता वर्तविल्या जाणाऱ्यांना या चाचपणीमुळे ‘ब्रेक’ बसण्याचीही शक्यता आहे. तेव्हा काहीसे उशिरा का होईना, लढण्याबाबतची तयारी सुरू झाल्याने ‘मनसे’च्या गोटातील सक्रियताही वाढून गेली आहे. या सक्रियतेतले सातत्य मात्र ना पक्ष नेते राज ठाकरे यांच्याकडून राखले जाते, ना स्थानिक पातळीवरील नेत्या-कार्यकर्त्यांकडून; हाच यातील निदर्शनास पडणारा मुद्दा आहे. आजवर या पक्षात जी पडझड झाली ती त्याचमुळे व यापुढेही तेच कारण पुरेसे ठरावे. तेव्हा, आगामी काळात काय होते तेच पाहायचे. उत्कंठा दाटून आहे ती त्यामुळेच.