राज ठाकरे यांची होरातज्ज्ञता!
By Admin | Published: October 1, 2016 02:09 AM2016-10-01T02:09:44+5:302016-10-01T02:09:44+5:30
राजकारणाच्या धबडग्यात बऱ्याचदा काहींचे विशेषत्व अस्पर्श ठरून जाते, तसेच तर राज ठाकरे यांच्या ‘होरातज्ज्ञ’तेच्या बाबतीत झाले नसावे?
- किरण अग्रवाल
राजकारणाच्या धबडग्यात बऱ्याचदा काहींचे विशेषत्व अस्पर्श ठरून जाते, तसेच तर राज ठाकरे यांच्या ‘होरातज्ज्ञ’तेच्या बाबतीत झाले नसावे? कारण, मराठा मोर्चे निघतील असे भाकीत त्यांनी वर्तवून ठेवले होते म्हणे.
राजकारणात कोण काय बोलले यापेक्षा कोणी काय करून दाखविले यालाच अधिक महत्त्व असते आणि काळाच्या कसोटीवर तेच टिकणारेही ठरते. त्यामुळे मराठा मोर्चे असोत किंवा अॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाचा विषय असो; त्याबाबत राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम भाकीत वर्तवून ठेवल्याचे जे काही बाळा नांदगावकर यांनी नाशकात सांगितले त्याकडे फारसे गांभीर्याने पाहता येऊ नये.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ढासळणारी गढी सावरण्यासाठी बाळा नांदगावकर नाशकात आले असता त्यांनी आपले नेते राज ठाकरे यांचा आतापर्यंत अस्पर्श वा अज्ञात राहिलेला आणखी एक पैलू लोकांसमोर आणून दिल्याचे म्हणता यावे, अशी माहिती दिली आहे. मराठा समाजाचे अशा प्रकारचे मोर्चे निघतील हे राजसाहेबांनी दोन वर्षांपूर्वीच सोलापूरच्या एका कार्यक्रमात भाकीत केले होते असे तर नांदगावकरांनी म्हटलेच; शिवाय कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर तेथे भेट देताना राज यांनीच सर्वप्रथम अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग होत असल्याचे धाडसी विधान केले होते, असेही सांगितले. त्यामुळे एकहाती सत्ता दिल्यास अवघा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करण्याची तयारी दर्शविणारे व त्याच संदर्भाने विकासाची ब्ल्यू प्रिंटही तयार करणारे राज ठाकरे केवळ राजकारणी अगर व्यंगचित्रकारच नसून ‘होरातज्ज्ञ’ही असल्याची नवी ओळख महाराष्ट्राला व्हावी. विशेष म्हणजे, मराठा समाजातील आजची अस्वस्थता जर राज ठाकरे यांनी तेव्हाच हेरली होती, तर या दोन वर्षांत ती दूर करण्यासंदर्भात एका दखलपात्र राजकीय पक्षाचे नेते म्हणून त्यांनी काय केले, असाही प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे. पण, करण्यापेक्षा बोलण्यावर अधिक भर देणाऱ्यांकडून अशा प्रश्नांची उत्तरे अपेक्षितही नसतात. म्हणूनच त्यांच्या प्रवासाला मर्यादा पडल्याचेही दिसून आल्याखेरीज राहत नाही.
नाशकातलेच उदाहरण या संदर्भात देता येण्यासारखे आहे. राज्यात सर्वप्रथम नाशिक महापालिकेतील सत्ता ‘मनसे’ला लाभली होती. येथे करून दाखवून त्याचे ‘रोल मॉडेल’ त्यांना सर्वत्र दाखवता आले असते, परंतु स्थानिक पातळीवर असे कारभारी निवडले गेले की, खुद्द राज ठाकरे यांना लक्ष घालण्याची वेळ येऊनही सत्तेचा वा पक्षाचा प्रभाव निर्माण करणे शक्य होईनासे झाले आहे. म्हणायला काही प्रकल्पांची स्वप्ने पेरली गेलीही, पण येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी संकल्प चित्रांऐवजी प्रत्यक्षात काही साकारले गेलेले दिसून येणे अवघडच वाटत आहे. मोठ्या व भव्य-दिव्य प्रकल्पांचे एकवेळ जाऊ द्या, साधा ‘डेंग्यू’चा डास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना रोखता आलेला नाही. गेल्या वर्षी एका नगरसेविकेच्या पतीचा बळी त्याने घेतला असून, चालू वर्षी आतापर्यंत ७५० डेंग्यूबाधीत रुग्ण शहरात आढळून आले आहेत. अन्य नागरी सुविधांबाबतची ओरडही कायम आहेच. सत्ताधारी असून किरकोळ कामेही होत नसल्याच्या त्राग्यातून अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ४० पैकी अवघे २३ नगरसेवकांचे डबे ‘मनसे’च्या इंजिनमागे उरले आहेत. निवडणुकीपूर्वी यातीलही काही गळतील. नाशकातील या पक्षाच्या प्रवासाला व प्रभावालाही मर्यादा पडल्या आहेत त्या म्हणूनच.
महत्त्वाचे म्हणजे, महापालिका निवडणूक ‘मनसे’साठी कठीणच असल्याची कबुली बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. ही काठीण्यता उगाच आकारास आलेली नाही. या पक्षाने आपल्या कर्माने ती ओढवून घेतली आहे. तेव्हा नांदगावकरांनी नाशकातील नगरसेवकांकडून पक्ष स्थितीची वास्तविकता जाणून घेतली हे बरेच झाले. पण केवळ तेवढ्यावर थांबून उपयोगाचे नाही. जनता जनार्दनाची नाडी जाणून घेतल्याशिवाय व उक्तीऐवजी कृती केल्याखेरीज गत्यंतर नाही, हेच ‘मनसे’ने लक्षात घेतलेले बरे.